agriculture stories in marathi agrowon agralekh on santra | Agrowon

संकटातील संत्रा

विजय सुकळकर
सोमवार, 8 जुलै 2019

डॉ. अनिल बोंडे हे आमदार असताना संत्र्याची विक्री आणि प्रक्रियेबाबत राज्य शासनाने नावीन्यपूर्ण धोरण राबविण्याची गरज नेहमीच बोलून दाखवत होते. आता ते राज्याचे कृषिमंत्री आहेत. त्यांच्या संकल्पनेतील नावीन्यपूर्ण धोरण त्यांनी तात्काळ राबवून संत्रा उत्पादकांना दिलासा द्यायला हवा.
 

अ  त्याधुनिक तंत्रज्ञानातून उत्पादनवाढ आणि उत्पादित संत्र्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याबाबत नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेतला आहे. या कंपनीचे फळे-भाजीपाला उत्पादन, प्रक्रिया आणि विक्रीसाखळीतील काम पाहता, संत्रा उत्पादकांनाही चांगले दिवस येतील, असे वाटते. विदर्भाच्या मातीत रुजलेले एकमेव फळपीक म्हणजे संत्रा. आकर्षक रंग आणि अवीट अशा आंबटगोड चवीने नागपुरी संत्र्याला जगभरातून मागणी होते. असे असताना संत्र्याच्या बाबतीत नवसंशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, विक्रीव्यवस्था आणि प्रक्रिया अशा सर्वच स्तरावर संस्थात्मक आणि शासन पातळीवर देखील कामच होत नसल्याचे दिसते. अमरावती आणि नागपूर भागात विस्तारलेल्या संत्रा बागांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. दुष्काळाने या भागातील अनेक संत्रा बागा वाळल्या आहेत. संत्रा बागांची नव्याने मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याचे रोपवाटिकांतून रोपांच्या होत असलेल्या विक्रीतून दिसते; परंतु प्रत्यक्षात क्षेत्र वाढ मात्र दिसून येत नाही. 

लिंबूवर्गीय फळपिकांबाबतचे राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र (एनआरसीसी) नागपूर येथे आहे. तरीही ‘नागपुरी संत्रा’ हे एकमेक वाण सोडले, तर शेतकऱ्यांना दुसरे वाण आजतागायत उपलब्ध होऊ शकले नाही. नागपुरी संत्र्यावर मुळकूज आणि डिंक्या या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो; परंतु यावर संत्रा उत्पादकांना अजूनही प्रभावी उपाय मिळालेला नाही. नागपुरी संत्र्याची साल मऊ असून, त्यात बियांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याची टिकाऊक्षमता कमी आहे. प्रक्रियेसाठीसुद्धा हा वाण चांगला समजला जात नाही. अशावेळी एनआरसीसीने संत्रा उत्पादकांना अधिक उत्पादन देणारे, कीड-रोगांना प्रतिकारक, टिकवणक्षमता अधिक असलेले, बीनबियांचे किंवा बियांचे प्रमाण अत्यंत कमी असलेले वाण उपलब्ध करून द्यायला हवेत. 

विदर्भातील शेतकरी संत्र्याचे तीन बहार घेतात. मात्र, कुठल्याही बहाराचा संत्रा बाजारात आला की दर कोसळतात. उत्पादकांना तो मातीमोल भावानेच विकावा लागतो. विदर्भातून देशभरातील बाजारपेठेत संत्रा जातो; परंतु विक्री, साठवण, वाहतूक याबाबत पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने यात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही अनेक अडचणी येतात. संत्र्याची प्रतवारी करून आणि व्हॅक्‍स कोटिंग केले तर टिकाऊक्षमता वाढते, असा संत्रा दूरच्या बाजारपेठेत पाठविता येतो. कारंजा घाडगे येथील निर्यात सुविधा केंद्रात अशी सोय आहे. मात्र हे केंद्र अधूनमधूनच सुरू राहते. संत्र्याची निर्यात प्रामुख्याने बांगलादेश, भूतान, श्रीलंका या शेजारील राष्ट्रांत होते. बांगलादेश हा आपल्या संत्र्याचा मोठा आयातदार देश आहे; परंतु बांगलादेशाने आयात शुल्क वाढविल्याने तीन-चार वर्षांपासून संत्रा निर्यातीला चांगलीच खीळ बसली आहे. राज्य आणि केंद्र शासनाने व्यवस्थित पाठपुरावा केला, तर बांगलादेशाकडून आयात शुल्क कमी केले जाऊ शकते.

संत्रा प्रक्रियेच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आजतागायत विदर्भात एकही मोठा प्रकल्प उभा राहू शकला नाही, हे वास्तव आहे. 
फडणवीस सरकारच्या बालेकिल्ल्यातील संत्रा शेती अशी चोहोबाजूने संकटात सापडली आहे. संत्रा उत्पादन वाढीपासून ते प्रक्रिया, निर्यात याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही सातत्याने प्रयत्न करीत असतात; परंतु त्यांनाही अपेक्षित यश आलेले नाही. डॉ. अनिल बोंडे हे आमदार असताना संत्र्याची विक्री आणि प्रक्रियेबाबत राज्य शासनाने नावीन्यपूर्ण धोरण राबविण्याची गरज नेहमीच बोलून दाखवत. आता ते राज्याचे कृषिमंत्री आहेत. त्यांच्या संकल्पनेतील नावीन्यपूर्ण धोरण त्यांनी तात्काळ राबवून संत्रा उत्पादकांना दिलासा द्यावा.



इतर संपादकीय
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
आता हवी भरपाईची हमी चालू खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठीची काल...
शेतीचा गाडा रुळावर कसा आणणार?   कोरोना महामारी संपूर्ण जगाला नुकसानकारक...
शेतकरी संघटनांना ‘संघटीत’ कसे करावे?  एकत्रीकरणाचा लाभ काय?  मतभेद बाजुला सारुन...
इंडो-डच प्रकल्प ठरावा वरदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर जवळपास तीन महिने...
पीककर्ज प्रक्रिया वेळखाऊ अन्...नेकनूर (ता. जि. बीड) गावचे शेतकरी संदिपान मस्के...
वॉटर बॅंकेद्वारे साधू जल समृद्धी! सोलापूर जिल्ह्यातील कृषिभूषण शेतकरी अंकुश पडवळे...
ऊर्ध्व शेतीचे प्रयोग वाढले पाहिजेतएकविसाव्या शतकाच्या आरंभापासूनच शेती व्यवहार...
कापूस विकासाची खीळ काढावाढलेला उत्पादन खर्च आणि कमी दरामुळे मागील अनेक...
दिलासादायक नवनीत   दूध दर पडले, यावर आंदोलन भडकले की...
कोरोना नंतरचे शेळी-मेंढी-कुक्कुटपालन  फक्त कोरोना विषाणूलाच आपल्या स्वतःमध्ये बदल...