नाशवंत नव्हे; उपयुक्त

सीताफळाबरोबर पेरू, आंबा आदी फळांचा गर एकाच मशीनद्वारे काढता आला तर कोल्ड स्टोरेज यंत्रणेचा वापर हंगामनिहाय विविध फळपिकांसाठी होऊ शकतो.
संपादकीय
संपादकीय

सुमारे चार दशकापूर्वी सीताफळ हे रानोमाळी विखुरलेल्या अवस्थेत आढळत होते. भरपूर पोषण आणि औषधीमूल्ययुक्त तेवढेच मधुर चवीच्या या फळपिकांच्या बागा अगोदर सासवड परिसरात उभ्या राहिल्या. १९७२ च्या दुष्काळानंतर या फळपिकाचे महत्त्व राज्यातील शेतकऱ्यांना उमगले. प्रगतशील शेतकऱ्यांच्याच प्रयत्नातून आज या पिकाखालील क्षेत्र ७० हजार हेक्टरवर पोचले आहे. असे असतानादेखील संशोधन, मूल्यवर्धन पातळीवर अजूनही हे फळपीक दुर्लक्षितच म्हणावे लागेल. सीताफळ हे नाशवंत फळपीक आहे. पूर्ण पिकलेले फळ दोन दिवसापेक्षा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळेच अत्यंत गुणकारी अशा या फळपिकास बाजारात दर कमीच मिळतो. सीताफळावर प्रक्रिया करायची म्हणजे याचा गर काढावा लागतो. गराचा उपयोग मिल्क सेक, ज्यूस, बासुंदी, रबडी, आईसक्रीम आदी मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी होतो. सीताफळाचे गर काढण्याचे यंत्र आत्तापर्यंत उपलब्ध नव्हते.

मॅन्युअली (हाताने) गर काढणे फारच कष्टदायक होते. त्यामुळे आधी केवळ मुंबई, पुणे अशा शहरांच्या ठिकाणीच सीताफळ गर उपलब्ध होत होता. कृषी विद्यापीठाच्या प्रयत्नातून गर काढणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे छत्तीसगडपासून आपल्या राज्यातील जानेफळपर्यंत सीताफळाचा गर काढण्याची यंत्रे बसविण्यात आली आहेत. जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर सीताफळापासून सीरप, कुल्फी, फ्रिज ड्राईड उत्पादने तयार करून विक्रीस सुरवात केली आहे. राज्यात सीताफळाचे व्यापक प्रमाणावर मूल्यवर्धन होण्यासाठी संशोधन आणि शासन पातळीवर काम होणे गरजेचे आहे.

राज्यात अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. परंतु त्यातील बहुतांश कंपन्यांना अजूनही आपण नेमके काय करायला पाहिजे, याबाबतची दिशा मिळत नाही. अशा कंपन्यांनी जानेफळ शेतकरी उत्पादक कंपनीप्रमाणे आपल्या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध नाशवंत फळे-भाजीपाल्यासह अन्य शेतमालांवर प्रक्रियेचे काम सुरू करायला हवे. कोणताही नवीन उद्योग-व्यवसाय म्हटलं तर अडचणी या येतातच. परंतु, त्याच अडचणी बरंच काही शिकवूनही जातात. राज्यात सीताफळाचा हंगाम केवळ ४५ दिवसांचा असतो. सीताफळाचा गर काढला म्हणजे त्यास उष्णता वगैरे देता येत नाही. काढलेला गर उणे २० अंश सेल्‍सिअसला डिप फ्रिज करावा लागतो. त्याकरिता कोल्ड स्टोरेज, हार्डनर, डिप फ्रिजर अशी यंत्रणा उभारावी लागते. यावर २५ ते ३० लाख रुपये खर्च होतात. सीताफळाचा हंगाम संपला की यंत्रणेचा वापर होत नाही. त्याकरिता मल्टीपर्पज पल्प मशिन उपलब्ध व्हावी, अशी प्रक्रियादारांची मागणी आहे. सीताफळाबरोबर पेरू, आंबा आदी फळांचा गर एकाच मशीनद्वारे काढता आला तर कोल्ड स्टोरेज यंत्रणेचा वापर हंगामनिहाय विविध फळपिकांसाठी होऊ शकतो. तसेच सीताफळाचा हंगाम ४५ दिवसांवरून ६० ते ७५ दिवसांपर्यंत वाढविण्याबाबत पण काम व्हायला हवे.

शेतमाल प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात उभे राहिले पाहिजे, असे म्हटले जाते. विकेंद्रित विकासाच्या दृष्टीने ते अगदी योग्य आहे. परंतु प्रक्रियायुक्त पदार्थांची बाजारपेठ ही प्रामुख्याने मोठ मोठी शहरे आहेत. अशावेळी शेतकऱ्यांचे गट, समूह, कंपन्या यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरात विक्रीसाठी जागा, शीत साठवणूक, जलद वाहतूक अशा सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. असे झाले तरच शेतकऱ्यांच्या कंपन्यांनी उत्पादित केलेली प्रक्रियायुक्त उत्पादने शहरात दिसू लागतील. देशी-विदेशी कंपन्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांबरोबर ही उत्पादने स्पर्धा करू लागतील. नाशवंत फळे-भाजीपाला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने उपयुक्त वाटू लागेल. 



Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com