विना `सहकार` नाही उद्धार

आता सहकारला पुन्हा लोकचळवळ बनवायचे असेल, तर प्रथमतः लोकप्रतिनिधींनी आपली मानसिकता बदलायला हवी.
संपादकीय
संपादकीय
ग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत असताना येणाऱ्या काळात सहकार ही लोकचळवळ बनेल, असा विश्वास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान नुकताच व्यक्त केला आहे. मागील दीड-दोन दशकांपासून सहकाराला उतरती कळा लागणे सुरू झाले असून, सध्या अत्यंत वाईट अवस्थेत हे क्षेत्र आहे. सहकाराचा असा ऱ्हास देश विकासाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे सहकार चळवळ पुन्हा उभी करावी लागेल, असे एक प्रकारे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केवळ सरकारच्या भरवशावर विकास होणे शक्य नव्हते. खासगी उद्योग आपापल्या परीने उभे राहून त्यांची वाटचाल सुरू होती, परंतु त्यात देशातील सर्वसामान्य नागरिकांचा थेट सहभाग नव्हता. देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या अनुषंगाने आपण सहकार हा मधला मार्ग निवडला होता. खरे तर आपल्या राज्यात सहकाराची बीजे सुमारे १०० वर्षांपूर्वी रोवली गेली. ‘एकमेकांच्या सहकार्यातून सर्वांचाच विकास’ या संकल्पनेवर राज्यात सहकार रुजला, फुलला. १९६०, ७०, ८० ही दशके सहकाराच्या दृष्टीने अनुकूल असा काळ होता. याच काळात सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ, पतसंस्था, बॅंका, खरेदी-विक्री संघ आदी शेती संलग्न क्षेत्रात राज्याने उल्लेखनीय कामगिरी केली. याचा फायदा सहकाराशी संबंधित सर्वांनाच झाला. राज्यातील सहकाराचा आदर्श पुढे देशभर पोचला. सर्वांसाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते जोपर्यंत सहकारात होते, तोपर्यंत सहकार चळवळीला देशभर भरभराट लाभली होती. सर्वांच्या हितापेक्षा स्वहित जपण्यास सहकारात सुरवात झाली, राजकारणाची कीड लागली आणि या किडीने सहकारला गिळंकृत केले. आज सहकार क्षेत्रातील बहुतांश संस्था आजारी आहेत. काही संस्था बंद पडल्या तर अनेक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नवीन आर्थिक धोरण, मुक्त अर्थव्यवस्थेचा रेटाही सहकारला सहन झाला नाही. याच काळात सहकारला असलेला सरकारचा आधारही काढून घेण्यास सुरवात झाली. पूर्वी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळातर्फे सहकारी संस्थांना कर्ज मिळत होते. या कर्जाची हमी सरकार घेत होते. शासनाकडूनही अनेक सहकारी संस्थाना मोठे भागभांडवल, अनुदान मिळत होते. हे सर्व आता कमी झाले आहे, किंबहुना बंदच झाले आहे. विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार सहकारने तंत्रज्ञानाचा अवलंब केला नाही. आपले मनुष्यबळ प्रशिक्षित केले नाही. या सर्वांचा परिपाक म्हणजे आपल्या राज्यात, देशात सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. आता सहकारला पुन्हा लोकचळवळ बनवायचे असेल तर प्रथमतः लोकप्रतिनिधींनी आपली मानसिकता बदलायला हवी. सहकार म्हणजे स्वाहाकार नसून सहकार म्हणजे सर्वांचा उद्धार हे लक्षात घ्यायला हवे. सहकारात जलद निर्णय होत नाहीत, कामे गतीने मार्गी लागत नाहीत, हे सत्य असून, शासन आणि प्रशासनाने अनुक्रमे कायदे-नियमावलीत दुरुस्ती आणि कामकाजात बदल करून सहकारला गतिमान करावे. शासनाने सहकारच्या भागभांडवलात वाढ करावी. सहकारी संस्थांनीसुद्धा तंत्रज्ञानाचा अवलंब आणि मनुष्यबळास प्रशिक्षित करून सरकारी तसेच खासगी क्षेत्राशी स्पर्धा वाढवायला हवी. असे झाले तरच सहकारी चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होऊन या क्षेत्राची पुन्हा भरभराट पाहावयास मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com