‘लढा दुष्काळाशी‘ चर्चासत्रात प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन 

‘लढा दुष्काळाशी‘ चर्चासत्रात प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन 
‘लढा दुष्काळाशी‘ चर्चासत्रात प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन 

पुणे : गेल्या तीन वर्षांत पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे पीक उत्पादन, फळबागांवर प्रतिकूल परिणाम झाला. तरीदेखील प्रयोगशील शेतकऱ्यांनी परिस्थितीशी हार न मानता उपलब्ध पाणी, साधनसामग्री आणि पूरक उद्योगातून उत्पन्नाचे स्रोत तयार केले. अशा उपक्रमशील शेतकऱ्यांचे प्रयोग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आज (ता. २७) पासून दररोज औरंगाबादमध्ये होणाऱ्या ‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात मिळणार आहे. ‘लढा दुष्काळाशी’ या संकल्पनेवर आधारित चर्चासत्रामध्ये शून्य मशागत तंत्र, जल-मृद्संधारणातून शेती आणि गावाची विकास, गटशेतीतून दुष्काळी परिस्थितीवर मात, पूरक आणि प्रक्रिया उद्योगातून संधी, बांबू लागवड आणि उत्पादनांची बाजारपेठ याचबरोबरीने सीताफळ, पेरू लागवडीतून मिळालेला आर्थिक आधार याबाबत प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव दिशादर्शक ठरणार आहेत.  ता ः २८ डिसेंबर (शुक्रवार)  चर्चासत्र १ ः जमीन सुपीकतेसाठी शून्य मशागत तंत्र  वेळ ः सकाळी ११.३० 

  • गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत पीक उत्पादनासाठी जमीन सुपीता, सेंद्रिय कर्बाची पातळी, जमिनीतील ओलावा हे महत्त्वाचे घटक. सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय घटकांच्या बरोबरीने पीक व्यवस्थापन पद्धतीत बदल करावा लागणार आहे. त्यादृष्टीने शून्य मशागत तंत्र फायदेशीर आहे. चर्चासत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर शून्य मशागत तंत्र, तण व्यवस्थापन, उपयुक्त सूक्ष्मजीव व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्न, अन्नद्रव्ये आणि पाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 
  • पळसखेडे (ता. संगमनेर, जि. नगर) विकास कांडेकर यांनी तीन वर्षांपासून पाच एकर क्षेत्रामध्ये विनामशागत तंत्र, पीक अवशेषांचा वापर करत स्वीट कॉर्न, टोमॅटो, डाळिंब तसेच हंगामी पिकांची शेती यशस्वी केली आहे. विनानांगरणी आणि पीक अवशेषांचा सातत्याने वापर केल्यामुळे सुपीकता, जलधारणक्षमता तसेच जमिनीतील ह्युमस वाढल्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही कमी पाण्यात पिकांचे चांगले उत्पादन त्यांना मिळते. शेतीला त्यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन आणि गीर गो संगोपनाची जोड दिली आहे. 
  • भोरटेक (जि. जळगाव) येथील संजय महाजन हे अवर्षणप्रवण स्थितीवर मात करत संरक्षित पाण्यावर भरीताच्या व काटेरी वांग्याचे दर्जेदार उत्पादन घेतात. पीक अवशेषांचा वापर व सेंद्रिय पद्धतीचा वापरांवर त्यांचा भर असतो. कमी खर्च व गुणवत्तापूर्ण उत्पादन हे सूत्र बांधून संजय महाजन विविध पिकांचे नियोजन करतात. 
  • चर्चासत्र २ ः जल-मृद्संधारणातून शेती आणि ग्राम विकास  वेळ ः ३ 

  • दुष्काळी परिस्थितीवर मात करायची असेल, तर लोकसहभागातून जल-मृद् संधारण, गट शेती, पीक पद्धतीत बदल आणि काटेकोर पाणी वापराशिवाय पर्याय नाही. राज्यातील जिरायती पट्यातील काही गावांनी लोकसहभागातून शेती आणि ग्राम विकासाला चांगली दिशा दिली आहे. 
  • कडवंची (जि. जालना) गावचे प्रयोगशील सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांनी गावशिवारातील ‘मृद्संधारणातून जलसंधारण' या संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावली. गावशिवारात सुमारे दीड हजार एकरावर विस्तारलेल्या द्राक्ष बागा, वाढलेली पाणी पातळी, साडेसहाशेवर शेततळ्यांची निर्मिती आदी शाश्‍वत विकासाच्या कामात क्षीरसागर यांनी गावकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. 
  • गुणवंत मुंढे हे गेली दहा वर्षे मळेगावचे (ता. बार्शी, जि. सोलापूर) सरपंच आहेत. आदर्श गावाची संकल्पना त्यांनी साकार केली. जलयुक्तशिवार अभियानामध्ये मळेगावने गेल्या वर्षी राज्यात पहिला क्रमांक पटकावला. याचबरोबरीने तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव, स्मार्टव्हिलेज, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव यांसारख्या शासनाच्या योजनात गाव पहिला क्रमांक राहिले आहे. विकासकामांमुळे गावाला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम एक कोटींच्या घरात पोचली आहे. 
  • ता. २९ डिसेंबर (शनिवार)  चर्चासत्र १ ः गटशेतीतून करूया दुष्ळाळावर मात  वेळ ः सकाळी ११.३० 

  • कमी झालेले पाऊसमान, दरातील चढउतार, निविष्ठा, शेतीमाल वाहतुकीचा वाढता खर्च लक्षात घेता गटशेतीशिवाय पर्याय नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून अडचणींवर मात करीत शाश्‍वत बाजारपेठेही मिळविली आहे.  चर्चासत्रामध्ये गटशेतीबाबत डॉ. बी. एम. कापसे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८६ पासून औरंगाबाद, जालना, बुलडाणा तालुक्यांत गटशेतीला सुरवात झाली. हंगामी पिके त्याचबरोबरीने मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष उत्पादकांना गटशेतीने तारले आहे. 
  • कृषी कौशल्य विकास प्रकल्प ः  राज्य शासनाने शेती आणि पूरक व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी कृषी कौशल्य विकास प्रकल्पास सुरवात केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि गटशेतीबद्दल मार्गदर्शन चर्चासत्रामध्ये करण्यात येणार आहे. 
  • चर्चासत्र २ ः पूरक उद्योगातून प्रगती  वेळ ः ३ 

  • शेती आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक साथ दिली पूरक उद्योगाने. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी बाजारपेठ लक्षात घेत पूरक उद्योगातून शेतीला नवी दिशा दिली. चर्चासत्रामध्ये प्रयोगशील शेतकरी पूरक उद्योगातील अनुभव मांडणार आहेत. 
  • सततची दुष्काळी परिस्थिती, बाजारभाव आदी समस्यांवर बरबडी (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील श्रीधर सोलव यांनी रेशीम शेतीतून उत्तर शोधले. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत ‘चॉकी रेअरिंग’ सुरू केले. दर महा वीस हजार अंडीपुंजांपासून बाल्यावस्थेतील कीटकनिर्मिती करून त्यांचा पुरवठा करण्याची क्षमता सोलव यांनी निर्माण केली आहे. 
  • पाल (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील रवी राजपूत यांनी दीड एकर शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनास सुरवात केली. आठ वर्षांपूर्वी एका शेळीपासून सुरू झालेला हा उद्योग पन्नास शेळ्यांपर्यंत पोचला आहे. राज्य-परराज्यांतील नवीन शेळीपालकांना ते मार्गदर्शन करतात. त्यांनी ‘ॲग्रोवन गोट फार्म’ नावाने शेळीपालकांचा गट तयार केला आहे. 
  • अब्दी मंडी (जि. औरंगाबाद) येथील लक्ष्मी खंडागळे यांनी बाजारपेठेची गरज ओळखून खाद्यतेल निर्मिती उद्योगाला सुरवात केली. लक्ष्मी खंडागळे ‘देवगिरी’ ब्रॅंडने करडई, शेंगदाणा, खोबरेल, जवस, तीळ तेलाची राज्य- परराज्यांत विक्री करतात. या उद्योगामुळे बचत गटातील सदस्यांना रोजगाराची चांगली संधी तयार झाली. 
  • ३० डिसेंबर (रविवार)  चर्चासत्र १ ः किफायतशीर बांबू शेती आणि विविध उत्पादने  वेळ ः सकाळी ११.३०  

  • गेल्या काही वर्षांपासून जल-मृद्संधारण, फर्निचर उद्योग त्याचबरोबरीने जैव इंधनाच्या निर्मितीसाठी बांबू पिकाला महत्त्व आले आहे. कमी व्यवस्थापन खर्च आणि विविध उपयोग असणारे बांबू हे पीक येत्या काळात फायदेशीर ठरणारे आहे. 
  • निपाणी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील राजशेखर पाटील यांच्याकडे ५४ एकरांवर विविध बांबू जातींची लागवड आहे. याचबरोबरीने त्यांनी केसर आंबा, चिकू, नारळ लागवड केली आहे. एकात्मिक शेतीचे मॉडेल त्यांनी विकसित केले आहे. 
  • योगेश शिंदे हे पुणे येथील संगणक अभियंता. चौदा वर्षे देश- विदेशांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव. सन २०१६ मध्ये जर्मनीतून पुण्यामध्ये परत आल्यावर बाजारपेठेचा अभ्यास करत बांबू इंडिया कंपनीची सुरवात केली. कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बांबूपासून सायकल, स्पीकर, टूथब्रश, ट्रॅव्हल कीट, कॉर्पोरेट भेटवस्तू बनविण्यास सुरवात केली. सुमारे १८ देशांत त्यांच्या उत्पादनांची निर्यात होते. 
  • दुसरे सत्र ः 

    चर्चासत्र २ ः फळबागांतून समृद्धी  वेळ ः २.३०

  • जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांना फळपिकांनी आर्थिक ताकद दिली. हंगामी पिकांच्या जोडीला फळबाग हा शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून पुढे आला आहे. 
  • चर्चासत्रामध्ये अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक, प्रशिक्षण व संशोधन संघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी हे सीताफळाचे किफायतशीर उत्पादनाचे तंत्र आणि बाजारपेठ समजावून सांगणार आहेत. जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथे श्याम गट्टाणी यांची पंधरा एकर क्षेत्रावर सीताफळ लागवड आहे. 
  • केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील निवृत्ती पवार हे प्रयोगशील पेरू उत्पादक. लखनौ- ४९, सरदार व जी विलास या पेरू जातींच्या दर्जेदार उत्पादनावर त्यांचा भर आहे. शेतीला उत्पन्नाची जोड म्हणून मिनी डाळमिल सुरू केली. चर्चासत्रामध्ये निवृत्ती पवार पेरू फळबागेचे अनुभव मांडणार आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com