agriculture stories in marathi agrowon Agromoney arthkatha, grain merchant Gorakha Labhade & Sandeep Dharbale success story | Agrowon

मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी विस्तारली शेतकऱ्यांपर्यंत

मनोज कापडे
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप धारबळे या युवा शेतकरी मित्रांनी केवळ तीन लाखाच्या भांडवलावर अन्नधान्याच्या व्यापारात उडी घेतली. आज त्यांची व्यावसायिक उलाढाल आज साडेपाच कोटीच्या पुढे गेली आहे.

आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप धारबळे या युवा शेतकरी मित्रांनी केवळ तीन लाखाच्या भांडवलावर अन्नधान्याच्या व्यापारात उडी घेतली. आज त्यांची व्यावसायिक उलाढाल आज साडेपाच कोटीच्या पुढे गेली आहे. लहानपणापासूनची मैत्री व पुढे व्यवसायातील भागीदारी जपतानाच अनेक शेतकऱ्यांचे, ग्राहकांचे जाळे त्यांनी उभे केले आहे. मैत्री इतकीच ही शेतकऱ्यांसोबतची भागीदारीही विश्वासाने व सचोटीने जपत असल्याचे ते सांगतात.

नाशिक जिल्ह्यातील आडगाव शिवारातील येथील गोरक्ष शिवाजी लभडे आणि संदीप शांताराम धारबळे हे लहानपणापासूनचे मित्र. शाळेपासून सुरू झालेली मैत्री पुढे कॉलेजमध्येही कायम राहिली. पुढे दोघांनीही भागीदारीमध्ये एकाच धान्य विक्री व्यवसायात उडी घेतली. भागीदारीमध्ये दोघांचे कष्ट समान, ध्येय समान, तोटा समान आणि नफाही समान. या मित्रांनी व्यवसाय कसा करावा, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
आपल्या प्रवासाविषयी गोरक्षने सांगितले, “आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकताना पाचवीपासून मित्र झालो. एकाच बेंचवर बसणे, अभ्यास, जेवण एकत्र यातून मैत्री दृढ होत गेली. २००२ मध्ये दहावी झाल्यानंतर नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ‘केटीएचएम’ महाविद्यालयात आम्ही एकाच बेंचवर शिकत २००७ मध्ये बी. कॉम झालो. पुढे दोन वर्षात आयआयजेटी मध्ये संगणक लेखा शास्त्र शिकलो. दोघांनाही नोकरीमध्ये रुची नसल्याने शेती निगडित एखादा व्यवसाय सुरू करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यात सुदैवाने आमचा मित्र रितेश देशमुख सोयाबीन व्यापारात होता. त्याच्याच प्रोत्साहनामुळे आम्हीही धान्य ‘ग्रेन मर्चंट’ होण्याचा संकल्प सोडला.”
रितेशची भेट होताच उत्साही गोरक्ष-संदीपने खानदेशच्या प्रसिद्ध महाराष्ट्र ऑइल मिलचे संचालक मनोज अग्रवाल यांची भेट घेतली. त्यांनीही या दोघा मित्रांना प्रोत्साहन दिले. “तुम्ही माल पाठवा. चांगला व्यवसाय करा. प्रामाणिकपणे काम करा. माझे तुम्हाला मार्गदर्शन राहील. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल माझी मिल विकत घेईल,” अशा शब्दात अग्रवाल यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर केवळ ३० दिवसात शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीला सुरवात केली. प्रारंभिक भांडवलासाठी पैशाची कमतरता भासू लागली. सुरवातीला धान्य व्यापारामध्ये उतरण्याऐवजी नोकरी किंवा अन्य काही व्यवसाय करण्याचे कुटुंबीयांनी सुचवले. मात्र दोघांचा निश्चय पाहून दोघांच्याही आईवडिलांनी साथ द्यायचे ठरवले. गोरक्षची आई सुमन लभडे आणि संदीपची आई ताराबाई धारबळे यांनी दागिने गहाण ठेवण्यास मान्यता दिली. या उद्योगासाठी दागिने गहाण ठेवत साडेअकरा टक्के व्याजाने तीन लाख रुपये भांडवल उभारले. पहिल्या आठ दिवसात गावोगावी फिरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. संदीपने सांगितले,‘‘ आमच्या संकल्पाला बळ देण्याचे पहिले उपकार आईवडिलांचे, तर दुसरे उपकार आहेत, ते आमच्या विश्वास ठेवत सव्वा लाख रुपयांचा माल उधारीवर देणाऱ्या शेतकऱ्यांचे! आमचे पहिले शेतकरी विंचूरगवळी येथील राजाराम बाबूराव वाघचौरे हे होते.’’
अशा प्रकारे चार लाख ३२ हजार रुपयांचा १८ टन सोयाबीन खरेदी केला गेला. या सौद्यात शेतकऱ्यांनाही चांगला दर (प्रति क्विंटल २४०० रुपये) दिला. या व्यवहारात प्रति क्विंटल ३५० रुपये फायदा झाला.
सोयाबीन खरेदीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी गोरक्ष आणि संदीप दोघेजण शेतकऱ्यांना सातत्याने भेटत होतो. मोटारसायकलवर सकाळी ९ ते संध्याकळी सात वाजेपर्यंत फिरत असू. त्यातून त्यांना आमच्याबद्दल विश्वास वाढत गेला. पहिल्याच वर्षी दोघांनी आडगाव, पिंप्री, विंचूरगवळी, माडसांगवी, वासाळी, म्हसरूळ, खेरवाडी या गावांमध्ये फिरून शेतकऱ्यांकडून २५ लाख रुपयांची खरेदी केली. या कष्टातून पहिल्याच हंगामात एक लाख रुपये मिळाले. ही पहिली कमाई वाटून घेतल्यानंतर आईवडिलांच्या हाती सोपवली. त्यांना खूप आनंद झाल्याची आठवण संदीपने सांगितली.

सोयाबीननंतर अन्य अन्नधान्यातही केला शिरकाव

मुळात नाशिक भाग हा द्राक्ष, डाळिंब, कांदा, टोमॅटो उत्पादक पट्टा. मात्र, २००९ ते ११ अशी तीन वर्ष दोघांनी फक्त सोयाबीनचा व्यापार केला.
प्रवाहाच्या विरुद्ध व्यापार करण्याचे हे कसब होते. सोयाबीन हंगाम केवळ तीन महिने असतो. उर्वरित ९ महिने काय करायचे म्हणून गहू व्यापारात शिरकाव करण्याचे दोघा मित्रांनी ठरविले. २०१२ मध्ये क्लिनिंग मशिन घेत गहू व्यवसायात उतरलो. शेतकऱ्यांकडून पाच लाख रुपयांची गहू खरेदी करून दुकानदारांना पुरविला. गहू खरेदी विक्री व्यतिरिक्त शेतकऱ्यांना गहू साफसफाई करून ५० किलोचे कट्टे तयार करून देण्याचे काम देखील सुरू केले. या नियोजनात राहुल खुळे व अंकुश तांबे या दोन शेतकरी मित्रांची त्यांना मोलाची मदत होते.
आम्ही २०१२ पासून मका खरेदीलाही सुरवात केली. पहिल्याच वर्षी सुमारे १२ लाखाचा मका पोल्ट्री उद्योगाला पुरविला.
दोघांनी २०१५ पर्यंत सोयाबीन, गहू, मका खरेदीत चांगलाच जम बसवला. २०१६ मध्ये दोघांनी अन्नधान्याचे होलसेल ट्रेडिंग सुरू केले. त्यामुळे आता तांदूळ, डाळी, गहू, बाजरी, ज्वारीचे व्यवहार सुरू केले. दुकानदारांना रिटेलमध्ये पुरवठा केला जाऊ लागला. यातून गेल्या वर्षी साडेतीन कोटीची तर यंदा आतापर्यंत पावणे सहा कोटीची उलाढाल गोरक्ष-संदीप या दोघांनी केली आहे. पहिल्याच वर्षी पाच गाड्या धान्य खरेदी करणारी ही जोडी आता शेतकऱ्यांकडून १००-१०० गाडी शेतमाल खरेदी करते आहे. अगदी कोरोनाच्या काळातही या दोघांनी फोनवर अन्नधान्याच्या ऑर्डर घेत अडीच हजार घरांना घरपोच सुविधा दिल्या. सुमारे ७० लाखांची उलाढाल केली आहे.

पहिला तोटा पाच लाखाचा

व्यवसाय म्हटले की फायद्याबरोबर तोटाही आलाच. सुरवातीपासून नफ्यामध्ये राहायची सवय झाल्याने तोट्याची सवय नव्हती. त्याचा अनुभव दोघा मित्रांना २०११ मध्ये आला. कंपनीतून मागणी एकदम कमी झाली. आम्ही माल खूप खरेदी केला होता. त्यामुळे पाच लाखाचा तोटा झाला. तरिही न घाबरता खरेदीत सातत्य ठेवले. शेतकऱ्यांचा एक रुपया चुकवला नाही. दुसऱ्या वर्षी गाडी रुळावर आली. तेव्हापासून दोघांनी पाठीमागे फिरून पाहिले नाही.
धान्याची साठवणही काही करता यावी, या उद्देशाने २०१६ मध्ये गोरक्ष-संदीपने आडगाव शिवारात स्वतःचे धान्य गोदाम उभारले. १०० गाडी माल साठवण्याची क्षमता गोदामाची आहे. रोजच्या रोज देवाणघेवाण करायची असल्याने फार पक्क्या बांधकामांची गरज नव्हती. अत्यंत कमी खर्चात म्हणजे दहा लाखात गोदाम बांधले. या गोदामामुळे आता ३० जणांना रोजगार मिळाला आहे. मार्केटिंगचे काम आता शेतकरी कुटुंबातील जितेंद्र चव्हाण यांच्याकडे दिले आहे. आता गूळ, तेल देखील खरेदीही सुरू केली आहे. काही डाळमिल, राईसमिल यांच्याकडूनही माल येतो. त्याची बाजारात विक्री केली जाते. सध्या आम्ही दहा हजार शेतकऱ्यांशी व्यवहार करतो. शेतकऱ्यांना चार पैसे आम्ही जादा मिळवून देत असल्याचा आम्हाला आनंद आहे. यामध्ये पार्वती ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक विजू कांतिलाल वाघ यांचे खूप मार्गदर्शन मिळत असल्याचे गोरक्ष यांनी सांगितले.

सुरवातीला नकार देणारे देतात आता निमंत्रण

व्यवसायात गोरक्ष-संदीप दोघेही नवीन होते, त्यामुळे त्यांच्यावर अनेक सोयाबीन उत्पादक आणि व्यापारी विश्वास ठेवायला नकार देत. उत्पादकांना रोख रक्कम हवी असायची. तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा रोकडा सवाल ते करीत. मात्र, आता चांगल्या व्यवहारातून विश्वास मिळवला आहे. हेच उत्पादक आता आम्हाला बोलावतात. आमचा माल घेणारा एक दुकानदार बेपत्ता झाला. त्याने एक लाख रुपये बुडविले. तरीही विश्वासू दुकानदारांबरोबरच्या व्यवहार सुरू ठेवले. या प्रवासात आम्हाला सुनील संपत भोसले आणि विनायक यशवंत पागेरे यांची मदत झाली. समस्येच्या काळात ते आमच्या पाठीशी उभे राहिल्याचे संदीपने स्पष्ट केले.

जाचक बाजारसमिती कायद्याचा अडसर

धान्य व्यापार सुरू केल्यानंतर गोरक्ष आणि संदीप या दोघांना बाजारसमिती कायद्यामुळे सर्वात जास्त अडचणी आल्या. मार्केटमध्येच या, परस्पर शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू नका, असा दबाव त्यांच्यावर आणला जात असे. शेतकरीही आमच्याकडे येण्यास घाबरत असते. त्यामुळे आम्हाला मार्केट फी भरून शिवारातच धान्य गोळा करावे लागे. आता केंद्र व राज्य शासनाने हा जाचक कायदा बदलला आहे. नव्या कायद्याच्या तरतुदीही सरळ शेतकऱ्याकडून खरेदीला प्रोत्साहन देणाऱ्या वाटतात. कोणत्याही शुल्काविना राज्यभर शेतकऱ्यांकडून माल खरेदीचे व्यवहार शक्य होतील. यामुळे आमच्यासारख्या नेकीने व्यवहार करणाऱ्या अनेक व्यापारी व बाजारसमितीत माल नेण्याची सक्ती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची भावना असल्याचे मत गोरक्ष व संदीप यांनी व्यक्त केले.

आता लक्ष निर्यातीवर!

ग्रेन मर्चंट म्हणून यशस्वी झाल्यानंतर गोरक्ष आणि संदीप यांनी आता भविष्यातील ध्येय ठेवले आहेत, ते ॲग्री प्रोड्यूस एक्सपोर्टर व्हायचे. त्यासाठी त्यांचे प्रेरणास्थान आहे ते सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक विलास विष्णू शिंदे यांचे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दोघांनी आता निर्यातीचा अभ्यास सुरू केला आहे. परदेशांमधील खरेदीदार कसे शोधायचे, कंटेनर कसा पॅक करायचा, निर्यातीचा माल कसा खरेदी करायचा, या साऱ्या प्रक्रिया बारकाईने शिकत आहोत. सखोल अभ्यासानंतर निर्यातीमध्ये नक्कीच उतरणार असल्याचे या जिगरबाज जोडगोळीने विश्वासपूर्वक सांगितले.

शेतमाल व्यापारातील टिप्स

  • शेतकऱ्यांनीही शेतमाल व्यवसायात अभ्यासपूर्वक उतरले पाहिजे.
  • स्वतःचा माल स्वतः विकायला शिकावे. आधी तोटा झाला तरी अनुभवातून शिकत व्यवहार करत राहिले पाहिजे.
  • स्वप्न पाहायला हवे. त्या दिशेने जाण्यासाठी नियोजन करत अभ्यास, कष्टाची जोड दिली पाहिजे.
  • शेतमाल व्यवसायासाठी भांडवल उभारणी, मनुष्यबळाची जुळवाजुळव आवश्यक.
  • ग्राहकांचे आणि खरेदीदारांचे जाळे तयार करावे लागते. सध्याच्या विविध जाळ्यांचा अभ्यास करावा.
  • व्यवसाय सुरू करताना एक शेतीमाल (कमोडिटी) निवडा. त्याच्यावरच काम करा.

    संपर्क- संदीप धारबळे, ७८७५५२७१८८
              गोरक्ष लभडे, ७८७५५२७१९९


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...