agriculture stories in marathi agrowon agralekh on bengal gram | Agrowon

आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादक
विजय सुकळकर
मंगळवार, 26 मार्च 2019

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा चिकाटी, अपार मेहनतीने शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्याची माती करण्याचे काम शासनाने करू नये.

राज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढणी केलेला हरभरा हमीभावापेक्षा कमी भावाने विकला आहे. आजही बहुतांश खासगी खरेदीमध्ये प्रतिक्विंटल ३९०० ते ४००० रुपये असाच भाव सुरू असून, आर्थिक अडचणीतील शेतकरी या भावात हरभरा विकत आहेत. हरभऱ्याचा हमीभाव ४६२० रुपये असताना प्रतिक्विंटल ७०० रुपये शेतकऱ्यांचे थेट नुकसान होत आहे. शेतीमाल खरेदीसाठी नेहमीप्रमाणे शासनाला उशिरानेच जाग आली आहे. नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या केंद्रांवर किमान समर्थन योजनेअंतर्गत हरभऱ्याची हमीभावाने (?) खरेदी करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. हरभऱ्याची शासकीय खरेदी उशिराने सुरू झाली आहे. अशा खरेदी केंद्रांची संख्या खूपच कमी असते. त्यात ऑनलाइन नोंदणीपासून ते साठवून, शेतकऱ्यांच्या पदरात पैसे मिळेपर्यंत अनंत अडचणी असतात, असे यापूर्वीचे अनुभव आहेत. अशा वेळी शासकीय खरेदी हरभरा उत्पादकांना कितपत न्याय देईल, यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह कायम आहे.

रब्बीत हरभरा पीक घेण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन खरीप हंगामापासूनच सुरू होते. ज्या शेतात हरभरा घ्यायचा आहे, अशा शेतात खरीपात सोयाबीन, मूग, उडीद अशा कमी कालावधीच्या पिकांची पेरणी केली जाते. काही शेतकरी तर कापसाचा पहिला, दुसरा वेचा झाला की पऱ्हाट्या उपटून त्यात हरभरा घेतात. जिरायती शेतीत अत्यंत कमी पाण्यावर रब्बी हंगामात येणारे हरभरा हे एकमेक आश्वासक पीक आहे. दोन-तीन वर्षांपासून राज्यात हरभऱ्याचा पेरा वाढत आहे. चालू हंगामात मात्र कमी पाऊसमान, पाणीटंचाई यामुळे हरभऱ्याचा पेरा घटला आहे. या हंगामात लागवडीपासून ते आता काढणीपर्यंत हे पीक अस्मानी संकटाच्या तडाख्यात आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्री पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळीसुद्धा विजेचा लपंडाव, तसेच कमी दाबाने वीजपुरवठा या खेळात शेतकऱ्यांना बराच त्रास होतो. डोंगराळ भागात वन्यप्राणी हरभऱ्याचे बरेच नुकसान करतात, तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी देताना शेतकऱ्यांवर हल्लेही करतात. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा चिकाटी, अपार मेहनतीने शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्याची माती करण्याचे काम शासनाने करू नये.

मागील दोन वर्षांपासून शासकीय तूर खरेदीचे शेतकऱ्यांना जसे वाईट अनुभव आहेत, अगदी तीच गत हरभरा खरेदीचीपण आहे. मागच्या वर्षी एक मार्चपासून हरभरा खरेदी सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते; परंतु अनेक जिल्ह्यांत उत्पादकता जाहीर न केल्यामुळे प्रत्यक्ष खरेदी दोन ते तीन आठवड्यांनी उशिरा सुरू झाली होती. हरभऱ्याची शासकीय खरेदी ठराविक कालमर्यादेत केली जाते. उत्पादकांना शासकीय खरेदी केंद्रांवर या कालमर्यादेच हरभरा विकावा लागतो. अनेक ठिकाणी ऑनलाइन नोंदणीसाठी अडचणी येतात. इकडून तिकडून नोंदणी झालीच तर संबंधित केंद्रांकडून खरेदीस नकार देण्याचे प्रकारसुद्धा यापूर्वी घडले आहेत. त्यातच सार्वजनिक सुट्यांसह सर्व्हर डाऊन, जागा, बारदाना आणि हरभरा साठवणुकीसाठी गोदामेच उपलब्ध नसल्याने खरेदीची प्रक्रिया ठप्प होते, अनेक दिवस बंदच राहते. हे सर्व प्रकार या वर्षी होणार नाहीत, याची काळजी शासन-प्रशासनाने घ्यायला हवी. देशात डिसेंबर २०१६ मध्ये हरभरा आयातीत दुपटीने वाढ झाली होती. गेल्या हंगामात काबुली हरभऱ्याची आयात वाढत असल्यामुळे त्यावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवरून ६० टक्के केले. असे असतानासुद्धा डाळी, हरभऱ्याची आयात सुरूच आहे. ही आयात अशीच सुरू राहिली तर हरभऱ्याचे दर वाढणार नाहीत, हे शासनाने लक्षात घेऊन आयातीवर निर्बंध लावायला हवेत.


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...