मैत्रीचा नवा अध्याय

आपल्या देशात पाण्याचे दुर्भिक्ष असताना अजूनही कार्यक्षम वापर होताना दिसत नाही. इस्राईलच्या सहकार्यातून पाणी संवर्धनाच्या जाणिवेबरोबर वापराबाबतची साक्षरताही वाढावी.
संपादकीय
संपादकीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुलै २०१७ मधील इस्राईलची भेट ही एेतिहासिक ठरली. इस्राईलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान तर होतेच, परंतु त्यांच्या भेटीतून भारत-इस्राईलदरम्यान संरक्षण, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याबरोबर मैत्रीच्या एका नव्या पर्वाला सुरवातदेखील झाली होती. त्यांच्या या भेटीदरम्यान अंतराळ संशोधन, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याबाबत सात करार झाले होते. याच मैत्री आणि सहकार्याची पुढची कडी म्हणजे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू हे सध्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर अाहेत. बेंजामिन नेत्यान्याहू यांनी या दौऱ्याचा उल्लेख एेतिहासिक असाच केला असून व्यापार, संरक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये आम्ही भारताला सहकार्य करू, अशी ग्वाहीदेखील दिली आहे. दोन दिवसांदरम्यान कृषी आणि जल व्यवस्थापन क्षेत्रात आधुनिक व नवसंशोधनावर आधारित सहकार्याबाबत चर्चा झाली असून सायबर सुरक्षेसह तेल, नैसर्गिक वायू, सौर उर्जां, दोन्ही देशांतील गुंतवणूक वाढींबाबत करारही करण्यात आले आहेत. शेती आणि जलव्यवस्थापनाबाबत इस्राईलच्या आदर्शाची देशात नेहमीच चर्चा असते. परंतु दोन्ही देशांदरम्यान गेल्या वर्षीपर्यंत संवादच नसल्यामुळे यातील नव संशोधन आणि तंत्र व्यापक स्वरूपात आपण आत्मसात करू शकलो नाही. आपल्या देशाच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, शेतीसाठी प्रतिकूल हवामान असे असताना इस्राईलने पाण्याची नियोजनबद्ध आखणी व प्रत्येक थेंबाचा काटेकोर वापर करून वाळवंटात नंदनवन फुलवले आहे. इस्राईलमध्ये पीक पद्धतीनुसार पाण्याचा कोटा ठरवून पिकांना आवश्यक तेवढेच पाणी केवळ सूक्ष्म सिंचनाद्वारे दिले जाते. आपल्या देशात पाण्याचे दुर्भिक्ष असताना अजूनही कार्यक्षम वापर होताना दिसत नाही. इस्राईलच्या सहकार्यातून पाणी संवर्धनाच्या जाणिवेबरोबर वापराबाबतची साक्षरताही वाढावी. संरक्षित शेतीच्या अत्यंत काटेकोर व्यवस्थापनातून प्रतिकूल परिस्थितीबरोबर हवामान बदलाच्या आव्हानांवर पण इस्राईलने मात केली आहे. आज हवामान बदलाच्या सर्वाधिक झळा भारतीय शेतकऱ्यांना बसत असताना त्यांच्या शेती नियोजनाचे धडेदेखील आपल्याला मार्गदर्शक ठरतील. केवळ सरकार आणि राजकीय पातळीवर नव्हे तर दोन्ही देशांच्या लोकांमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे इस्राईलच्या पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान स्पष्ट केले. द्विपक्षीय संबंधात परस्पर हितांचा नेहमीच विचार होतो. इस्राईलकडून आपल्याला शेती, ऊर्जा, संरक्षणाबाबत नव संशोधन हवे असताना त्यांनासुद्धा अत्याधुनिक शस्त्रास्त्रासाठी भारतासारखा खरेदीदार देश हवा अाहे. तसेच शेतमालासह अनेक उत्पादनांची निर्मिती केवळ निर्यातीसाठी करणाऱ्या इस्राईलचा डोळा भारताच्या मोठ्या बाजारपेठेवरही आहे. मागील काही वर्षात निर्यातीचा उतरता आलेखही त्यांना चढता करायचा आहे. दहशतवाद, शेजारील देशांकडून घातपाती कारवाया याबाबत भारत, इस्राईलची अवस्था सारखीच असून, दोन्ही देशांतील सरकारे आणि सर्वसामान्य लोक यामुळे त्रस्त आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी सायबर सुरक्षेसह दहशतवादाच्या मुकाबल्याबाबत परस्पर सहकार्य दोन्ही देशांसाठी मोलाचे ठरेल. एकंदरीत समृद्धी, स्वयंपूर्णता आणि सुरक्षितता या दिशेने सुरू झालेल्या दोन्ही देशांच्या प्रयत्नांना यश लाभो, हीच सदिच्छा!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com