ज्ञानाचा प्रकाश

प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याची जिद्द अंगीकारली पाहिजे. त्यासाठी अर्थातच ज्ञानाचा आधार घ्यावा लागेल, की जी नव्या युगाची भाषा आहे!
संपादकीय
संपादकीय

दिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं पाठीशी टाकून कुटुंबीयांसमवेत सुखाची तोरणं लावण्याचा, आनंदाच्या लवलवत्या ज्योती पाजळण्याचा सण! वर्ष कसंही गेलं तरी बळिराजाला आस असते ती दिवाळीच्या सणात कुटुंबीयांमध्ये आनंदाची पेरणी करण्याची! तुरीचं काय झालं, कापूस काय भावानं जाईल, सोयाबीनचं काय होणार याची चिंता त्याच्या डोक्‍यात असतेच. थोड्या वेळासाठी ती दूर ठेवून आनंदाच्या, सुखाच्या सावलीत विसावण्यासाठी दिवाळीचे तेजाळलेले हे दिवसच त्याच्या मदतीला येतात. कारभारीण गोडधोड करण्याच्या तयारीत आकंठ बुडालेली असते, घरातलं गोकूळ नवी कापडं घालून आनंदाच्या झुल्यावर झुलत असतं. दारातला आकाशकंदील, देवडीतल्या पणत्या आकाशातल्या नक्षत्र, ताऱ्यांना हिणवत असतात. सारवलेल्या अंगणातली नक्षीदार ठिपक्‍यांची रांगोळी सुखाच्या स्वागताला आतुरलेली असते. अशा प्रकाशमय वातावरणात भल्या पहाटे दिवाळी नटून थटून बळीराजाच्या अंगणात, घरात प्रवेश करते.  

ज्ञानाचा अंधार दूर व्हावा हा संदेशही दिवाळी देत असते. शेतकऱ्याच्या दृष्टीनं तो खूप महत्त्वाचा आहे. ज्ञान हे आधुनिक काळातलं महत्त्वाचं हत्यार झालं आहे. एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकाच्या इतिहासावर लढाया आणि युद्धांचा पगडा होता. अनेक देश वसाहतवाद्यांच्या नियंत्राणाखाली पारतंत्र्यात होते. केवळ तगणं आणि जगणं इतकंच लोकांच्या हातात होतं.

भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वातंत्र्यानंतर काळ बदलला. सुरवातीच्या काळात धरणं, वीज प्रकल्प, पोलाद उद्योग अशी पायाभूत कामं झाली. लोकांच्या आशा-आकांक्षा वाढत गेल्या. यथावकाश भारतानं आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. त्यामुळं आर्थिक आघाडीवर देशानं मोठी झेप घेतली. याचा सर्वाधिक फायदा उद्योग आणि सेवा क्षेत्राला झाला. शतकानुशतकं अंधकारात राहिलेली शेती जागतिकीकरणाच्या युगातही मागासच राहिली किंवा ती तशी ठेवली गेली. माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंपर्क सुविधांचा सर्वाधिक लाभ उद्योग आणि सेवा क्षेत्रानंच उठवला. शेतीमध्ये या अंगानं जे काही झालं ते अर्धवट आणि अर्ध-कच्चंच! शेतीवर अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकसंख्येच्या हाती पुन्हा तगणं आणि कर्जाचा बोजा घेऊन जगणं इतकंच उरलं.  

असं सारं असलं तरी प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याची जिद्द अंगीकारली पाहिजे. त्यासाठी अर्थातच ज्ञानाचा आधार घ्यावा लागेल, की जी नव्या युगाची भाषा आहे! नवनव्या ज्ञानाचा अवलंब करून कृषी आणि पूरक क्षेत्रात बहादुरी दाखवणाऱ्या भूमिपूत्रांच्या यशोगाथांनी सजलेला ‘ॲग्रोवन’चा दिवाळी अंक हाच संदेश घेऊन वाचकांच्या भेटीला आला आहे. ‘उद्याची शेती’ या संकल्पनेभोवती गुंफलेला हा अंक शेतकऱ्यांना भविष्यभान देणारा ठरला आहे. या अंकात शेती क्षेत्रात काय काय होऊ घातलं आहे, याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे.

प्रयोगशाळांत मांस, दूध आणि अंडी बनवण्याचे प्रयोग आता अंतिम टप्प्यात पोचले आहेत. येत्या दोन-पाच वर्षांत हे कृत्रिम पदार्थ बाजारात दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे ते शाकाहारी असतील. आरोग्यदायी असतील. त्यांची चव आणि पोषणमूल्यं मूळ पदार्थांसारखीच असतील. पाचेक वर्षांपूर्वी कल्पनेत साकारलेली मजल्यांची शेती आता वास्तवात उतरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) क्षेत्रात अनेक घडामोडी सुरू आहेत. मानवी श्रम कमी नव्हे; तर हद्दपार करणारे शोध लावले जाताहेत. त्यातून लक्षावधी रोजगार बुडण्याची शक्‍यता आहे. विज्ञान-तंत्रज्ञान नाकारता येणार नाही. त्याला मदतीला घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. नव्या युगाचा तोच संदेश आहे. त्याचा स्वीकार करण्यात, त्याला सामोरं जाण्यातच हित आहे. त्यासाठी शेतकऱ्याला अधिकाधिक बळ लाभो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com