...तरच वाढेल डाळिंब निर्यात

रेसिड्यू फ्री अन्नसेवनाबाबत जगभर होत असलेली जागृती पाहता निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सजग राहून ग्राहकांना हवा तसाच माल पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे.
संपादकीय
संपादकीय
फॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची निर्यात घटली असून, त्याचा फटका राज्यातील उत्पादकांना बसत आहे. युरोपियन लोकांकडून सध्या विषारी अंशमुक्त (रेसिड्यू फ्री) अन्नाचेच सेवन केले जात असल्याने ही समस्या युरोपला होत असलेल्या निर्यातीबाबतच आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विष मग ते कोणतेही असो आणि कोणत्याही माध्यमातून पोटात जाणारे असो, त्यापासून मानवास बाधा होऊ नये, यासाठीचे प्रमाण एकच असायला पाहिजे, परंतु याबाबत डाळिंबावर अन्याय झाल्याचे दिसते. द्राक्षामध्ये फॉस्फोनिक ॲसिडची एमआरएल प्रतिकिलो ७५ मिलिग्रॅम असताना डाळिंबामध्ये ती केवळ २ मिलिग्रॅम आहे. अजून एक मजेशीर बाब म्हणजे कोणत्याही फळाची उर्वरित अंश तपासणी खाल्ल्या जात असलेल्या भागाची व्हायला पाहिजे, परंतु डाळिंबाची अशी तपासणी सालीसकट केली जाते. अर्थात डाळिंबामध्ये फॉस्फोनिक ॲसिड आले कुठून? त्याची एमआरएल द्राक्षाच्या तुलनेत एवढी कमी का? द्राक्ष-डाळिंब दोन्हीसाठी रेसिड्यू तपासणी पद्धत सारखीच का? याबाबींचा खुलासा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि रेसिड्यू तपासणी प्रयोगशाळा यांनी करायला हवा. याबाबतचे सविस्तर विश्लेषण अपेडाकडून युरोपियन देशांना झाले आणि त्यांनी रेसिड्यू मर्यादा थोडी वाढवून दिली, तर निर्यातीचा मार्ग तूर्त मोकळा होऊ शकतो. रेसिड्यू फ्री अन्नसेवनाबाबत जगभर होत असलेली जागृती पाहता निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी सजग राहून ग्राहकांना हवा तसाच माल पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे. डाळिंब अत्यंत कमी पाण्यावर मध्यम ते हलक्या जमिनीत येणारे फळपीक आहे. त्यामुळे राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी हे फळपीक वरदान ठरले आहे. डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती चांगलीच सुधारली आहे. डाळिंबावरील तेलकट डाग रोग, मररोग यावर अजूनही प्रभावी उपाययोजना मिळाल्या नाहीत. तसेच वारंवारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये योग्य व्यवस्थापनाअंती अनेक शेतकरी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतात. देशांतर्गत दराच्या तुलनेत निर्यातीसाठी डाळिंबाला दर चांगला मिळतो. परंतु मागील काही वर्षांपासून देशांतर्गत बाजारात डाळिंबाला अत्यंत कमी दर मिळत आहे. निर्यातीमध्येसुद्धा काहींना काही अडचणी चालूच आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादकही अडचणीत आहेत. एकूण डाळिंब उत्पादनाच्या जेमतेम दोन ते तीन टक्केच निर्यात होते. फळांचा लहान आकार आणि त्यात आढळणारे कीडनाशकांचे अंश हे निर्यातीतील दोन मुख्य अडसर आहेत. जागतिक बाजारात ४०० ते ५०० ग्रॅम वजनांची फळे देणाऱ्या जाती आहेत. इस्राईल, अमेरिकेने ५०० ते ६०० ग्रॅम वजनाच्या जाती विकसित केल्या आहेत. आपल्याकडे मात्र निर्यातक्षम डाळिंबाच्या जातींचे सरासरी वजन ३५० ग्रॅमपर्यंत आहे. उत्तम व्यवस्थापनाअंती या जाती ४०० ते ४५० ग्रॅम वजनापर्यंत जातात. आपली डाळिंबाची निर्यात वाढवायची असेल तर मोठ्या आकारासह रंग आणि चवीला उत्तम वाण शेतकऱ्यांना मिळायला हवीत. तसेच रेसिड्यू फ्री डाळिंब उत्पादनाबाबतची इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी लागेल. कीड-रोगांच्या प्रतिबंधासाठी दर्जेदार सेंद्रिय निविष्ठाही मिळायला हव्यात. निर्यातीबाबतचे वेळोवेळी बदलते निकष तत्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोचवून अशा निकषांमध्ये बसणारे उत्पादन घेण्यासाठीचे तंत्रही डाळिंब उत्पादकांपर्यंत पोचवावे लागेल. असे झाले तरच आपली डाळिंब निर्यात वाढेल, उत्पादकांचाही फायदा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com