प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’

उपग्रहाने पाठविलेल्या छायाचित्रांच्या आधारे पिकांचा अंदाज बांधला जाऊ शकतो, परंतु हे तंत्र वर्षभर वापरता येत नाही. पावसाळ्यात हे तंत्र वापरण्यास अडचणी येतात.
संपादकीय
संपादकीय

पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना डिजिटली ट्रॅक करून माहिती देणाऱ्या ‘महा ॲग्रिटेक’ योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. याकरिता सुदूर संवेदन, उपग्रह छायाचित्रे तसेच ड्रोन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत दीड कोटीहून अधिक शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून शेतीतील सर्व समस्या सोडविल्या जातील, हे त्यांनी स्पष्ट केले. एमआरसॅक (महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र) आणि इस्त्रोच्या साह्याने हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. पीक पाहणी अंदाज सध्या मनुष्यबळाच्या साहाय्याने घेतला जातो. गावपातळीवरील कर्मचारी गावात बसून पीक पेऱ्यांची नोंद करतात. यातील बहुतांश नोंदी चुकीच्या असतात. त्यामुळे पीक उत्पादनाचे अंदाजही चुकतात. मागील अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत की तुरीपासून ते कांद्यापर्यंत लागवड क्षेत्र असो की अपेक्षित उत्पादनाचे अंदाज चुकत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांसह शासनालाही बसत आहे. 

सध्या हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढली आहे. त्यात शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. काही घातक कीड-रोगांचा पिकांवर अचानक प्रादुर्भाव वाढून शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. यातून फवारणीवरील खर्च वाढून उत्पादनात घट येत आहे. अशा वेळी आकस्मित येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती तसेच कीड-रोगांच्या संभाव्य प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांना सूचना मिळाल्यास योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजनांद्वारे त्यांचे नुकसान कमी होईल. पेरणीच्या काटेकोर नोंदणीपासून ते पीकनिहाय उत्पादनाची अचूक आकडेवारी उपलब्ध झाल्यास शेतकरी आणि शासनाच्या दृष्टीने सोयीचे ठरेल. एखाद्या शेतीमालाच्या उत्पादन वाढीचा अथवा कमी होण्याचा अंदाज असला तर त्यानुसार त्याचे नियोजन शासनाला करता येईल. यातून शेतीमालाचे दर स्थिर राहण्यास हातभार लागेल. परंतू सुदूर संवेदन तंत्राद्वारे पीकपाण्याच्या सर्वेक्षणाच्या घोषणा यापूर्वीसुद्धा झाल्या. नैसर्गिक आपत्तीत पीक पाहणीकरिता हे तंत्रज्ञान वापरून अचूक माहिती तातडीने घेऊन प्रादुर्भावग्रस्तांना तत्काळ मदत देता येईल, हा विचार मुख्यमंत्र्यांनी २०१४ मध्येच मांडला होता. त्यानंतर राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपत्तीचे एकात्मिक नियोजन करून या संबंधित सर्व विभागांनी जिल्हानिहाय सूक्ष्म सिंचनाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये दिले होते. पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसानीचे पंचनामे जलद गतीने आणि अचूकपणे करण्यासाठी ड्रोन कॅमेरे वापरण्याचे ठरले होते. तसेच प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा शासनाचा प्रस्तावही होता. परंतू यापैकी एकही घोषणा, निर्देश, प्रयोग तडीस गेला नाही, हे वास्तव आहे. तसे महा ॲग्रिटेकचे होऊ नये ही अपेक्षा!

महत्त्वाचे म्हणजे उपग्रहाने पाठविलेल्या छायाचित्रांच्या आधारे पिकांचा अंदाज बांधला जाऊ शकतो, परंतू हे तंत्र वर्षभर वापरता येत नाही. जून ते सप्टेंबर या दरम्यान राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण असते. ढगांमुळे भूपृष्ठावरील पिकांची छायाचित्रे झाकली जातात. त्यामुळे अंदाज बांधण्यात अडचणी येतात. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असलेल्या आंतर, मिश्र पीक पद्धतीमुळे पिकांचे अचूक अंदाज घेता येत नाहीत, किंवा चुकतात. अशी तक्रार वर्षभरापूर्वीच एमआरसॅकचे शास्त्रज्ञ करीत होते. राज्यात खरीप हंगाम महत्त्वाचा असून त्याच काळात ढगाळ वातावरण असते. अशावेळी या हंगामाच्या अचूक आकडेवारीबाबत तंत्रज्ञानात नेमके काय बदल केले, हे शासनाने सांगायला हवे. पावसातील खंड, अतिवृष्टी, वादळे यांचा बऱ्यापैकी अचूक अंदाज आता हवामान विभागाकडून मिळत आहे. बदलत्या हवामानानुसार रोग-किडींचा प्रादुर्भाव तसेच पिकांची काळजी याबाबतचे सल्लेही शेतकऱ्यांना मिळत आहेत. अशावेळी महा ॲग्रिटेक यापेक्षा काय वेगळे देणार, हेही स्पष्ट व्हायला पाहिजे. सध्या शेतकऱ्यांकडून काटेकोर शेतीचे आणि शासनाकडून शेतीच्या सूक्ष्म नियोजनाचे दिवस आहेत. या दोन्हीमध्ये प्रगत तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो. परंतू तेवढ्याच प्रभावी हे तंत्र वापरावेसुद्धा लागेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com