‘आयपीएम’चा विसर नको

आयपीएम ही कीड नियंत्रणाची कमी खर्चाची, पर्यावरणप्रिय आणि प्रभावी पद्धत आहे. त्यामुळे सर्वच पिकात प्रत्येक किडीसाठी या पद्धतीचा अवलंब व्हायला हवा.
संपादकीय
संपादकीय

आयपीएम अर्थात एकात्मिक कीड नियंत्रण तंत्राचा वापर शेतकऱ्यांनी केल्यामुळे यंदा ७०० गावांच्या पुढे बोंड अळी पोचू शकली नाही. यातील १०० गावांमधून बोंड अळी पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पूर्व हंगामी बीटी कापूस फुलं-पात्या लागतानाच बोंड अळीच्या प्रादुर्भावाच्या बातम्या राज्यातील अनेक गावांमधून आल्या. परंतु, त्यानंतर कृषी विद्यापीठे, कृषी विभागाने बोंड अळीच्या एकात्मिक नियंत्रणाबाबत चांगलेच प्रबोधन केले. त्याला कापूस उत्पादकांनी चांगला प्रतिसाददेखील दिला. त्यामुळे राज्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याचे चित्र आहे. खरे तर देशात कापसामध्ये बीटी तंत्रज्ञान येण्याआधी तीन प्रकारच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत होता. परंतु, त्याही वेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने आयपीएममधील सर्व घटकांचा सामूहिकरित्या अवलंब केल्याने अनेक गावांनी बोंड अळीला हद्दपार केल्याच्या यशोगाथा याच राज्यात घडल्या आहेत. बीटी तंत्राच्या आगमनानंतर कापसामध्ये आयपीएम तंत्राचा शेतकरी, शास्त्रज्ञ तसेच शासनालादेखील विसर पडला आहे. इतर पिकांमध्येसुद्धा आयपीएमच्या एखादं-दुसऱ्या घटकांचा अवलंब काही शेतकऱ्यांकडून होतो. आजही राज्यात रोग-कीड नियंत्रण म्हणजे ‘घेतला पाठीवर पंप की कर फवारणी’ असेच सर्रासपणे चालू आहे.

हवामान बदलाच्या काळात कापसासह इतर पिकांवरही रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच कीडनाशकांचा अनियंत्रित वापरही वाढला आहे. त्यामुळे कीड-रोगांचे प्रभावी नियंत्रण होत नाही, शेतकऱ्यांचा फवारणीवरील खर्च वाया जातो, पिकांचे उत्पादन आणि दर्जाही खालावतो. कीडनाशकांचा अनियंत्रित वापराने पर्यावरण प्रदूषणातही वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वच पिकांमध्ये आयपीएमचा अवलंब सामूहिक पातळीवर व्हायलाच हवा. कापसामध्ये केवळ कामगंध सापळे लावले, निंबोळी अर्काची फवारणी केली म्हणजे आयपीएमचा अवलंब झाला असा समज कोणीही करून घेऊ नये. आयपीएमध्ये मशागतीय, भौतिक-यांत्रिक, जैविक, रासायनिक पद्धती आदीं घटकांचा समावेश आहे. पीक लागवडपूर्वीच्या मशागतीपासून ते काढणीनंतरच्या शेत स्वच्छता मोहिमेपर्यंत टप्प्याटप्प्याने या घटकांचा अवलंब अपेक्षित असतो. जमिनीची योग्य मशागत, पीक फेरपालट पद्धती, बीजप्रक्रिया, लागवडीमध्ये सापळा पिके तसेच पूरक आंतरपिकांचा अंतर्भाव, पिकांमध्ये विविध सापळे, ट्रायकोकार्डचा वापर, मित्र कीटकांची जोपासना, पक्षी थांब्यांचा वापर, जैविक, वनस्पतीजन्य आणि रासायनिक कीडनाशकांचा अवलंब आदी बाबींचा समावेश अाहे.

रासायनिक कीडनाशक हे किडींविरोधात लढण्याचे शेवटचे अस्त्र अाहे. प्रतिबंधात्मक अथवा नियंत्रणात्मक अगोदरचे सर्व उपाय उपयुक्त ठरले नाहीत आणि कीड नुकसानकारक ठरू लागल्यास शिफारशीत रासायनिक कीडनाशकांचा प्रमाणबद्ध वापर करणे अपेक्षित असते. आयपीएम ही कीड नियंत्रणाची कमी खर्चाची, पर्यावरणप्रिय आणि प्रभावी पद्धत आहे. त्यामुळे सर्व पिकात प्रत्येक किडीसाठी या पद्धतीचा अवलंब व्हायला हवा. कृषी विद्यापीठे, कृषी विभागासह विस्तार यंत्रणेतील इतर संस्थांनी पीकनिहाय आयपीएमचे कोणते घटक, कधी वापरायचे याचे प्रबोधन शेतकऱ्यांमध्ये करायला हवे. आयपीएमच्या बाबतीतील अजून एक अडचण म्हणजे यातील ट्रायकोकार्ड, जैविक-वनस्पतीजन्य कीडनाशके पुरेशा प्रमाणात आणि योग्य गुणवत्तेत शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाहीत. ही अडचण पण शासनाने दूर करायला हवी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com