पुणे ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी बारामती तालुका सहकारी दूध
संपादकीय
युरियाचा वापर हवा नियंत्रितच
शासनाने खतांबाबतचे अनुदानाचे धोरण बदलायला हवे. तसेच युरियाप्रमाणे इतर खतांचा पुरवठा, दर ठरविणे यावर शासनाचे नियंत्रण आले तर ही खतेही शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध होतील.
पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या खंडाच्या काळात युरियासह इतरही रासायनिक खतांची विक्री मंदावली होती. चांगल्या पावसानंतर शेतकऱ्यांचा कल पिकांना रासायनिक खते त्यातही खासकरून युरिया देण्याकडे असतो. त्यामुळे युरियाची अचानकच मागणी वाढली आहे. या परिस्थितीचा फायदा खत विक्रेते (डिलर्स) घेत आहेत. केवळ युरियाची मागणी करणाऱ्यास हे खत उपलब्धच नाही, म्हणून सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी आग्रह धरल्यानंतर मात्र चढ्या दराने युरियाची विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी युरिया सोबत इतरही खते विकली जावीत म्हणून लिंकिंगचे प्रकार चालू आहेत. युरियाचा पुरवठा कमी असलेल्या भागात तो नियमित करण्यासाठी कंपनीसह शासनानेही प्रयत्न वाढवायला हवेत. तसेच, शेतकऱ्यांकडून वाहतूक भाडे, हमाली वसुलीपासून युरियाची अधिक दराने डिलर्स विक्री करीत असताना हे प्रकारही तत्काळ बंद व्हायला हवेत. रासायनिक खतांचा पारदर्शी पुरवठा होऊन यातील काळाबाजार थांबविण्यासाठी ई-पॉसचा वापर करण्यात येतो. परंतु, अनेक ठिकाणी ई-पॉसमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत, तर काही ठिकाणी याचा वापर जाणीवपूर्वक टाळला जात आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर करून जाणीवपूर्वक वापर टाळणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. हे करीत असतानाच रासायनिक खतांच्या संतुलित, सुरक्षित वापराबाबतसुद्धा शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन होण्याची गरज प्रकर्षाने जाणवते आहे.
आपल्या देशात जेवढे रासायनिक खते वापरली जातात, त्यात ५५ टक्के वापर एकट्या युरियाचा होतो. युरिया स्वस्त आहे, युरियामुळे पिके लुसलुशित हिरवीगार होतात म्हणून शेतकऱ्यांकडून युरियाचा वापर अधिक प्रमाणात होतो. परंतु, युरियाच्या अधिक वापराचे दुष्परिणामसुद्धा शेतकऱ्यांसह शासनाने लक्षात घ्यायला हवेत. युरियामुळे पिकांची केवळ कायिक वाढ होते. पिकांचा कोवळेपणा, लुसलुशितपणा वाढल्याने त्यावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. युरियामध्ये नत्र अमाईड स्वरूपात असते आणि पिके नायट्रेट स्वरूपातील नत्र घेतात. अमाईडचे नायट्रेटमध्ये रूपांतर होण्यासाठी ८ ते १२ तासांचा कालावधी लागतो. भरपूर पाऊस तसेच अत्यंत कोरडे वातावरण या दोन्ही परिस्थितीत युरियाचा अनुक्रमे निचरा होऊन अथवा हवेत विरघळून मोठ्या प्रमाणात नाश होतो. अशावेळी युरियाला पर्यायी विद्राव्ये खतांचे एक ते दीड टक्का द्रावण फवारणीच्या स्वरूपात पिकाला देता येते. तसेच युरियाएेवजी संयुक्त दाणेदार खते पिकाला दिल्यास नत्राबरोबरच स्फुरद आणि पालाश हे अन्नघटकदेखील पिकांना मिळून चांगल्या वाढीबरोबरच उत्पादन वाढ होऊ शकते. खरे तर यातील तज्ज्ञांनी युरियाला पर्यायी पिके कोणती, ती कशी, कधी वापरायची याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला हवी. युरियाच्या अधिक वापरास शासनाचे धोरणच जबाबदार आहे. सध्या रासायनिक खतांना ‘न्युट्रियंट बेसड् सबसिडी’चे धोरण आहे. यात युरियाला अधिक प्रमाणात अनुदान मिळते. महत्त्वाचे म्हणजे युरियाच्या पुरवठ्यापासून ते दर ठरविणे, ते नियंत्रणात ठेवणे हे काम शासनच करते. शासनाने सध्याचे अनुदानाचे धोरण बदलायला हवे. तसेच युरियाप्रमाणे इतर खतांचा पुरवठा, दर ठरविणे यावर शासनाचे नियंत्रण आले तर तेही शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध होतील. असे झाल्यास राज्यात कोणत्याही रासायनिक खताची टंचाई जाणवणार नाही शिवाय रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यास हातभारच लागेल.
- 1 of 56
- ››