agriculture stories in marathi agrowon agralekh on krushi tantra niketan | Agrowon

बदल स्वागतार्ह; पण...

विजय सुकळकर
मंगळवार, 2 जुलै 2019

एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थी जेव्हा पूर्ण करतो, त्या वेळी त्याने पुढे पदवीचे वगैरे शिक्षण घेण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, हा त्या अभ्यासक्रमाचा उद्देश असला पाहिजे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांद्वारे कौशल्यवृद्धीवर भर द्यावा लागेल.
 

राज्यात कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचा घोळ मागील दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. खरे तर हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयच राज्यात घाईगडबडीने घेतला गेला होता. पुरेसे मनुष्यबळ आणि सोयीसुविधांअभावी अनेक खासगी संस्थांनी हा अभ्यासक्रम सुरू केला. अभ्यासक्रमाचा कालावधी, शिक्षणाचे माध्यम आणि विषय यातही प्रचंड गोंधळ होता. काही विषय मराठी तर काही इंग्रजीतून शिकविले जात होते. काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन वर्षे कालावधीत हा अभ्यासक्रम होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नव्हते. त्यातच भारतीय कृषी संशोधन परिषदेने बीएस्सी कृषी पदवीसाठी अगोदर १६३ व नंतर १८३ क्रेडिट कोर्स पूर्ण करण्याची अट घातल्यामुळे कृषी तंत्रनिकेतनच्या मुलांना कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेशासाठी तांत्रिक अडचण येत होती. हा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांनी एखादा स्वतंत्र व्यवसाय करायचे ठरविले, तर त्यांना तेवढे कौशल्यपण मिळत नव्हते. एकंदरीतच विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याबरोबर बेरोजगारी वाढविणारा म्हणूनच कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाकडे पाहिले जात होते. राज्यातील कृषी विद्यापीठांनी तर हा अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस राज्य शासनाला केली होती; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी हा अभ्यासक्रम बंद न करण्याचा निर्णय घेतला होता. आता गुजरातच्या धर्तीवर कृषी तंत्रनिकेतनच्या तीन वर्षांच्या पूर्ण इंग्रजी अभ्यासक्रमाला ‘एमसीएईआर’ने मान्यता दिली आहे. या निर्णयाद्वारे कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमातील अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नाचे स्वागतच करायला पाहिजे.

कृषी तंत्रनिकेतनच्या सुधारित अभ्यासक्रमात बरेच बदल करण्यात आले आहेत. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात वार्षिक परीक्षेऐवजी सत्रनिहाय (सेमिस्टर) परीक्षा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बीएसस्सी कृषीच्या पहिल्या-दुसऱ्या सत्रांतील बहुतांश कोर्सेस या अभ्यासक्रमात पूर्ण केले जाणार आहेत. पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिले जाणार असल्याने मुलांची तयारी चांगली होऊन कृषीची पदवी पूर्ण करण्यास त्यांना अडचण येणार नाही. असे असले तरी एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थी जेव्हा पूर्ण करतो, त्या वेळी त्याने पुढे पदवीचे वगैरे शिक्षण घेण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, हा त्या अभ्यासक्रमाचा उद्देश असला पाहिजे. बीएसस्सी कृषीसाठी या विद्यार्थ्यांना ठरावीक कोटा मिळणार असल्याने बाकीच्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमावर नोकरी मिळविणे, नाहीतर स्वतंत्र रोजगार उभारणे हाच पर्याय राहतो. अशा वेळी नवीन अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीवर भर असला पाहिजे. सुधारित अभ्यासक्रमातील तिसरे वर्ष हे कौशल्यविकासाचेच असल्याचे कळते. शेती संलग्न १० व्यवसायांपैकी दोनची निवड करून त्यांचे सर्व सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान त्यांना देण्यात येणार आहे. हे सर्व कागदोपत्री असले तरी, बहुतांश खासगी तंत्रनिकेतन संस्थांकडे पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून विषय शिकविणाऱ्या उच्चशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. तसेच विविध व्यवसायांचे प्रात्यक्षिके घेण्यासाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळादेखील नाहीत. संबंधित संस्थांनी यांची पूर्तता केल्याशिवाय सुधारित अभ्यासक्रमाला ते न्याय देऊ शकणार नाहीत, हे लक्षात घेऊन एमसीएईआरने या सोयीसुविधांबाबत पाठपुरावा करायला हवा. असे झाले तरच कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमातील बदल सार्थकी लागतील. 



इतर संपादकीय
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
आता हवी भरपाईची हमी चालू खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठीची काल...
शेतीचा गाडा रुळावर कसा आणणार?   कोरोना महामारी संपूर्ण जगाला नुकसानकारक...
शेतकरी संघटनांना ‘संघटीत’ कसे करावे?  एकत्रीकरणाचा लाभ काय?  मतभेद बाजुला सारुन...
इंडो-डच प्रकल्प ठरावा वरदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर जवळपास तीन महिने...
पीककर्ज प्रक्रिया वेळखाऊ अन्...नेकनूर (ता. जि. बीड) गावचे शेतकरी संदिपान मस्के...
वॉटर बॅंकेद्वारे साधू जल समृद्धी! सोलापूर जिल्ह्यातील कृषिभूषण शेतकरी अंकुश पडवळे...
ऊर्ध्व शेतीचे प्रयोग वाढले पाहिजेतएकविसाव्या शतकाच्या आरंभापासूनच शेती व्यवहार...
कापूस विकासाची खीळ काढावाढलेला उत्पादन खर्च आणि कमी दरामुळे मागील अनेक...
दिलासादायक नवनीत   दूध दर पडले, यावर आंदोलन भडकले की...
कोरोना नंतरचे शेळी-मेंढी-कुक्कुटपालन  फक्त कोरोना विषाणूलाच आपल्या स्वतःमध्ये बदल...