बाजारातील ‘वाळवी’

शिवार सौद्यात उच्च मूल्य असलेल्या द्राक्ष या फळपिकाचे उचित मूल्य उत्पादकांच्या पदरी तर पडतच नाही, उलट यात व्यापारी अनेक प्रकारे उत्पादकांना गंडवतच असतात.
संपादकीय
संपादकीय

सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड स्टोरेजचा मालक परिसरातील १५० हून अधिक शेतकऱ्यांच्या नावे एका राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून २१ कोटींचे कर्ज उचलून पसार झाला होता. आता याच जिल्ह्यात जवळपास ४०० व्यापाऱ्यांनी एक हजारवर द्राक्ष उत्पादकांना १०० कोटीहून अधिकचा गंडा घातला आहे. द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांकडून लुटीचे असे प्रकार नाशिक जिल्ह्यातही दरवर्षी घडत असतात. खरे तर नफेखोर व्यापारी शेतकऱ्यांना वाळवीसारखे पोखरत आहेत. निविष्ठा पुरविणारे व्यापारी बोगस, भेसळयुक्त, अप्रमाणित निविष्ठा शेतकऱ्यांच्या माथी मारतात. बाजार समित्यांमध्ये जावे तर तेथेही अनेक कुप्रथांद्वारे शेतकऱ्यांची लूट चालूच आहे. शेतमालाचे भाव पाडण्यात व्यापाऱ्यांचा हातखंडाच असतो. बाजार समितीबाहेरील खेडा खरेदीत सोयाबीन, कापसापासून ते द्राक्ष, डाळिंबापर्यंत शेतमालाची खरेदी करून पैसे न देता पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. आधीच बदलत्या हवामानात शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांची कसोटी पणाला लागत आहे. त्यात द्राक्षासारखे पीक असेल, तर त्यास फारच जपावे लागते. द्राक्ष उत्पादनात बहुतांश शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याने त्यावर होणार खर्चही अधिक असतो. दुर्दैवाची बाब म्हणजे द्राक्ष उत्पादन आणि निर्यातीत आघाडीवरच्या राज्यात देशांतर्गत विक्री असो की निर्यात, यासाठीची सक्षम यंत्रणा आजतागायत उभी राहू शकली नाही. त्यामुळे शिवार सौद्याशिवाय द्राक्ष उत्पादकांना पर्याय नाही. अशा सौद्यात उच्च मूल्य असलेल्या या फळपिकांचे उचित मूल्य उत्पादकांच्या पदरी कधी पडत नाही, उलट यात व्यापारी अनेक प्रकारे उत्पादकांना गंडवतच असतात.

खरे तर द्राक्ष विक्रीव्यवस्थेवर बाजार यंत्रणेसह शासनाचेही काहीही नियंत्रण दिसत नाही. द्राक्ष विक्रीतील घसघशीत नफा पाहता त्यात शेतीचा काहीही संबंध नसलेले हॉटेल, बांधकाम व्यावसायिक उतरत आहेत. एका जिल्ह्यात हजारो व्यापारी मध्यस्थांच्या मार्फत व्यापार करतात. यात मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल अशा परराज्यांतून येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या अधिक असते. विशेष म्हणजे, त्यांची नोंद कुठेच आढळून येत नाही. सांगली जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून केले असता, त्यास बाजार समित्यांनी दाद दिली नाही. यंत्रणेच्या अशा उदासीनतेतून फसवणुकीत सराईत व्यापाऱ्यांचे चांगलेच फावते. सांगली जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून फसवणुकीबाबतच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच न वठलेले धनादेश आहेत. यावरून या बोगस व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हायला हवी. याकरिता जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणेने पुढाकार घ्यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे आता ऑक्टोबरनंतर पुढील द्राक्ष हंगाम सुरू होणार आहे. त्यात व्यापाऱ्यांकडून असे फसवणुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून आतापासूनच संबंधित सर्वांनी कंबर कसायला हवी. शेतात पिकांच्या मुळ्या कुरतडणाऱ्या वाळवीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक नियंत्रण पद्धतीची शिफारस केली जाते. बाजार व्यवस्थेतील व्यापारी रुपी वाळवीच्या प्रतिबंधासाठीसुद्धा द्राक्ष बागायतदार संघ, कृषी व पणन विभाग आणि पोलिस यंत्रणा यांच्या एकत्रित प्रयत्नांतून सक्षम संरक्षण यंत्रणा उभी करावी लागेल. बोगस व्यापारी शोधून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला हवे. असे व्यापारी राज्यात कुठेही, कोणताही व्यवहार करणार नाहीत, याची खबरदारी यंत्रणेने घ्यायला हवी. शिवार सौदे हे शक्य तो रोखीने आणि परवानाधारक तसेच नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडूनच व्हायला हवेत. परवानाधारक व्यापाऱ्यांकडून त्यांच्या व्यवहाराच्या प्रमाणात ठरावीक अमानत रक्कम द्राक्ष बागायतदार संघाकडे जमा करून घ्यावी. असे झाले तरच व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीस आळा बसेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com