दूध का दूध...

ग्राहकांनी आरोग्याच्या बाबतीत सजग असायलाच हवे. परंतु त्याचबरोबर भेसळीबाबतच्या अफवा आणि वस्तुस्थिती याबाबतची खात्रही त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे.
संपादकीय
संपादकीय
देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दीड महिन्यापूर्वी एका सरकारी अहवालने काढला होता. दुधातील वाढत्या भेसळीमुळे २०१५ पर्यंत देशातील ८७ टक्के नागरिक कॅन्सर व इतर घातक आजारांचे शिकार होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच दिला आहे. दुधातील भेसळीबाबत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने देखील चिंता व्यक्त केली होती. दुधातील भेसळीमुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते म्हणून ग्राहक तर भेसळीमुळे बदनाम होत असलेल्या दुधाला दर मिळत नसल्याने उत्पादक या दोन्ही वर्गात चिंता वाढत आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध भेसळीच्या अशा तापलेल्या वातावरणात उत्पादक, ग्राहक यांची चिंता दूर करणारा आणि शासनासही दिलासादायक असा ‘एफएसएसएआय’चा अहवाल येऊन धडकला आहे. दुधाच्या ६ हजार ४३२ नमुन्यांच्या सखोल तपासणीअंती त्यापैकी केवळ १० टक्केच नमुने दूषित असून, उर्वरित ९० टक्के नमुने सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. भेसळीबाबत बोलायचे झाले तर केवळ १२ नमुने भेसळयुक्त आढळले आहेत. सुखद बाब म्हणजे दुधात कीडनाशकांच्या उर्वरित अंशाबद्दल ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही तर काही नमुन्यांमधील दूध दूषित असण्याच कारणे अयोग्य गोठा व्यवस्थापन आणि जनावरांना मिळत असलेला निकृष्ट चारा-खाद्य अशी आहेत, हेही या अहवालाने स्पष्ट केले आहे. गाई-म्हशींच्या दुधाची अप्रतिम चव, त्यातील आरोग्यपूरक आणि पोषणमूल्ययुक्त घटकांमुळे अगदी पुरातन काळापासून दूध पिण्याची सवय मानवाला लागली आहे. दुधावर प्रक्रिया करून हजाराहून अधिक पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ जगभर आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे दुधाची मागणी सातत्याने वाढत आहे. असे असताना दूध भेसळीच्या केवळ अफवा पसरवून दुधापासून ग्राहकांना परावृत करणे, उत्पादक पातळीवर दर पाडणे असे प्रकार सर्वत्र चालू असतात. ताजी फळे-भाजीपाल्याबद्दलही काही भागांत तसेच घडते आहे. दुधात भेसळ अथवा फळे- भाजीपाल्यामध्ये कीडनाशकांच्या उर्वरित अंशाचे धोकादायक प्रमाण हे काही ठिकाणी आढळूनही येते. परंतु तपासणीच्या प्रभावी यंत्रणा जागोजागी नसल्याने सर्वच दूध भेसळयुक्त अथवा सर्वच शेतीमाल विषयुक्त असा ठपका ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळेच अन्न सुरक्षिततेबाबत देशातील सर्वोच्च संस्थांचे अहवाल हे वारंवार प्रसिद्ध करून ‘दूध का दूध और पानी का पानी’ हे स्पष्ट व्हायला हवे. ग्राहकांनी आरोग्याच्या बाबतीत सजग असायलाच हवे. परंतु त्याचबरोबर अफवा आणि वस्तुस्थिती याबाबतची खात्रही त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे. सध्या राज्याला दुष्काळाचे चटके बसत असून, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दूधदर वाढवून देण्यासाठीच्या अनुदानाचा कालावधीही संपल्याने दुधाचे दर झपाट्याने उतरत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनावरांची संख्या आणि सरासरी दूध उत्पादनही कमी होत असल्याने दूधटंचाईचा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला आहे. अशा कृशकाळातच भेसळयुक्त दुधाची राज्यात मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता असते. अशावेळी यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेने भेसळबहाद्दरांचे प्लॅन उधळून लावावेत. त्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. तसेच गोठा व्यवस्थापनापासून ते ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दूध स्वच्छ, निर्भेळ, निर्जंतुक आणि दर्जेदार कसे राहील याचे धडे उत्पादक, मध्यस्थ, प्रक्रियादार यांना मिळायला हवेत. असे झाले तरच दुधाची मानवी आहारातील संकल्पना पूर्ण होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com