कापूस उत्पादकता वाढीची दिशा

भारत हा एकमेव असा देश आहे, जेथे मोठ्या प्रमाणात बीटी संकरीत वाणांची लागवड केली जात असून, बहुतांश देशाच्या तुलनेत आपली कापूस उत्पादकता कमी आहे.
संपादकीय
संपादकीय

देशात बीटी तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वी कापसाची उत्पादकता प्रतिहेक्टर ३०० ते ३५० किलो रुई होती. बीटीच्या आगमनानंतर ही उत्पादकता ५०० ते ५५० किलोवर पोचली. मागील एका दशकापासून कापसाची उत्पादकता ५० किलो रुई प्रतिहेक्टर अधिक, उणे असे चालले आहे. देशाने बीटी तंत्रज्ञान स्वीकारल्यावर एक-दीड दशकापर्यंत तर आता कापसाचे सारे आलबेल झाले, त्यात काही करायची गरजच नाही, असाच समज झाला होता; परंतु २०१२-१३ पासून बीटी कापसाची उत्पादकता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावाने, तसेच घटत चाललेल्या उत्पादकतेमुळे शास्त्रज्ञ आणि शासनाला जाग आली असली तरी या दोन्ही पातळ्यांवर अजूनही फारसे काही होताना दिसत नाही. कापूस लागवडीत आघाडीवरच्या आपल्या देशाची उत्पादकता पाकिस्तान, कझाकिस्तान, इजिप्त या देशांपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे चीन, तुर्की, ऑस्ट्रेलिया, ब्राझील या विकसित देशांची कापूस उत्पादकता आपल्यापेक्षा तीन ते साडेतीन पटींनी अधिक आहे. यावरूनही मागील अनेक वर्षांपासून आपण काहीच बोध घेणार नसेल, तर ही बाब अधिक गंभीर आहे. 

प्रगत देशांत शेतकऱ्यांची जमीनधारण क्षमता अधिक असल्याने तिथे यांत्रिक शेतीच केली जाते. कापसामध्ये तर लागवडीपासून काढणीपर्यंत बहुतांश कामे यंत्रांनी केली जातात. कापसातील पीकसंरक्षण अधिक शास्त्रीय पद्धतीने आणि एकत्रितरीत्या केले जाते. प्रगत देशांतील कापूस बहुतांश बागायती पद्धतीनेच घेतला जातो. या बाबींमुळे त्यांची कापसाची उत्पादकता अधिक असली तरी उत्पादकतेत जगात आघाडीवरील देशांनी आपल्या सोईनुसार बीटी तंत्रज्ञान स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांच्या माती आणि हवामानाशी समरस असलेल्या स्थानिक सरळ वाणांत बीटी आणले. अशा वाणांची सघन लागवड करून या देशांनी उत्पादकतेत आघाडी घेतली आहे. जगामध्ये जवळपास ८० देश कापूस लावतात. त्यात भारत हा एकमेव असा देश आहे, जेथे मोठ्या प्रमाणात बीटी संकरीत वाणांची लागवड केली जात असून, बहुतांश देशांच्या तुलनेत आपली कापूस उत्पादकता कमी आहे. 

बीटी संकरीत वाणांचे बियाणे दरवर्षी शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागते. या वाणांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीवरील खर्च वाढला आहे. उत्पादकताही सातत्याने घटत आहे. त्यामुळे संकरीत बीटी कापसाची शेती तोट्याची ठरत आहे. अशावेळी देशात सरळवाणांत बीटी आणण्याचे धोरण प्रभावीपणे राबवायाला हवे. केंद्रिय कापूस संशोधन संस्थेने देशातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने आशादायक अमेरिकन सरळ वाणांत बीजी-१ जनुक प्रत्यारोपित करून काही वाणांचे परीक्षण केले आहे. त्यांचे रिझल्ट्स चांगले आहेत. महाराष्ट्रासाठी सहा बीटी सरळवाणांची सघन पद्धतीने लागवडीसाठी शिफारसदेखील करण्यात आली आहे. या वाणांखालील क्षेत्र राज्यात हळूहळू वाढवावे लागेल. बीटी सरळवाणांद्वारे बियाणे, रासायनिक खते आणि कीडनाशके यावरील खर्च कमी करून कापूस उत्पादकांना किफायतशीर मिळकतीकडे वळवावे लागेल. त्यानंतर सरळवाणांचे सघन लागवड तंत्र, एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन, सिंचनाची सोय, यांत्रिकीकरण याद्वारे कापसाच्या उत्पादकतेत आपल्यालाही प्रगत देशांच्या पंक्तित बसता बसता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com