एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?

प्रत्येक गावात किमान एका शेतकऱ्याच्या शेतावर एकात्मिक शेतीचे आदर्शवत मॉडेल उभे करून त्या गावातील इतर शेतकऱ्यांना त्याचे फायदे पटवून द्यावे लागतील.
संपादकीय
संपादकीय

पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक व्यवसायांचा अभाव आणि रोजगाराच्या संधही कमी यामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक होतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या भागातील काही शेतकरी एकात्मिक शेतीची कास धरून प्रगती साधत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका आणि आसपासच्या परिसरात प्रामुख्याने पारंपरिक शेती केली जाते. महागाव तालुक्यातील सुरेश पतंगराव यांनी पारंपरिक शेतीला रेशीमशेती, शेळीपालन, दुग्धोत्पादन अशा विविध पूरक व्यवसायांची जोड देत फायदेशीर शेती पद्धती रुजविली आहे. आज शेती व्यवसाय म्हटलं की अडचणीचाच पाढा वाचला जातो. शेतीत अडचणी नाहीत असे नाही, तर त्या प्रचंड आहेत; परंतु कल्पकता आणि मेहनतीतून त्यावर मात करता येते, हेच ॲग्रोवनमधून सातत्याने प्रसिद्ध होणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांमधून सिद्ध होते.

पीकपद्धतीला पूरक व्यवसायांची जोड देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच उपलब्ध संसाधनांच्या कार्यक्षम वापरातून शेतीतून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणे म्हणजे एकात्मिक शेती होय. अशी शेती कमी जोखमीची, पर्यावरणपूरक आणि शाश्वत किफायतशीर असते. असे असताना राज्यात एकात्मिक शेतीचे काही बेटेच दिसतात. प्रत्येक शेतकऱ्याने या शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असताना तसे होत नाही. यामागील कारणे काय आहेत, हे शेती तज्ज्ञांसोबत नियोजनकर्त्यांनी शोधून त्यावर उपाय द्यायला हवेत.

शेतकरी कुटुंबातील शेती क्षेत्र, सदस्य संख्या, उपलब्ध साधनसामग्री, कुटुंबाच्या गरजा या बाबी लक्षात घेऊन विभागनिहाय एकात्मिक शेतीचे मॉडेल्स कृषी विद्यापीठांनी विकसित केले आहेत. परंतु, ते अजूनही विद्यापीठ प्रक्षेत्राबाहेर पडलेले नाहीत. शेतीतील अनेक समस्यांचे समाधान करीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारे हे मॉडेल्स शेतकऱ्यांपर्यंत न्यावे लागतील. प्रत्येक गावात किमान एका शेतकऱ्याच्या शेतावर एकात्मिक शेतीचे मॉडेल उभे करून गावातील इतर शेतकऱ्यांना त्याचे फायदे पटवून द्यावे लागतील. शेतकरीनिहाय त्यात काही बदल गरजेचे असतील तर ते त्यांना सांगावे लागेल. शेळी-मेंढी-वराह-कोंबडी-मधुमक्षिका-मासे पालन, दुग्धोत्पादन, रेशीमशेती हे पूरक व्यवसाय फायदेशीर आहेत, हे शेतकऱ्यांना पण माहीत आहे. परंतु, त्यातील एखादा व्यवसाय सुरू करून शास्त्रीय पद्धतीने करायचा म्हटलं तर शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. परिणामी शेतकरी अशा व्यवसायापासून वंचित राहतो.

शेतीपूरक व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर दुसरी महत्त्वाची अडचण भांडवलाची असते. अनेक पूरक व्यवसाय अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात. परंतु, मुळातच आर्थिक संकटात असलेले बहुतांश शेतकरी तेवढीही गुंतवणूक पण करू शकत नाहीत. बॅंकेकडून भांडवली कर्ज घ्यायचे म्हटले तर बॅंकांची सुरवातच नकारघंट्यापासून होते. त्यानंतर त्यासाठीचे नियम, निकष, कागदपत्रांची जंत्री हे सर्व पाहून शेवटी शेतकरीच कंटाळून जातो. एकात्मिक शेतीच्या विविध मॉडेल्सनुसार अर्थसाह्याचे शासनाचे धोरण हवे. हा अर्थपुरवठा इच्छुक शेतकऱ्यांना तत्काळ व्हायला हवा. असे झाले तरच एकात्मिक शेतीचा राज्यात झपाट्याने विस्तार होईल.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com