खुला व्यापार; फायदे अपार

अस्थिर परिस्थिती; तसेच संभ्रमाच्या वातावरणात व्यापारी निर्यातीचे नियोजन करू शकत नाहीत. ही परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानला शेतीमालाची निर्यात वर्षभर खुली असायला हवी.
sampadkiya
sampadkiya

अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापारयुद्ध सुरू असून, या दोन्ही   देशांना शेतीमाल निर्यात वाढविण्याची आपल्याला चांगली संधी आहे; पण या संधीचा अद्याप तरी आपण योग्य तो लाभ उचललेला नाही. कारण जागतिक बाजारातही मंदीचे वातावरण आहे. शेतीमालाचे दर तर खूपच खालावलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच निर्यात खोळंबली आहे. व्यापारस्पर्धेतून यापूर्वी अनेक व्यापारयुद्धे जुंपली असून, त्याचे परिणाम संबंधित दोन्ही देशांना भोगावे लागले आहेत. भारत पाकिस्तान या दोन शेजारील देशांत शेतीमालाची मोठी आयात-निर्यात होते; परंतु दोन्ही देशांत नेहमीच तणावपूर्ण स्थिती असते. त्याचा फटका दोन्ही देशांतील उत्पादक शेतकरी आणि उपभोक्ता ग्राहकांना बसत आला आहे. आपल्या देशातून पाकिस्तानमध्ये टोमॅटो, आले, मिरची, आंबा, लिंबू आदी भाजीपाला-फळांसह इतरही शेतीमालाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. साखरेसह काही उत्पादने आपण पाकिस्तानातून आयातही करतो. शेतीमालाच्या आयात-निर्यातीसाठी हे दोन्ही देश एकमेकांना जवळचे आणि सोईचे आहेत. या देशात शेतीमाल पाठविणे अथवा आयात करणे याकरिता वेळ आणि खर्च अत्यंत कमी लागतो. अशावेळी दोन्ही देशांतील व्यापारवृद्धीत दोघांचाही फायदा आहे; परंतु तसे न होता काही ना काही कारणाने सातत्याने दोन्ही देशांत तणाव वाढतो. तणाव वाढला की व्यापारास खीळ बसून दोन्ही देशांचे नुकसानच होते.

अलीकडे पाकिस्तानमधून साखर आयात करण्यात आल्यानंतर आपले टोमॅटो या देशात निर्यात झाले पाहिजेत, अशी मागणी उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. टोमॅटो हे फळभाजीपाला पीक आपल्या देशात बहुतांश राज्यांत हंगामनिहाय घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये हे पीक मात्र शेतकरी वर्षभर (तिन्ही हंगामांत) घेतात. भावाच्या चढ-उतारास हे पीक खूपच संवेदनशील आहे. नोटाबंदीनंतर शेतीमाल बाजारात पसरलेले मंदीचे सावट अजूनही कमी झालेले नाही. मागील वर्षभरापासून टोमॅटो उत्पादकांचा उत्पादन खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. याचा उत्पादन खर्च १० रुपये प्रतिकिलोच्या वर जात असताना शेतकऱ्यांना दर मात्र दोन ते तीन रुपये मिळतोय. टोमॅटोची निर्यात शेजारील पाकिस्तान, बांगलादेशला चालू राहिली, म्हणजे मालास उठाव राहून दरही वधारतात. गुजरातमधील व्यापारी दररोज ५०० टनांच्यावर भाजीपाला (दिल्ली-वाघामार्गे) पाकिस्तानला निर्यात करतात. यात मोठा वाटा हा टोमॅटोचा असतो. आपल्या राज्यातूनही हंगामात टोमॅटोची पाकिस्तानला निर्यात होते; परंतु तणावपूर्ण स्थिती आणि सीमाबंदी यात मुख्य अडसर ठरत आला आहे. ऑगस्टनंतर चार-पाच महिन्यांसाठी निर्यात खुली होईल, असा अंदाज बांधला जात असला, तरी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असते. निर्यातीचे नियोजन व्यापाऱ्यांना दोन-तीन महिन्यांपासून आधीच करावे लागते. अस्थिर परिस्थिती; तसेच संभ्रमाच्या वातावरणात व्यापारी निर्यातीचे नियोजन करू शकत नाहीत. ही परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानला शेतीमालाची निर्यात वर्षभर खुली असायला हवी. केंद्र सरकार पातळीवर कृषी, वाणिज्य, परराष्ट्र धोरण मंत्रालयाने याबाबत सकारात्मक पावले उचलायला हवीत. खेळ आणि व्यापार याद्वारे दोन देशांतील तणाव कमी होतो, मैत्रीपूर्ण सौहार्दतेचे वातावरण निर्माण होते. अशावेळी दोन्ही देशांनी व्यापारवृद्धीसाठी पुढाकार घ्यायला हवा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com