agriculture stories in marathi agrowon agralekh on central budget 2019 | Agrowon

‘अर्थ’हीन संकल्प
विजय सुकळकर
शनिवार, 6 जुलै 2019

अर्थसंकल्प सादरीकरणाच्या ठरावीक पद्धतीलाच या वेळी बगल देण्यात आली आहे. त्यामुळे शेती, सिंचन, कृषी पतपुरवठा, शेतमाल प्रक्रिया, बाजार याकरिता नेमकी तरतूद किती, हेच कळत नाही. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी फारसे काही नाहीच, हेही नंतर स्पष्ट होते.
 

आर्थिक पाहणी अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे वास्तविक चित्र स्पष्ट होणे अपेक्षित असते. अर्थव्यवस्थेच्या विकासाची दिशा आणि गती योग्य आहे की नाही, याबाबत केंद्र शासनाला मार्गदर्शक ठरावा असा हा अहवाल असतो. परंतु मागील काही वर्षांपासून देशातील सर्वसामान्य जनतेला वस्तुस्थितीचा थांगपत्ता लागू न देता मोठमोठी उद्दिष्टे ठेवून काल्पनिक विश्वात बुडवून टाकण्याचेच केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे. आर्थिक पाहणी अहवालातून जागतिक तसेच देशाचा विकासदर सातत्याने घसरत असल्याचे पुढे आले आहे. कृषी विकासदरातील घसरण तर फारच चिंताजनक आहे. चालू आर्थिक वर्षात शेती-उद्योग-सेवा या क्षेत्राची वाढ, देशांतर्गत मागणी आणि खप, आयात-निर्यात, देशात होणारी गुंतवणूक यापैकी कशातच सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नसताना विकासदर वाढीची भाबडी आशा आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

व्यापारयुद्धाचे चटके बसायला आपल्याला सुरवात झाली आहे. अमेरिका, चीन हे देश आपल्या नाड्या आवळत आहेत. याचा प्रतिकूल परिणाम निर्यातीवर होतोय. आजपर्यंत अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम शेतीने केले आहे. देशात मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी-शेतमजूर वर्गाच्या खिशात पैसा असेल, तर औद्योगिक उत्पादनांना मागणी वाढते, खपही होतो. यातून उद्योग-व्यवसायाची पण भरभराट होते. असे असताना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी धोरणेच राबविली जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे (शेतमालास रास्त भाव) द्यायचे सोडून महिन्याला पाचशे रुपयांच्या अशाश्वत आर्थिक मदतीतून ग्रामीण भागातील उत्पन्नवाढीचे स्वप्न पाहणे म्हणजे शासनाचा हा दळभद्रीपणाच म्हणावा लागेल.  

वर्ष २०१९-२० साठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून देशातील शेती, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असे वाटत असताना येथेही शेतकरीवर्गाचा मोठा भ्रमनिरास झालेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन्ही अर्थसंकल्पात शेती-ग्रामविकासावर फोकस होता. अर्थात या क्षेत्रांसाठी तेव्हाही तरतुदी कमीच होत्या. परंतु अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी-गोरगरीब वर्गांसाठीच आहे, असे दाखविले जात होते. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर या वर्गाचा केंद्र सरकारला विसरच पडलेला दिसतो. ‘गरज सरो वैद्य मरो’ असाच हा प्रकार आहे. गंमत म्हणजे अर्थसंकल्प सादरीकरणाच्या ठराविक पद्धतीलाच बगल देण्यात आली आहे. त्यामुळे शेती, सिंचन, कृषी पतपुरवठा, शेतमाल प्रक्रिया, बाजार याकरिता नेमकी तरतूद किती, हेच कळत नाही. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी फारसे काही नाहीच, हेही नंतर स्पष्ट होते. हवामानबदलाच्या काळात शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यांचा अवलंब गरजेचाच झाला आहे. शेतमाल विक्रीसाठी ऑनलाइन, डिजिटल मार्केटिंगचा वापर करावा, असे शासनाकडूनच सांगितले जात आहे. अशा वेळी ‘झिरो बजेट’ शेतीच्या हवाली शेतकऱ्यांना करणे म्हणजे शासनाच्या बौद्धिक दिवाळखोरीचा कळस म्हणावा लागेल.

सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आजही देशभरातील काही शेतकरी स्वेच्छेने करतात. अशा शेतीवर थोडा कमी खर्च होतो. परंतु एक पैसाही खर्च न करता शेती होऊच शकत नाही. झिरो बजेट शेती ही देशातील तमाम शेतकरी वर्गाची दिशाभूल आहे. यात उत्पादनाची काहीही शाश्वती नाही. अनेक झिरो बजेट करणाऱ्या शेतकऱ्यांनी यांस रामराम ठोकून अत्याधुनिक शेतीची कास धरली आहे. अशा वेळी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी झिरो बजेट शेती धोरण म्हणून राबवीत असेल तर याला काय म्हणावे तेच कळत नाही. अन्नधान्यात आजही आपण अंशतः स्वयंपूर्ण आहोत. डाळी, खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात करण्याची नामुष्की आपल्यावर दरवर्षी ओढवते. देशात कडधान्य आणि तेलबियांना प्रोत्साहन दिले तर यात स्वयंपूर्ण व्हायला वेळ लागत नाही. परंतु याबाबतही शासनाचे ठोस असे काही धोरण नाही, हेच अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. 

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतून वाढली...मध्यस्थांचा अडथळा दूर होऊन शेतकरी ते ग्राहक अशी...
पावसामुळे पिकांचे नुकसान सुरुचपुणे  : राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे  : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात...
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...