agriculture stories in marathi agrowon agralekh on high iron content variety of rice | Agrowon

एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेने
विजय सुकळकर
सोमवार, 22 जुलै 2019

सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील तांदूळ, आटा, मैदा, मीठ, तेल आणि दूध अशा खाद्यपदार्थांचे प्रक्रियेद्वारा पोषणमूल्य वाढविले तर कुपोषण दूर करण्यासाठीचे ते एक फार मोठे काम होईल. 
 

शे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि शासनाचे धोरण यातून देशात हरितक्रांती यशस्वी झाली. असे असले तरी आज देशासमोर कुपोषणाचे मोठे आव्हान उभे आहे. दारिद्र्यामुळे बऱ्याच लोकांना पोटभर अन्न मिळत नाही, तेथे पोषणयुक्त आहाराचा विचार केला जात नाही. देशात पाच वर्षांखालील सुमारे ५८ टक्के बालके कुपोषित आहेत. शाळेत जाणाऱ्या ५० टक्के मुली आणि गर्भवती महिला अनेमियाग्रस्त (लोह कमतरता) आहेत. त्यामुळे देशात बालमृत्यू आणि मातामृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. कुपोषित मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ होत नसल्याने अशी मुले पुढे काहीही काम करू शकत नाहीत.

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपले स्थान तळ गाठून आहे. कुपोषणाच्या बाबतीत नेपाळ, म्यानमार, बांगलादेश अशा छोट्या आणि गरीब देशांची स्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे. अशा वेळी भूकेविरुद्ध आपण नव्याने पोषणक्रांतीसाठी सज्ज होण्याची गरज हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन सातत्याने व्यक्त करीत असतात. दुर्दैवाची बाब म्हणजे आजही नवीन संशोधनामध्ये केवळ उत्पादनवाढ हेच मुख्य उद्दिष्ट ठेवले जाते. उत्पादित अन्न दर्जेदार आणि पोषणयुक्त असावे याबाबत संशोधन पातळीवरील प्रयत्न फारच तोकडे आहेत. अधिक लोह, जस्तयुक्त ज्वारी, बाजरीची काही वाणं विकसित करण्यात आली आहेत. परंतू त्यांचाही फारसा प्रसार झालेला नाही. अशावेळी आयआयटी खरगपूर येथील तज्ज्ञांनी केंद्र सरकारच्या एका प्रकल्पांतर्गत लोहयुक्त तांदळाची प्रक्रियेद्वारा निर्मिती केली आहे. 

आहारातील पोषणमूल्यावरच आपले आरोग्य अवलंबून असते. पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे आपण कुपोषित होतो, हे लक्षात घेता संतुलित आहार हा रोजच्या जेवणाचाच एक भाग असायला हवा. परंतू बहुतांश गरीब वर्ग असा आहार घेऊ शकत नाहीत. अशावेळी सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील तांदूळ, आटा, मैदा, मीठ, तेल आणि दूध अशा खाद्यपदार्थांचे प्रक्रियेद्वारा पोषणमूल्य वाढविले तर कुपोषण दूर करण्यासाठीचे ते एक फार मोठे काम होईल. खरे तर पोषणक्रांतीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊलच म्हणता येईल. त्यामुळेच केंद्र सरकारने गोरगरिबांच्या दैनंदिन आहारातील या खाद्यपदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यास एका प्रकल्पाद्वारे सुरवातही केली आहे. विशेष म्हणजे लोहयुक्त तांदूळ निर्मितीत शास्त्रज्ञांना यशही आले आहे.

आटा, मैदा, मीठ, तेल, दूध यांचेही पोषणमूल्य वाढविण्यासाठीच्या कामालासुद्धा शास्त्रज्ञांनी तत्काळ लागायला पाहिजे. असे प्रक्रियेद्वारा उच्च पोषणमूल्य असलेले खाद्यपदार्थ देशाच्या दुर्गम, डोंगराळ भागात पोचायला हवेत. असे खाद्यपदार्थ सेवन करण्याबाबत तेथील लोकांमध्ये व्यापक प्रबोधन व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे त्यांचे दर कुपोषणग्रस्त सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात असायला हवेत. पोषणमूल्ययुक्त खाद्यपदार्थ शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे देशातील गोरगरीब जनतेपर्यंत पोचायला हवेत.

हे करीत असताना भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, भगर आदी आदिवासी बांधवांच्या दैनंदिन आहारातील या धान्यांमध्ये संशोधनातून पोषणमूल्य वाढविण्याच्या कामालाही गती मिळायला हवी. कुपोषणाचे मूळ हे दारिद्र्य आणि अज्ञानात आहे. जिथे कुपोषणाची समस्या अधिक आहे, अशा भागातील लोकांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठीसुद्धा शासनाने भर द्यायला हवा. अशा भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्याच्या दर्जेदार सोयीसुविधा पण पोचायला हव्यात. कुपोषण निर्मूलनासाठीचे असे अनेक कार्यक्रम एकत्र करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. असे झाले तरच देशातील वाढत्या कुपोषणाला आळा बसेल. 

इतर संपादकीय
आर्थिक मंदीपेक्षा राष्ट्रवादाचा गोडवा! अर्थमंत्र्यांना नुकतेच उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ...
अतिक्रमण अन् असमन्वयाचा ‘पूर’जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सुरू झालेला...
नीट समजून घेऊया ‘पाण्याचे गणित’आजमितीला अवर्षण, पाणीटंचाई या देशासमोरील अव्वल...
विकासाबरोबर विषमताही वाढतेयभारताच्या लोकसंख्यात्मक लाभाची जगभर चर्चा होतेय....
इशारे ठीक; आता हवी कृतीशेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळायला हव्यात,...