agriculture stories in marathi agrowon agralekh on water budget | Agrowon

जललेखा अहवाल : अर्धवट आणि अवास्तवही

प्रदीप पुरंदरे
शुक्रवार, 17 मे 2019

२०१६-१७ चा जललेखा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. मला वाटले यात काही सुधारणा केल्या असतील, पण अपेक्षा भंग झाला. मुख्य लेखा परीक्षकांना २८ एप्रिल २०१९ रोजी पत्र लिहून परत एकदा मी या अहवालाबाबत आक्षेप घेतले आहेत. काय सांगतो २०१६-१७ चा जललेखा अहवाल पाहूया...
 

थेंब थेब पाण्याचा हिशेब लागावा, असा आग्रह सध्या धरला जातो आहे. तो रास्तही आहे. ग्रामीण भागात हा विचार पोचला आहे. सिंचन प्रकल्पांच्या सुशिक्षित व उच्चविद्याभूषित कर्त्याधर्त्यांना मात्र जललेखाची संकल्पना मनापासून मान्य नसावी, असे दिसते. जललेखा अहवाल, २०१६-१७ हा त्याचा पुरावा! जल व्यवस्थापनाशी संबंधित जलसंपदा विभागाच्या विविध कार्यालयांनी विहित कार्यपद्धती आधारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सिंचन प्रकल्पांच्या पाणीवापराचे हिशेब (अकाउंटस) ठेवणे प्रथमपासूनच अपेक्षित होते.  त्या हिशेबांचे त्रयस्थ परीक्षण म्हणजे जललेखा (वॉटर ऑडिट). प्रत्येक सिंचन प्रकल्पात पाण्याचे हिशेब लागावेत, जल व्यवस्थापनात शास्त्रीयता व पारदर्शकता यावी, जल व्यवस्थापनाची कार्यक्षमता उत्तरोत्तर वाढावी एवढेच नव्हे, तर समन्याय प्रस्थापित व्हावा, हे जललेखाचे हेतू आहेत. वाल्मीतील एक प्राध्यापक या नात्याने जललेखा-प्रक्रियेशी प्रथमपासून डिसेंबर २०११ पर्यंत म्हणजे सेवानिवृत्तीपर्यंत माझा जवळून संबंध आला. पीआयपी म्हणजे पाण्याचे हंगामपूर्व अंदाजपत्रक न करता, पाण्याचे व सिंचित क्षेत्राचे मोजमाप न करता, पाणी-चोरीचा उल्लेखसुद्धा न करता, अशास्त्रीय व अविश्वासार्ह आकडेवारीच्या आधारे जललेखा करून फसवणूक केली जात आहे, हे लक्षात आल्यावर २००९-१० च्या जललेखा अहवालाबाबत आक्षेप घेणारा एक लेख मी जलसंपदा विभागास १७ ऑगस्ट २०११ ला सादर केला होता. शासनाने तो अहवाल माघारी घ्यावा, अशी मागणी केली होती. तेव्हा शासनाने जललेखा-प्रक्रियेत सुधारणा करण्याऐवजी अहवाल तयार करणेच बंद केले.

आता इतक्या वर्षांनंतर परत जललेखा अहवाल प्रकाशित व्हायला लागले. २०१६-१७ चा जललेखा अहवाल वाचनात आला. मला वाटले काही सुधारणा केल्या असतील, पण अपेक्षा भंग झाला. मुख्य लेखा परीक्षकांना  २८ एप्रिल २०१९ रोजी पत्र लिहून परत एकदा मी आक्षेप घेतले आहेत. काय सांगतो २०१६-१७ चा जललेखा अहवाल? पुढे दिलेल्या तपशिलाबाबत दस्तूरखुद्द जललेखा परीक्षकांनीच कबुल्या दिल्या आहेत.
  -  ६४ मोठे, २५४ मध्यम, २१८६ लघु अशा एकूण २५०४ प्रकल्पांचा जललेखा करण्यात आला. (विस्तार भयास्तव लघु प्रकल्पांचा तपशील येथे देण्यात आलेला नाही)
  -  २०१६-१७ या वर्षात प्रत्यक्ष उपयुक्त साठा ३० हजार ९८२ दलघमी एवढा होता. त्यातून झालेल्या  पाणीवापराची टक्केवारी पुढीलप्रमाणे - बाष्पीभवन (१४), बिगर सिंचन (१५), सिंचन (६३) आणि विनावापर शिल्लक (७)
-    ६४ मोठ्या प्रकल्पांपैकी १८ प्रकल्पांनी (२८ टक्के) आणि २५४ मध्यम प्रकल्पांपैकी १०१ प्रकल्पांनी (४० टक्के) पाण्याचे अंदाजपत्रक (पीआयपी) केले नव्हते. पीआयपी केलेला नाही, ही वस्तुस्थिती असताना तसे न म्हणता ‘पीआयपी’ च्या रकान्यात माहिती भरली नाही, असे अहवाल म्हणतो. 
 -   ५ मोठ्या व ३८ मध्यम प्रकल्पांची ‘पीआयपी’च्या तुलनेतील कामगिरी ५० टक्क्यांपेक्षा कमी होती.
-    प्रकल्पीय गृहितकाच्या तुलनेत काही प्रकल्पात फार जास्त बाष्पीभवन दाखवले आहे. उदाहरणार्थ, वान (१४६ टक्के), ऊर्ध्व प्रवरा समूह (१४६ टक्के), ऊर्ध्व वर्धा (१७० टक्के), कन्हेर (१३६ टक्के), उळशी (१५६ टक्के), उरमोडी (१६२ टक्के)
-    १३० हेक्टर / दलघमी या निकषानुसार १२ मोठ्या व २६ मध्यम प्रकल्पांची कामगिरी ६० टक्क्यांपेक्षा कमी होती, तर ४ मोठ्या व ३३ मध्यम प्रकल्पात काहीच ताळमेळ लागला नाही. (हेक्टर/दलघमी हा निकषच मुळात अशास्त्रीय आहे, कारण त्यात पीक, पिकाची सिंचनाची गरज, पाणी-पाळ्यांची संख्या आदींचा विचार नाही)
  -  कालव्यांची वहनक्षमता ११ मोठ्या प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा कमी, तर ३७ मोठ्या प्रकल्पात अवास्तव दाखवण्यात आली आहे. 
 -   मोठ्या प्रकल्पात १३७९ दलघमी आणि मध्यम प्रकल्पात ६०५ दलघमी, असे एकूण १९८४ दलघमी पाणी सिंचन वर्ष अखेर विनावापर शिल्लक राहिले. शेतीचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवायची पूर्व तयारी म्हणून काही धरणात पाणी का शिल्लक राहते, याचा अभ्यास न करता फक्त पाणीवापर होत नाही, अशी हाकाटी करून तसे रेकॉर्ड तयार करणे हा तर हेतू नाही?
-    पाणी-चोरी खुलेआम होत असताना तिचा उल्लेख अहवालात नाही. पाणीचोरीची आकडेवारी दर्शवण्यासाठी विहित नमुना उपलब्ध नाही, असा खुलासा संबंधित अधिकाऱ्याने वर्तमानपत्रात केला. काय बोलावे? 
परिस्थिती अशी उद्वेगजनक असताना प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र (२२.७६ लक्ष हेक्टर) मात्र ‘पीआयपी’तील गृहितापेक्षा (१९.१५ लक्ष हेक्टर) जास्त आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए।

जललेखा अहवालांबाबत जलसंपदा विभाग गंभीर व प्रामाणिक नाही. क्षमता वृद्धीऐवजी फक्त आभास/प्रतिमा निर्माण करण्याकरिता केलेले एक वार्षिक कर्मकांड असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे. महागड्या गुळगुळीत कागदावर रंगीबेरंगी आलेखांसह अहवाल छापला जातो. त्याची कोठेही दखल घेतली जात नाही. कोणालाही जबाबदार पकडले जात नाही. प्रकल्प-प्रकल्पातील मूळ जमिनी परिस्थितीत काहीही बदल होत नाही. अशास्त्रीय, अवास्तव, प्रत्यक्ष मोजमापावर न आधारलेली आकडेवारी बिनदिक्कत अधिकृतरीत्या प्रसिद्ध केली जाते. चूक/अर्धवट माहिती आली व ती छापून टाकली (गार्बेज इन, गार्बेज आऊट!) असे जललेखा अहवालांचे एकूण स्वरूप आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांचे शास्त्रीय जल व्यवस्थापन करण्याकरिता खालील बाबी किमान आवश्यक असतात. त्या मुळात आहेत का? वेळोवेळी त्यात सुधारणा करून त्या अद्ययावत केल्या गेल्या आहेत का? अचूक व विश्वासार्ह आहेत का? हा तपशील आता प्रकल्पवार तपासला पाहिजे.
-    वितरण व्यवस्थेत पाण्याचे नियंत्रण व नियमन करण्याकरिता दारे व काट नियामक (क्रॉस रेग्युलेटर्स) 
 -   पाणी मोजण्यासाठी प्रवाह मापक / वॉटर मीटर 
-    बाष्पीभवन पात्रे  
-    पाणीवापराच्या विश्वासार्ह नोंदी    
या किमान आवश्यक बाबींची पूर्तता होणार नसेल, तर जललेखा करतो म्हणण्याला तसा काही अर्थ नाही. कोणतेही सोंग फार काळ टिकत नाही!

प्रदीप पुरंदरे  ः ९८२२५६५२३२
(लेखक जलतज्ज्ञ आहेत.)


इतर संपादकीय
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
वणवा पेटतोयअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे...
कार्यक्षम खत व्यवस्थापनेतून साधूया...हरितक्रांतीच्या यशात अधिक उत्पादनक्षम गहू बियाणे...
घरात असावे एकमत‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक...
काटेरी राजमुकुटमहाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या...
गोसमृद्धीची अग्निपरीक्षा तीन दिवस पुणे ‘गो'' रंगात सजणार आहे. गाय आणि...
योजना माझ्या हातीकृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत...
दारिद्र्यनिर्मूलनासाठी हवा ठोस कार्यक्रमआज रोजी देशातील कोट्यधीशांची संख्या वाढत असताना...
आमदार बंधूभगिनींनो पत्रास कारण की...आमदार बंधूभगिनींनो नमस्कार,  आजघडीला...
अखेर फासे उलटलेच!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी...
गोवंशहत्याबंदी अव्यवहार्यच!महाराष्ट्र या (तथाकथित) पुरोगामी राज्यात...