उसाला पूरक शर्कराकंद

शर्कराकंदासाठी निश्चित बाजारपेठ आणि त्यातील साखरेच्या प्रमाणात दराची हमी मिळाल्यास शेतकरी या पिकाकडे वळतील.
संपादकीय
संपादकीय

साखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,  घटलेली मागणी आणि कोसळलेले दर यामुळे साखर उद्योग संकटात आहे, तर उसाचा वाढलेला उत्पादन खर्च, सरासरी कमी उत्पादकता यामुळे ऊस उत्पादकही अडचणीत आहेत. असे असले तरी शाश्वत बाजारपेठ आणि निश्चित दरामुळे आजही शेतकऱ्यांची पहिली पसंती ऊस या पिकाला असते. राज्यात जिथं पाण्याची सोय आहे, तेथील शेतकरी पहिला विचार ऊस लागवडीचाच करतो. मराठवाड्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातही अधिक पाणी लागत असलेले ऊस पीक वाढत असल्याने या पिकावर अलीकडे टीकाही फारच होतेय.

अशा एकंदरीत पार्श्वभूमीवर ‘व्हीएसआय’च्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखरेसाठी शर्कराकंद या पिकाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचेही लक्ष वळविले आहे. जगात जवळपास ५० देशांमध्ये शर्कराकंद हे पीक घेतले जाते. जगात उत्पादित साखरेपैकी ३० टक्के साखर शर्कराकंदापासून तयार होते. उसाच्या तुलनेत अत्यंत कमी कालावधी, कमी पाणी आणि कमी खर्चात येणारे हे पीक आहे. आपल्या देशात मागील पाच दशकांपासून या पिकाबाबत बोलले जाते. अनेक राष्ट्रीय, राज्य संशोधन केंद्रातून यावर संशोधनही झाले आहे. शर्कराकंद या पिकाच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. शर्कराकंदापासून साखर बनविण्याचा प्रकल्पही शासनाने हाती घेतला होता; परंतु अद्याप हे पीक उसाला पर्यायी तर सोडा पूरक पीक म्हणूनही पुढे आलेले नाही, हे वास्तव नाकारता येत नाही.

शर्कराकंद या पिकाच्या लागवड तंत्राबाबत झालेला कमी प्रसार-प्रचार आणि निश्चित मिळकतीची हमी उत्पादकांना मिळत नसल्याने; तसेच कारखाना पातळीवरही प्रक्रियेसाठी येत असलेल्या अडचणींमुळे उत्पादक आणि प्रक्रिया उद्योग या दोन्ही पातळीवर हे पीक दुर्लक्षित राहिले आहे. केवळ कमी पाणी आणि कमी खर्चातच येणारे ही पीक नाही तर राज्याच्या क्षारपड जमिनीत हे पीक उत्तम येते. सलग लागवडीबरोबर आंतरपीक म्हणूनही हे पीक घेता येते. शर्कराकंदापासून साखर; तसेच इथेनॉल, प्रक्रियेनंतरचा चोथा आणि पाला जनावरांना उत्तम खाद्य तर मळीचा वापरही अनेक उद्योगात होतो. असे असताना राज्यातील शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. एवढेच नव्हे त्यांचे बियाणे तसेच अद्ययावत लागवड तंत्र शेतकऱ्यांना सांगावे लागेल. हे काम कृषी विभाग, केव्हीके तसेच साखर कारखाने यांनी एकत्रितपणे करायला हवे.

शर्कराकंदाची खरेदी तसेच दराबाबतही निश्चित असे धोरण हवे. यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांनी शर्कराकंदाचे उत्पादन घेतले असता, त्यास कारखान्यांनी साखरेच्या प्रमाणाऐवजी शर्कराकंदाच्या वजनावर पैसे दिले, जे उत्पादकांना परवडणारे नव्हते. त्यामुळेदेखील हे पीक राज्यात वाढू शकलेले नाही. शर्कराकंदासाठी निश्चित बाजारपेठ आणि त्यातील साखरेच्या प्रमाणात दराची हमी मिळाल्यास शेतकरी या पिकाकडे वळतील. साखर कारखान्यांनीसुद्धा शर्कराकंदाच्या रसाबरोबर चोथाही जनावरांना खाद्य म्हणून कामी येईल, असे डिफ्यूजर वापरायला हवेत. ऊस रसात शर्कराकंदाचे २० टक्के मिश्रण करून दर्जेदार साखरनिर्मिती शक्य आहे. राज्यात नोव्हेंबर ते मार्च या हंगामात शर्कराकंदाचे उत्तम उत्पादन येत असल्याने ऊस गाळप हंगाम संपत असताना तो अजून पुढे काही काळ चालू ठेवण्यासाठी शर्कराकंद चांगले पूरक पीक ठरू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com