‘लष्करी अळी’चा विळखा

वर्षभरापासून देशात अमेरिकन लष्करी अळी ही कीड धुमाकूळ घालत असून, याचा प्रसार रोखण्यापासून ते प्रभावी नियंत्रणापर्यंत केंद्र-राज्य शासन पातळीवर गोंधळच दिसतो.
संपादकीय
संपादकीय

मेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म) या किडीला देशात दाखल होऊन एक वर्ष उलटले आहे. गेल्या वर्षीच्या (२०१८) खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत या किडीने मका, मधुमका, नाचणी, ज्वारी, भात, ऊस आदी पिकांवर हल्ला चढवून ही पिके फस्त केली. कर्नाटकामध्ये प्रथमतः नोंद झालेली ही कीड एकाच वर्षात दक्षिण, मध्य आणि उत्तर भारतातही पोचली. गेल्या हंगामात अमेरिकन लष्करी अळीने देशातील अडीच लाख हेक्टरवरील पिकांवर (प्रामुख्याने मका) हल्ला चढवून त्यांचे मोठे नुकसान केले, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे. हा आकडा सरकारी असून, प्रत्यक्षात झालेले नुकसान यापेक्षा अधिक आहे. चालू खरिपात महाराष्ट्रासह बहुतांश राज्यात अजून पेरणीला सुरवातही झालेली नाही. तरीही देशातील १४ राज्यांमध्ये १३ हजार हेक्टरवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. राज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील दोन गावांत चालू खरिपात मका पिकावर ही कीड आढळून आली आहे. यावरून या घातक किडीचा प्रसार देशात किती झपाट्याने होत आहे, हे लक्षात यायला हवे. अमेरिकन लष्करी अळीचे देशावरील संकट हे ‘बायोलॉजिकल वॉर’ असल्याची (जैविक युद्ध) शंका ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी यांनी व्यक्त केली आहे. याची खातरजमा शासनाने करायला हवी. हा खरोखरच तसा प्रकार असेल तर तो थांबविण्यासाठी केंद्र शासनाची काय रणनीती आहे, हेही स्पष्ट व्हायला पाहिजे.

अमेरिकन लष्करी अळी ही बहुभक्षी कीड आहे. या किडीचे आवडीचे खाद्य मका असले तरी जवळपास ८० पिकांवर ही कीड आपली उपजीविका भागवू शकते. यांत प्रामुख्याने अन्नधान्ये तसेच नगदी पिकांचा समावेश असल्याने देशाला अन्नसुरक्षेबरोबर पशु-पक्षी खाद्यपुरवठा तसेच साखर, कापड असे प्रमुख उद्योगही धोक्यात येऊ शकतात. असे असताना वर्षभरापासून देशात ही कीड धुमाकूळ घालत असताना, याचा प्रसार रोखण्यापासून ते प्रभावी नियंत्रणापर्यंत केंद्र-राज्य शासन पातळीवर गोंधळच दिसतो. दुसऱ्या देशातून भारतात ही कीड पोचली म्हणजे प्रथमतः क्वारंटाईन विभागाला किडीचा देशात प्रवेश रोखण्यात अपयश आले आहे. त्यानंतर या किडीचा देशात झपाट्याने प्रसार होत असताना तो रोखण्यातही शासन-प्रशासन अपयशी ठरतेय. केंद्रीय कृषी विभागाने ६ मे २०१९ रोजी या किडीच्या व्यवस्थापनासाठी काढलेल्या परिपत्रकामध्ये इतर अळीवर्गीय किडींच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठीचे एकात्मिक व्यवस्थापनातील महत्त्वांच्या घटकांवर भर दिला आहे. अर्थात यात वावगे काहीच नाही; परंतु रासायनिक नियंत्रणात बीज प्रक्रियेसाठी शिफारस केलेली कीडनाशके देशात नोंदणीकृत नाहीत. मका पिकाबाबतच्या राष्ट्रीय स्तरावरील समन्वयित संशोधन प्रकल्पात त्यांच्या चाचण्याही घेण्यात आल्या नव्हत्या. अशा शिफारशी शेतकरी तसेच बीजोत्पादकांच्या प्रयोग, अनुभव या आधारे देण्यात आल्या असे त्या परिपत्रकात म्हटले होते. घातक अशा किडीच्या नियंत्रणासाठी केवळ शेतकऱ्यांच्या अनुभवावर अवलंबून राहणे उचित ठरणार नाही. २८ मे २०१९ ला केंद्रीय कृषी मंत्रालयाने दुसरे परिपत्रक काढून या किडीच्या नियंत्रणासाठी नोदणीकृत तीन कीडनाशकांची शिफारस केली आहे. ही कीडनाशकेही या किडीच्या नियंत्रणासाठी कितपत प्रभावी ठरतील, याबाबत शंकाच आहे. 

अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव चीन, तैवान या मका उत्पादक देशांतही मोठ्या प्रमाणात आढळून येतोय; परंतु हे देश या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आज सज्ज आहेत. चीनने या लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी २४ कीडनाशकांची अभ्यास, प्रयोगांती शिफारस केली आहे. तसेच या किडीला नष्ट करण्यासाठी मित्रकीटकांच्या शोधात ते होते, त्यातही त्यांना यश आले आहे. तैवानकडे या किडीच्या प्रथम प्रादुर्भावापासूनच्या सर्व नोंदी आढळून येतात. तैवान प्रशासन या किडीबाबत अत्यंत गंभीर असून, टास्क फोर्समार्फत तेथील शेतकऱ्यांना किडीच्या नियंत्रणाबाबत इत्थंभूत माहिती दिली जातेय. आपल्या शासन-प्रशासनाला अशी जाण आणि भान केव्हा येणार? 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com