मुक्त शिक्षण एक मंथन

मुक्त विद्यापीठांनी नेमके कोणते अभ्यासक्रम चालू ठेवावेत अथवा कोणत्या विषयांच्या पदव्या, कोणत्या स्तरापर्यंत प्रदान कराव्यात यावर देशात व्यापक विचार मंथन होणे आता गरजेचेच आहे.
संपादकीय
संपादकीय

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पीएच.डी. ‘महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदे’च्या (एमसीएईआर) कक्षेत काम करणाऱ्या मंडळाने अवैध ठरविली होती. मुक्त विद्यापीठातील पीएच.डी. ही कृषी विद्यापीठांमध्ये मिळणाऱ्या पीएच.डी.च्या समकक्ष मानण्यास मंडळाने नकार दिला होता. त्यांच्या या निर्णयाने अधिष्ठाता पदांच्या नेमणुका रद्द कराव्या लागल्या होत्या. त्या वेळी संबंधितांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कान पिळल्यावर एमसीएईआरच्या मंडळाने तडकाफडकी आपली भूमिका बदलून मुक्त विद्यापीठाच्या पीएच.डी.ला आता मान्यता दिली आहे. मुक्त विद्यापीठांना ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ची (युजीसी) मान्यता आहे. राज्य शासनानेसुद्धा त्यास मान्यता दिली आहे. अशावेळी एका मान्यताप्राप्त विद्यापीठाची एखाद्या शाखेची पदवी त्याच देशातील दुसऱ्या विद्यापीठाच्या त्याच शाखेतील पदवीशी समकक्ष समजली जाते. या नियमाच्या आधारे उच्च न्यायालयाने मुक्त विद्यापीठाच्या २००९ पर्यंतच्या पीएच.डी.ला मान्यता दिली आहे. ज्या पदवीवर एखाद्याला नोकरी मिळाली, अगोदर काही बढत्यादेखील मिळाल्या, तीच पदवी पुढील नियुक्ती अथवा बढतीसाठी अमान्य ठरवणे हे योग्य नाही. मुक्त विद्यापीठांच्या काही पदव्यांबाबत अनेक ठिकाणी भरती, नियुक्ती, बढतीबाबत वाद निर्माण होत असतात. अशावेळी मुक्त विद्यापीठांनी नेमके कोणते अभ्यासक्रम चालू ठेवावेत अथवा कोणत्या विषयांच्या पदव्या, कोणत्या स्तरापर्यंत प्रदान कराव्यात यावर देशात व्यापक विचार मंथन होणे आता गरजेचेच आहे.

आर्थिक परिस्थितीसह इतरही अनेक कारणांमुळे देशातील काही तरुण दहावी, बारावीनंतरचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. तर काहींना ते अर्धवट सोडावे लागते. असे तरुण शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांचे कमी अथवा अर्धवट शिक्षण त्यांच्या नोकरी-व्यवसायात अडसर ठरू नयेत, याकरिता देशात मुक्त विद्यापीठांतर्गत शिक्षण (दूरस्थ शिक्षण) सुरू करण्यात आले. आपल्याकडे मुक्त विद्यापीठांमध्ये सध्या विविध पदविका, पदवी, पदवीत्तर तसेच डॉक्टरेट (पीएच.डी.) असे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचा लाभ अनेकांनी घेतला आहे, घेत आहेत. अशावेळी मुक्त विद्यापीठांमधील टेक्निकल अभ्यासक्रमांबाबत मात्र वारंवार शंका उपस्थित केल्या जातात. काही वेळा असे अभ्यासक्रम नियमित विद्यापीठांच्या समकक्ष, समतुल्य मानले जात नाहीत, त्यात तथ्यदेखील आहे. बीएसस्सी कृषीसारखे अनेक तांत्रिक विषय हे प्रात्यक्षिकांवर आधारित असतात. शिवाय मुक्त आणि नियमित विद्यापीठांमधील एकाच शाखेच्या पदवीसाठीच्या अभ्यासक्रमात (कंटेन्ट) मोठा बदल असतो. कृषीमधील पीएच.डी.त एखादा नवीन विषय, समस्या घेऊन त्यावर संशोधन करावे लागते. त्याचे निष्कर्ष विद्यापीठ कमिटीपुढे ठेवावे लागतात. ते निष्कर्ष कमिटीने मान्य करावे लागतात. मार्गदर्शकांच्या मदतीने याबाबतचा प्रबंध सादर करावा लागतो. ही सर्व कामे मुक्त विद्यापीठात कितपत होतात, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठांनी बीएसस्सी कृषी, पीएच.डी. असे अभ्यासक्रम बंद करून बीए, बीकॉम, जनरल बीएस्सी अशाच पदव्या देण्याचे काम करावे. फारतर पदवीपर्यंतच कोणत्याही शाखेचे तांत्रिक शिक्षण द्यावयाचे झाल्यास मुक्त विद्यापीठांनी आपल्या विभागीय केंद्रात संबंधित विषयांतील प्रात्यक्षिकांबाबतच्या सर्व पायाभूत सुविधा उभारायला हव्यात. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे काही दिवस प्रात्यक्षिके घ्यायला हवीत. शिक्षण मग ते कोणतेही असो गुणवत्ता हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो. त्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड होता कामा नये, एवढी दक्षता मुक्त तसेच नियमित विद्यापीठांनी घ्यायलाच हवी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com