ससाणे बंधूंनी नगदी पिकांना दिली आंतरपिकाची जोड

नगदी पिकांना आंतरपिकाची ससाणे बंधूंनी दिली जोड
नगदी पिकांना आंतरपिकाची ससाणे बंधूंनी दिली जोड

सातारा जिल्ह्यातील कवठे (ता. वाई) येथील शिवाजी बबन ससाणे यांचे १८ सदस्यांचे एकत्रित कुटूंब आहे. शिवाजी, विठ्ठल, प्रताप, राजेंद्र या चारही भावांनी एकीच्या बळावर जिरायती शेती बागायत करत हळद, ऊस अशी नगदी पिके घेतली आहे. या पिकांसह अंजीर, पेरू, डाळिंब अशा फळबागामध्ये भाजीपाल्याच्या आंतरपिकातून अधिक उत्पन्नाचा स्रोत तयार केला. प्रतवारी, थेट विक्री यामुळे चांगला दर मिळवतात. सातारा जिल्ह्यातील वाई हा हळद प्रसिद्ध तालुक्यातील कवठे हे बहुतांशी बागायत गाव. येथेही सर्वाधिक ऊस, हळद, आले ही पिके घेतली जातात. येथील शिवाजी बबन ससाणे यांच्याकडे १६ एकर जिरायत शेती होती. वडिलांच्या निधनामुळे दहावीनंतर त्वरित शेतीची जबाबदारी शिवाजीरावांवर आली. जिरायत शेतीच्या जिवावार आईच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीरावांनी आपल्या विठ्ठल, प्रताप, राजेंद्र या बंधूचे शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य दिले. हळूहळू हे बंधू हाताखाली येत गेले. आज १८ सदस्यांच्या या एकत्रित कुटूंबाचे चार बंधू म्हणजे चार खांब आहेत. शेतीमध्ये विहिरीचे काम करत बागायत केल्याने ऊस आणि हळद या पिकांची लागवड सुरू केली. २००६ मध्ये कुटुंबास दैनंदिन खर्चासाठी ताजा पैसा उपलब्ध होण्यासाठी वांगी, टोमॅटो यासह ढोबळी मिरचीची लागवड सुरू केली. यातून आलेल्या उत्पादनाच्या थेट विक्रीवर भर दिला. उत्तम दर मिळण्यासाठी शेतमालाची प्रतवारी करून बाजारपेठेत माल पाठवू लागले. परिणामी उत्तम दर्जाच्या भाज्या, नियमित पुरवठा यामुळे व्यापारी वर्गात विश्वासार्हता वाढली. यामुळे चांगले अर्थार्जनही होऊ लागले. आंतर पिकांचा यशस्वी पॅटर्न शेतात केवळ एकाच पिकांवर न अवलंबून राहता आंतरपिकांची जोड देण्याचा निर्णय सर्व बंधूनी एकमताने घेतला. २०१३ मध्ये एक एकर उसामध्ये साडेतीन फुटी सरीत एक आड सरीमध्ये वांग्याची लागवड केली. पहिल्या प्रयोगातून आलेल्या अडचणींचा विचार करून त्यांनी पुढील वर्षी साडेतीन ऐवजी साडेचार फुटांची सरी ठेवली. त्यात एक आड सरीत वांग्याचे यशस्वी उत्पादन घेतले. सरीतील अंतर हे प्रमुख पिकांसह आंतरपिकास फायदेशीर ठरते. आंतरमशागतीच्या कामामध्येही सुलभता येत असल्याने सरीतील अंतर नऊ फुटांवर नेले आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी एक एकर क्षेत्रात भरताच्या वांग्याची यशस्वी लागवड करत आहेत.

  • हळद काढल्यावर मार्च महिन्यात उसाची लागवड केली जाते.
  • उसाबरोबर अगोरा वांग्याची लागवड केली जाते.
  • ट्रॅक्टरच्या सहाय्याने साडे चार फुटांची सरी सोडली जाते.
  • एका सरीत वांगे व एका सरी उसाची लागवड केली केली जाते.
  • वांग्याच्या दोन रोपात चार फूट अंतर ठेवतात. दोन डोळ्यांच्या ऊस कांड्याची लागवड करतात.
  • लागवडीनंतर दोन महिन्यांनी वांग्याचे उत्पादन सुरू होऊन चार महिने उत्पादन घेतले जाते.
  • वांग्याची प्रतवारी करून मार्केटला पाठवले जातात.
  • एक एकर क्षेत्रातून १५ ते १८ टन भरताच्या वांग्याचे उत्पादन मिळते.
  • वांग्यास सरासरी २५ ते ३० रुपये प्रति किलो दराने साडे चार लाख रुपये मिळतात.
  • एकरी उसाचे ५० ते ५५ टन उत्पादन मिळते.
  • वांगी व उसासाठी सर्व खर्च मिळून पावने दोन ते दोन लाख रुपये भांडवली खर्च येतो.
  • दोन्ही पिकांचे पाच लाख ७५ हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता १२ महिन्यांच्या कालावधीत ३.७५ ते ४ लाख रुपये शिल्लक राहतात.
  • फळबागांमध्ये आंतरपिके ससाणे यांच्याकडे २० गुंठे क्षेत्रात पेरू, २० गुंठे अंजीर व १७ गुंठे क्षेत्रात भगवा वाणाची डाळिंब बाग आहे. या बागाची सघन पद्धतीने लागवड आहे. यातील पट्ट्यात हंगामनिहाय पावटा, वाटाणा, दुधी, कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, पालक अशा सात ते आठ प्रकारचा भाज्यांची लागवड केली जाते. यातील ५० टक्के भाजीपाल्याची थेट विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हळदीमध्ये टोमॅटोचे यशस्वी पीक घेतले आहे. अशा प्रकारे फळबागांचे बहर सुरू होईपर्यत आंतरपिकातून अर्थार्जन करत असल्याचे विठ्ठल ससाणे सांगतात. तसेच बांधावरही आंबा, चिकू, नारळ, लिंबू, जांभळे, आवळा, केळी, पपई ही फळझाडे लावली आहे. शेतीची वैशिष्ट्ये

  • दरवर्षी दोन ते अडीच एकरवर हळद लागवड असते. त्यातून उत्पादीत हळदीपासून वर्षाकाठी ५० ते ५५ क्विंटल हळद पावडर करतात. त्याच्या अर्धा किलोपासून पाच किलोपर्यंत पॅकिंग करून विक्री करण्याचे नियोजन अजित करतात. यामुळे बाजारभावाच्या तुलनेत अधिक दर मिळण्यास मदत होते.
  • गेल्या पाच वर्षांपासून एक एकर क्षेत्रातील ऊस बियाणे प्लॉट ठेवला जातो. घरगुती वापरासोबतच विक्रीही केली जाते.
  • उत्पादीत भाजीपाल्याची २५ टक्के विक्री थेट केली जाते.
  • ५० टक्क्यांहून अधिक कामे घरातील सदस्य करतात. आवश्यक तिथेच मजुरांची मदत घेतली जाते.
  • गोठा

  • गोठ्यात गाई व म्हशी सहा जनावरे असून तीन जातिवंत बैल आहेत.
  • आंतरमशागतीची कामे बैलाच्या सहाय्याने केली जातात.
  • शेणखत तसेच रासायनिक खताचा वापर शिफारशीप्रमाणेच केला जातो.
  • जबाबदारी कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदाऱ्या ठरल्या आहेत. सर्वात मोठे शिवाजीराव यांच्याकडे सर्व आर्थिक व्यवहार आहेत. विठ्ठल यांच्याकडे खत व्यवस्थापन, कीडनाशकांच्या फवारण्या, पिकांचे नियोजन ही कामे, तर प्रताप यांच्याकडे ट्रॅक्टर, मशागत व पाणी व्यवस्थापनाचे काम आहे. राजेंद्र हे गोठ्यातील जनावरे व पाणी व्यवस्थापनाचे काम पाहतात. घरातील महिला सत्वशिला, रूपाली, आशा यांच्याकडे भाजीपाल्याची तोडणी, शेतकाम, घरकाम यांची जबाबदारी असते. तर रूपाली यांच्याकडे शेतमालाची थेट विक्रीचेही काम पाहतात. आई यमुना यांचा कुटुंबाच्या जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असल्याचे ससाणे बंधू सांगतात. शिवाजीराव पुत्र अजित याचे कृषी व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी घेतली असून, नोकरीऐवजी स्वतःचा खते, बियाणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याची बहिण अनिता ही एम.एस्सी. झाली असून, ती हैदराबाद येथे नोकरी करते. ओमकार हा पशुवैद्यकीय पदविका करत आहे, तर समुद्धी, हर्षद, तनिष्का, कार्तिकी यांचे शालेय शिक्षण सुरू आहे. मुलेही शाळांच्या वेळा सांभाळून वेळेनूसार शेतात मदत करतात. शेतीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह निव्वळ शेतीच्या उत्पादनावर या कुटुंबाने २८०० वर्गफूट आकाराचा टूमदार बंगला बांधला आहे. सर्व शेती बागायत केली असून, ट्रॅक्टर घेतला आहे. या वर्षी एक एकर शेतीची खरेदीही केली आहे. अॅग्रोवनचे नियमित वाचक असून, यशस्वी शेतकऱ्यांना संपर्क करत असल्याचे विठ्ठल ससाणे यांनी सांगितले. विठ्ठल ससाणे, ९९७५९१९६८० अजित ससाणे, ८४५९०११९५२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com