व्यंकट अय्यरची कहाणी

व्यंकट अय्यर यांनी आपल्या आयटी नोकरीतील नियोजन-व्यवस्थापन तर शेतीत वापरलेच; शिवाय सातत्याच्या प्रयोगातून शेतीतील अडचणी दूर केल्या. अनुभवातून जोखीम कमी केली.
संपादकीय
संपादकीय

शेतीतील वाढत्या समस्यांना तोंड देत उत्पादन मिळविले तरी शेवटी हा व्यवसाय तोट्याचाच ठरत आहे, असे बहुतांश शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. असा तोट्याचा व्यवसाय का करायचा, म्हणून अनेक शेतकऱ्यांची मुलं आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती सोडून कोणतेही काम करायला तयार आहेत. तोट्याच्या शेतीला कंटाळलेले अनेक शेतकरी पर्यायी उत्पन्नाचे साधन त्यांना मिळाल्यास शेतीस रामराम ठोकण्यास तयार आहेत. एकीकडे शेतीचे असे निराशाजनक चित्र पाहावयास मिळते तर त्याचवेळी दुसरीकडे काही उच्चशिक्षित तरुण चांगली पगाराची नोकरी, शहरी सुखवस्तू राहणीमान सोडून शेतीत उतरत आहेत. शेतीत उतरलेले हे शिक्षित तरुण कल्पकता आणि ज्ञानाच्या बळावर आपली शेती यशस्वीसुद्धा करीत आहेत. हा खरे तर शेतकरी समाजापुढे खास करून शेतकऱ्यांच्या तरुण मुलांपुढे एक वेगळा आदर्श म्हणावा लागेल. व्यंकट अय्यर या आयटी इंजिनिअरच्या डोक्यात दशकभरापूर्वी शेतीचे खुळ भरले होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे असलेल्या समस्या त्यांच्यापुढेही होत्या. नैसर्गिक आपत्तींचे आव्हान त्यांच्यापुढेही होते. विशेष म्हणजे शेतीतील कोणताच अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता, ही इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळी अडचण त्यांच्यापुढे होती. मात्र, कल्पकता आणि प्रयोग करण्याची तयारी असेल तसेच शेतीचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन असेल तर शेती शाश्वत होते, हा धडा त्यांनी राज्यातील तमाम शेतकरी वर्गापुढे ठेवलाय. व्यंकट अय्यर यांनी त्यांच्या शेतीतील अनुभव ‘मूॅंग ओव्हर मायक्रोचिप्स’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाची दखल राज्य शासनाने घेतली असून त्यातील नष्ट होणाऱ्या भात वाणाचे त्यांनी केलेले संवर्धन हा धडा इंग्रजी माध्यमाच्या अकरावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे.  

खरे तर १९८० पूर्वीच्या पारंपरिक शेतीत शिक्षणाची गरज नव्हती. त्या वेळी पारंपरिक पिके, त्यांची पारंपरिक पद्धतीनेच लागवड केली जात असे. शेतीत बहुतांश निविष्ठा या घरच्याच वापरल्या जात असल्याने बाहेरुन काही आणावे लागत नव्हते. मजुरांची टंचाई नव्हती. नवतंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्धच नसल्याने त्यांचा अवलंब करण्याचा प्रश्नच नव्हता. शेतीत जेमतेम उत्पादन मिळायचे. त्यावेळच्या शेतकऱ्यांच्या गरजाही अत्यंत कमी होत्या, त्यामुळे उत्पादित शेतमालावर त्या भागविल्या जात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात चलनात फारसा पैसा नव्हता. या काळात शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेणे म्हणजे वेळ आणि पैसा वाया घालणे असे समजले जात होते. नोकरीला फारसे महत्त्व नव्हते. शिक्षण शिकल्यावर नोकरी तर करायची नाही, मग शेतीची कामेही जमणार नाहीत म्हणून शेतकऱ्याच्या मुलाला थोडेफार कळू लागले की शेतीचे धडे दिले जात होते. आता आधुनिक शेती ही शेतीचे ज्ञान घेऊनच करावी लागणार आहे. देशांतर्गत नव्हे तर जागतिक बाजार व्यवस्थेचा अभ्यास करून पीक पद्धतीत बदल करावे लागणार आहेत. शेतमाल विक्री, प्रक्रिया, निर्यात ही सर्व कौशल्याची कामे शिकूनच हस्तगत करावी लागतील. नवनव्या रोग-किडींचा बंदोबस्त, पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन, जैवविविधतेचे संवर्धन अशी कामे समजून उमजूनच करावी लागणार आहेत. नैसर्गिक-सेंद्रिय शेतीतील बारकावे शिकल्याशिवाय कळणार नाहीत. 

व्यंकट अय्यर यांनी आपल्या आयटी नोकरीतील नियोजन-व्यवस्थापन तर शेतीत वापरलेच शिवाय सातत्याच्या प्रयोगातून शेतीतील अडचणी दूर केल्या. अनुभवातून जोखीम कमी केली. शेती ही खुली प्रयोगशाळा आहे. सर्व शेतकऱ्यांकडे ही प्रयोगशाळा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध ज्ञान, अनुभवातून नवनवे प्रयोग करायला हवेत. पारंपरिक-आधुनिक शेतीची याेग्‍य सांगड घालायला हवी. विशेष म्हणजे शिक्षित तरुणांनी शेतीकडे पाठ न फिरविता ती अधिक शाश्वत कशी होईल, हा धडा व्यंकट अय्यर यांच्या कहाणीतून आपल्याला मिळतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com