रणरागिणी तुला सलाम!

शेतीतील अडचणी असो अथवा कुटुंबातील आर्थिक समस्या पती-पत्नी दोघांच्याही विचाराने हाताळावी, हा मानवी विचार जेव्हा समाजमनात रुजेल, त्या दिवशी शेतकऱ्याच्या पत्नीला बळ मिळेल.
संपादकीय
संपादकीय

यवतमाळ येथील ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन खरे तर नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होते. परंतु ‘निमंत्रण वापसी’मुळे या मंगलमय सोहळ्याच्या उद्‍घाटनाचा मान वैशाली येडे या विधवा महिला शेतकऱ्याला मिळाला. आपल्या उद्‍घाटनपर भाषणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवांच्या वाट्याला येणारं जीणं तर त्यांनी मांडलच, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे व्यवस्थेचे बळी आहेत. असा आसूडही शासन-प्रशासनावर ओढला. त्यांच्या भाषणाला भावनेची किनार अन् आक्रमकतेची धारही होती. विधवा अथवा एकट्या महिलेकडे समाजाच्या पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबत चिंता व्यक्त करून मी रडत बसणार नाही तर लढणार आहे, हेही या रणरागिणीने स्पष्ट केलं. केवळ १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या महिलेचे भाषण दुःख, व्यथा, संघर्षाबरोबर चिंता, चिंतन, विचार, साहित्य आणि तत्त्वज्ञानाने भरलेले होते. आपला पुनर्जन्मावर विश्वास नाही, तर याच जन्मी लढून वायद्याची शेती फायद्याची करण्याच्या या मर्दानीच्या इराद्याला खरे तर सर्वांनी सलाम करायला हवा. दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात. परंतु एकही महिला शेतकऱ्याने अथवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या विधवेने आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. उलट शेतकऱ्याने ज्या काही अडचणींमुळे आत्महत्या केली त्या अडचणींबरोबर नवऱ्याच्या आत्महत्येचे दुःख आणि समाजाची वक्रदृष्टी हा सर्व भार पेलत अनेक महिला हार न मानता संसाराचा गाडा ओढत आहेत, या पुढेही ओढत राहणार, पण हे असे किती दिवस चालणार आहे. 

महिला ही एक फार मोठी ताकद आहे. ती गुणी आहे. सहनशील आहे. दुःख झेलण्याची तिच्यात क्षमता आहे. कष्ट, उद्यमशीलता आणि बचत हे तिचे अंगभूत गुण आहेत. शेतीच्या शोधापासून ते आजही आधुनिक शेती आणि कुटुंबाचा भार अनेक महिला एकहाती पेलतात. शेती नसलेल्या ठिकाणी मोलमजुरी अथवा धुणी-भांडी करून अनेक महिला आपले कुटुंब पोसतात. परंतु आजही या कष्टकरी महिलेच्या वाटेला उपेक्षेशिवाय काहीही येत नाही. शेती अथवा कुटुंबातील आर्थिक निर्णय प्रक्रियेत तिला स्थान मिळत नाही. महिलेने कष्ट करावे, कुटुंबाला पोसावे, दुःख सहन करावे, तिला आर्थिक उलाढालीची काहीही माहिती नसावी, हे सर्व दुर्दैवी आहे. शेतीतील अडचणी असो अथवा कुटुंबातील आर्थिक समस्या पती-पत्नी दोघांच्याही विचाराने हाताळावी, हा मानवी विचार जेंव्हा समाजमनात रुजेल त्या दिवशी शेतकऱ्याच्या पत्नीला बळ मिळेल. परिस्थिती कितीही बिकट असली तरी ती कोलमडणार नाही आणि शेतकऱ्याला पण कोलमडून पडू देणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, अनेक शेतकऱ्यांच्या विधवांच्या वाट्याला येणारे दुःख, कष्ट कमी होईल.

दिवसेंदिवस उत्पादन खर्चात पडत असलेली भर, अनेक कारणांनी होणारी नापिकी, शेतमालास मिळणारा अत्यंत कमी भाव आणि या सर्वांतून वाढता कर्जबाजारीपणा ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. शासनाने खरोखरच हा विषय गंभीरतेने घेऊन उपाय योजना केल्या तर येथून पुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. परंतु मागील दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्या थांबत तर नाहीत, उलट त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कुठेही नोंद होत नाही. काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या निकषांत बसत नाहीत. या सर्व कुटुंबांना शासन वाऱ्यावर सोडते. शासन दरबारी नोंद झालेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची योग्य दखलही घेतली जात नाही, त्यांच्यासाठीची मदत त्यांच्यापर्यंत पोचत नाही. शेतकऱ्यांच्या विधवांना साध्या मागण्यांसाठी मुंबईला जाऊन शोकसभा घेऊन आपले गाऱ्हाणे मांडावे लागते. या सर्व बाबी गंभीर आहेत. राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, असे खरे तर शासनाचे नियोजन पाहिजे. अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केलीच तर त्याच्या कुटुंबाची हेळसांड होणार नाही, ही जबाबदारी शासनासह समाजानेही पार पाडायला हवी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com