लहान वृक्षात संधी महान

जनुकीयदृष्ट्या आणि नैसर्गिकरीत्या मोठ्या वाढणाऱ्या वृक्षाला हुबेहूब लहान आकार देणे ही केवळ कला नसून, कला आणि विज्ञानाचा योग्य संगमच म्हणावा लागेल.
संपादकीय
संपादकीय

बोन्सायच्या बहुतांश व्याख्येत छोट्या कुंडीत वृक्ष अथवा झुडूपवर्गीय झाड वाढविण्याची कला असे म्हटले आहे; परंतु जनुकीयदृष्ट्या आणि नैसर्गिकरीत्या मोठ्या वाढणाऱ्या वृक्षाला हुबेहुब लहान आकार देणे ही केवळ कला नसून, कला आणि विज्ञानाचा योग्य संगमच म्हणावा लागेल. विशेष म्हणजे बोन्साय (वामन वृक्ष) निर्मितीचे मूळ भारतीय संस्कृतीत आढळते. ऋग्वेदात ‘वामन तनु वृक्षादि विद्या’ असा उल्लेख आहे. आपल्या देशात ऋषीमुनींच्या काळात अशा पद्धतीने औषधी वनस्पती वाढविल्या जात असल्याचे अनेक दाखले मिळतात. पुढे ही कला परदेशांत गेली. कलाप्रेमी जपानी लोकांनी बोन्सायचे महत्त्व ओळखून ही कला देशात रुजवून त्याचा प्रसार जगभर केला. त्यामुळेच आज बोन्साय म्हणजे जपान असे समीकरणच बनले आहे. दुर्दैवाने आपल्या देशात मात्र ही कला मागे पडली.

खरे तर देशात-राज्यात महानगरे, शहरे, निमशहरे मोठ्या संख्येने उदयास येत आहेत. जागोजागी नागरी वस्त्या, कॉलनी होत आहेत. शहरी श्रीमंत वर्गाकडून घरात ठेवण्यासाठी बोन्सायची मागणी वाढत आहे. शिवाय शहरातील मोठी हॉटेल्स, कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये, बाग-बगीच्यातही बोन्साय ठेवले जात आहे. कला आणि विज्ञानाच्या संयोगातून साकारलेल्या कलाकृतीला गुणवत्तेनुसार दरही मिळतो. एवढेच नव्हे तर अनेक प्रगत देशांकडून बोन्सायला मागणी असल्याने त्याच्या निर्यातीतूनही चांगला पैसा मिळू शकतो. अशावेळी एक वेगळा व्यवसाय म्हणून बोन्साय निर्मितीकडे पाहायला हवे.  

बोन्सायबाबत माहिती, प्रशिक्षण, प्रात्यक्षिकांच्या अभावामुळे ही कला देशात मागे पडली आहे. इंडोनेशियासह अनेक देशांत बोन्सायचे शिक्षण, प्रशिक्षण देणाऱ्या अनेक व्यावसायिक संस्था आहेत. अनेक देशांत बोन्साय शेतीला सर्व प्रकारची सरकारी मदत मिळते. जपान, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, चीन, अमेरिका आदी देशांत बोन्सायला व्यावसायिक रूप देण्यात आले आहे. आपल्याकडे मात्र याबाबत फारच उदासीनता दिसून येते. रोजगाराच्या अनेक संधी दडलेल्या या क्षेत्राच्या भरभराटीसाठी शास्त्रशुद्ध व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शासकीय संस्था तालुका, जिल्हा पातळीवर निर्माण व्हायला हव्यात. या कलेला ओळख प्रदान करण्याचा ध्यास काही संस्था व्यक्तींनी घेतलेला आहे. याच ध्यासातून प्राजक्ता काळे यांनी समविचारी मैत्रिनींना सोबत घेऊन पुणे येथे ‘बोन्साय नमस्ते’ ही संस्था सुरू केली आहे. कलेचा देशात प्रसार व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाची संकल्पनाही उत्तमच म्हणावी लागेल. याचा फायदा बोन्साय कला शिकू पाहणाऱ्या सर्वांनाच होईल.

आपल्या देशातील वैविध्यपूर्ण हवामान आणि बोन्साय करता येण्याजोगे १५ हजारहून अधिक वृक्षांचे प्रकार आहेत. याचा फायदा शेतकरी तसेच ग्रामीण भागातील तरुणांनी घ्यायला हवा. बोन्सायबाबतची माहिती आणि शास्त्रीय प्रशिक्षण घेऊन या व्यवसायात उतरता येते. आपल्या शेतात, घराशेजारी सोयीनुसार कमी जागेत बोन्साय निर्मिती करता येऊ शकते. काही छंद म्हणूनही बोन्साय निर्मितीत उतरतात, त्यांनी पुढे छंदास व्यावसायिक रूप दिले आहे. या व्यवसायात सुरवातीची दोन-चार वर्षे सहनशीलता बाळगावी लागते, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर मात्र हा किफायतशीर उत्पन्न देणारा व्यवसाय ठरू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com