आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले सक्षम

आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले सक्षम
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले सक्षम

माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक पाटील हे आपल्या २३ एकर शेतीबरोबर निम्म्या खर्चाने १० एकर शेती करतात. यात केळी, कापूस या मुख्य पिकांसोबत खुबीने आंतरपिकाचे नियोजन करतात. यातून खर्च आणि उत्पन्नांचे एक आपले गणित त्यांनी बसवले आहे. शेती व्यवस्थापनासाठी अधिक वेळ देत शेती कायम नफ्यात राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. .................... जळगाव जिल्ह्यातील माचले (ता. चोपडा) गावचे शिवार केळी, कापूस, भुईमुगाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. काळ्या कसदार जमिनीमुळे कपाशीचे पीक जोमदार येते. तापी व सातपुडा पर्वतातून येणाऱ्या गूळ नदीच्या पाण्याचा लाभ या शिवाराला होतो. येथील दीपक माणिक पाटील यांच्याकडे २३ एकर शेती आहे. सिंचनासाठी पाच कूपनलिका असून, कुटुंबीयांसह तीन सालगड्यांच्या साह्याने शेतीचे व्यवस्थापन केले जाते. स्वतःच्या शेतीबरोबरच निम्म्या खर्च आणि फायद्यावर दुसऱ्या शेतकऱ्यांची १० एकर शेती दरवर्षी कसतात. पदवीधर झाल्यानंतर त्यांच्यावर आलेली शेतीची जबाबदारी ते सांभाळतात. पिकांचे नियोजन ः

  • दरवर्षी १० ते १२ एकर कापूस, १२ ते १३ एकर केळी ते घेतात.
  • तीन एकर केळीचा खोडवा म्हणजेच पिलबाग सध्या करतात.
  • कापसाचे क्षेत्र डिसेंबरमध्येच रिकामे करून त्यात भुईमूग, गहू, ज्वारी आदी पिके घेतात.
  • सर्व पिकांच्या सिंचनासाठी ठिबक, तुषार सिंचन यंत्रणा त्यांच्याकडे आहे.
  • सघन लागवड

  • बी. टी. कपाशीची सघन पद्धतीने लागवड करताना अंतर पाच फूट बाय दीड फुटात ठेवले जाते. लागवडीसाठी फेरपालट केलेले क्षेत्र निवडतात.
  • कापसाला फक्त एकदाच बेसल डोस शिफारशीप्रमाणे देतात. नंतर सर्व खते ड्रीपमधून देतात. खतांचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठी त्यांचा भर असतो. यामुळे एकरी किमान दोन ते अडीच हजार रुपये खतांचा खर्च वाचत असल्याचे दीपक यांनी सांगितले.
  • गेल्या काही वर्षांपासून नुकसानकारक ठरणाऱ्या गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकरी सात कामगंध सापळ्यांचा वापर करतात. रासायनिक नियंत्रणासाठी विद्यापीठाच्या शिफारशीचा आधार घेत चार फवारण्यांचे नियोजन असते. शेवटची फवारणी कैऱ्या पक्व झाल्यानंतर घेतात.
  • कापूस वेचणीसाठी पाच रुपये प्रतिकिलोचा खर्च त्यांना येतो. वेचणीसाठी आदिवासी भागातील मजुरांची मदत घेतात.
  • डिसेंबरनंतर फरदड घेण्याचा मोह टाळून कापसाचे पीक मोडतात. कारण, डिसेंबरनंतर कापसाचे वजन कमी भरते. वेचणीचा खर्च वाढतो व गुलाबी बोंड अळीचा प्रसार वाढण्यासाठी डिसेंबरनंतरचे कापूस पीक अधिक कारणीभूत ठरते.
  • पीक मोडताना पूर्वी पऱ्हाटी रोटाव्हेटरने बारीक करून शेतात गाडायचे. मात्र, अलीकडे गुलाबी बोंड अळीचे संकट आल्याने ते पीक मजुरांकरवी उपटून घेतात. एका भागात गोळा करून ते जाळतात. यात थोडा खर्च वाढला असला तरी हे करणे दीर्घकालीन फायद्याचे ठरते. नंतर या शेतात रब्बीची पेरणी करतात.
  • कपाशीचा आर्थिक ताळेबंद

  • कापसासाठी एकरी किमान २१ हजार रुपये खर्च लागतो. कापूस वेचणीला क्विंटलमागे किमान ५०० रुपये खर्च येतो.
  • २०१९ मध्ये एकरी १२ क्विंटल उत्पादन आले. त्याला सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
  • यंदा (२०२०) अति पावसामुळे उत्पादन कमी होऊन एकरी आठ क्विंटल कापूस मिळाला. त्यालाही एकरी खर्च २१ हजार रुपये आला आहे.
  • आंतरपिकांचा प्रयोग केळीची लागवड ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये करतात. मागील तीन वर्षांपासून तीन ते चार एकर केळीमध्ये टिंडा, कलिंगड या वेलवर्गीय पिकांची लागवड करतात. त्यामुळे केळी पिकाला उष्णतेचा फटका बसत नाही, नैसर्गिक आच्छादनामुळे पाण्याची बचत होते. सोबत आंतरपिकातून उत्पन्न मिळते. टिंडा पीक ः मागील वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला दीड एकर केळीत टिंडाची लागवड केली होती. त्यामुळे पिकाचे उष्णतेपासून संरक्षण झाले. उन्हाळ्यात केळीला केवळ प्रतिदिन १५ ते १८ लीटर प्रतिझाड पाणी द्यावे लागले. प्रतिझाड दोन ते तीन लीटर पाण्याची बचत झाली. टिंडा पिकातून एकूण एक लाख १७ हजार रुपये उत्पन्न मिळाले. तर त्यासाठी एकूण ४८ हजार रुपये खर्च आला होता. कलिंगड पीक ः जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला केळी पिकात दरवर्षी दोन ते चार एकर कलिंगडाची लागवड करतात. मागील हंगामात दोन एकरात कलिंगड होते. कलिंगडाचे एकरी २२ मेट्रिक टन उत्पादन आले होते. त्याला एकरी ४० हजार रुपये खर्च आला. त्यातून एकरी ६० हजार रुपये निव्वळ नफा सुटला. या आंतरपिकांचे वेल मे महिन्याच्या मध्यापर्यंत राहू देतात. तापमान कमी झाल्यावर व ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर हे वेल आठवडाभरात शेतातून काढून घेतात. मुख्य केळी पिकाचा ताळेबंद केळीची लागवड करताना पारंपरिक वाण व ऊतिसंवर्धित रोपांचा उपयोग करतात. दरवर्षी ऊतिसंवर्धित रोपांच्या बागेत किमान तीन एकर केळीचा खोडवा (पिलूबाग) घेतात. पिलूबागला नव्याने मशागत, लागवड, ठिबक याचा खर्च नसतो. शिवाय आठ महिन्यांत क्षेत्रात काढणी होऊन ते रिकामे करता येते. केळीसाठी एकरी ५२ ते ५४ हजार रुपये खर्च येतो. तर उत्पादन हेक्‍टरी ५५ मेट्रिक टन घेतात. जागेवरच केळीची विक्री होते. केळीला २०१८ मध्ये प्रतिक्विंटल सरासरी १०००, २०१९ मध्ये ११०० रुपये दर मिळाला. भुईमूग

  • दरवर्षी कापसाखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर भुईमुगाचे पीकही करून घेतात.
  • २०१८ मध्ये पॉली मल्चिंगवर त्यांनी हे पीक घेतले होते.
  • २०१९ मध्ये दुष्काळी स्थितीमुळे जलसाठे कमी झाल्याने हे पीक टाळले.
  • यंदाही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून अडीच एकरात भुईमूग पेरणीचे नियोजन त्यांनी केले आहे.
  • पपईचे पीकही दोन वर्षाआड घेतात. तीन वर्षांपूर्वी पपईचे एकरी ३४ मेट्रिक टन उत्पादन मिळविले होते. त्याला जागेवरच प्रतिकिलो चार रुपये दर मिळाला होता. खर्च एकरी सुमारे ६० हजार रुपये आला होता.
  • फेरपालट, पीक अवशेष, शेणखत ही त्रिसूत्री

  • पिकाच्या फेर पालटीसोबतच शेतात शेणखताची बचत करण्यासाठी काही उपाय राबवतात. उदा. केळीची लागवड क्षेत्रामध्ये गादीवाफ्यांवर आवश्यक तेवढे शेणखत टाकतात. ते सरीत टाकत नाही. परिणामी, एकरी किमान दोन ट्रॉली शेणखत म्हणजेच सुमारे पाच हजारांची बचत होते.
  • केळी पिकालादेखील एकदाच रासायनिक खतांचा बेसल डोस देतात. नंतर खते ड्रीपमधून देतात.
  • केळीखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात शेवटी डिस्क हॅरो किंवा रोटाव्हेटरने केळी खांबाचे तुकडे करतात. दोनदा रोटाव्हेटरने बारीक करून हे खांब जमिनीत गाडतात. मग शेत एक ते दीड महिना तापल्यानंतर कापसाची लागवड करतात. कापसाची लागवड करताना शेणखताचा उपयोग करावा लागत नाही, कारण अवशेषांमुळे जमिनीचा पोत सुधारलेला असतो, असे दीपक सांगतात.
  • वेळीच देखभालीमुळे होते खर्चात बचत अनेकजण ठिबक सिंचन लावल्यानंतर त्याच्या देखभालीची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. मात्र, पाण्यातील क्षार, खतांचा साका होणे अशा अनेक कारणांमुळे त्याची छिद्रे बंद होतात. हे टाळण्यासाठी पिकाच्या लागवडीपूर्वी लॅटरलवर आम्लाची प्रक्रिया करतात. तसेच काही दिवसांनी बॅक फ्लशिंगमुळेही फिल्टर व लॅटरलमधील गाळ, अवशेष बाहेर काढले जातात. थोड्या काळजीमुळे ठिबक सिंचन वर्षानुवर्षे उत्तम काम करते. ठिबक बदलण्याचा खर्च वाचतो. दीपक पाटील, ९७६४९५६०६२, ७०२०६०३७९८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com