शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
अॅग्रो विशेष
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्य
बायो कॅप्सूल या कोणत्याही रासायनिक अथवा सेंद्रिय खतांना पर्यायी नाहीत, तर विविध खतांच्या माध्यमातून जमिनीत टाकलेले तसेच मातीत पडून असलेले अन्नघटक पिकांना उपलब्ध करून देण्याबाबत त्यातील जिवाणू मध्यस्थांचे काम करणार आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
महाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची उपलब्धता गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढविण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. राज्याची रासायनिक खतांची मागणी ३५ ते ३६ लाख टन असून, या वर्षी ४० लाख ५० हजार टन खते उपलब्ध असतील. पिकांच्या वाढीसाठी एकूण १७ अन्नघटक लागतात. सरळ, संयुक्त खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये अशा विविध ग्रेडमधून ती बाजारातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पूर्वी सेंद्रिय खते तसेच हिरवळीची खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असत. आता त्याचे प्रमाण कमी झाले असून, शेतकऱ्यांचा कल रासायनिक खतांच्या वापराकडेच अधिक आहे. रासायनिक खते कमी मात्रेत पिकाला जास्त अन्नघटक पुरविणारी, सर्वत्र उपलब्ध आणि वापरास सोपी आहेत. त्यामुळे राज्यात रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होत आहे. ती चुकीच्या पद्धतीनेसुद्धा दिली जात आहेत. सोबत पारंपरिक पद्धतीने पिकाला मुबलक पाणी दिल्याने जमिनी खराब होत आहेत. त्यातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. सेंद्रिय कर्ब हे मातीत राहून पिकाच्या वाढीसाठी अहोरात्र झटणाऱ्या जिवाणूंचे खाद्य असते. मातीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने जिवाणूंची संख्या घटून माती मृतवत होत आहे. अशा मातीत कितीही रासायनिक खते टाकली तर ती पिकाला उपलब्धच होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे अपेक्षित उत्पादन आणि दर्जाही मिळत नाही. काही जैविक खते पूड, भुकटी तसेच द्रव स्वरूपात बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा शेतकऱ्यांकडून फारसा वापर होताना दिसत नाही.
महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळाने आता कॅप्सूल स्वरूपात आठ प्रकारची जैविक खते बाजारात आणली आहेत. आगामी खरिपासाठी ती राज्यभर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मातीचा पोत कायम राखून अधिक उत्पादन आणि शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासाठी शेतात जैविक खतांचा वापर वाढायलाच हवा यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे कॅप्सूलच्या स्वरूपात आलेली विविध प्रकारची जैविक खते कोणत्या पिकासाठी, किती मात्रेत आणि कशी वापरायची याबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधन व्हायला हवे.
बायोकॅप्सूल वापराबाबत तोंडी माहिती सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखविणे अधिक प्रभावी ठरेल. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे बायोकॅप्सूल या कोणत्याही रासायनिक अथवा सेंद्रिय खतांना पर्यायी नाहीत, तर विविध खतांच्या माध्यमातून जमिनीत टाकलेले तसेच मातीत पडून असलेले अन्नघटक पिकांना उपलब्ध करून देण्याबाबत त्यातील जिवाणू मध्यस्थांचे काम करणार आहेत, हे शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. जैविक खते हे विविध प्रकारच्या जिवाणूंचा स्रोत असतात. जिवाणूंची संख्या मातीत वाढली म्हणजे असे जिवाणू जमिनीतील अन्नघटकांचे विघटन करून, त्यांना एकत्र करून पिकाला सहजपणे घेता येतील, अशा स्वरूपात उपलब्ध करून देतात. त्यामुळे रासायनिक खतांची मात्रा थोडी कमी केली जाऊ शकते, असे यातील जाणकार सांगत आहेत. परंतु याबाबतही पीकनिहाय विविध रासायनिक खते वापरताना नेमकी किती कमी वापरायची, याचे शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
सध्या राज्यामध्ये जैविक, सेंद्रिय खतांच्या नावाखाली नफेखोर व्यावसायिक माती, राख असे काहीही विकत आहेत. बोगस, भेसळयुक्त खतांचे प्रमाणही वाढले आहे. तसे बायोकॅप्सूलचे होणार नाही, याची काळजीही संबंधित यंत्रणेला घ्यावी लागेल. बायोकॅप्सूलचा योग्य वापर करून रासायनिक खतांची मात्रा आपण कमी करू शकलो तर मातीचे आरोग्य आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हे दोन्ही सुधारण्यास हातभार लागेल.
- 1 of 652
- ››