तणनाशकांची परिणामकारकता वाढविण्याचा विचार आवश्यक

तणनाशकांची परिणामकारकता वाढविण्याचा विचार आवश्यक
तणनाशकांची परिणामकारकता वाढविण्याचा विचार आवश्यक

मजुरांच्या कमतरतेमुळे तणनाशकांचा वापर वाढला असला तरी त्याच्या परिणामकारकता वाढविण्यासंदर्भात फारशी चर्चा भारतामध्ये होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या पातळीवर त्यामध्ये काही मिश्रणे केली जात असली तरी अधिक शास्त्रीय अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. या बाबत प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स (लेखक डॉ. व्ही. एस. राव) या पुस्तकामधील माहिती पाहू. गेल्या काही वर्षांमध्ये मजुरांच्या कमतरतेमुळे तणनाशकांचा वापर वाढला आहे. मात्र, तणनाशकांची खरेदी व वापर हा सामान्यतः दुकानदाराच्या सूचनेनुसार केला जातो. फारतर त्यासोबतचे माहिती पत्रक वाचले जाते. प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स (लेखक डॉ. व्ही. एस. राव) या पुस्तकामध्ये याबाबत एक सतर्कतेचा इशारा दिला आहे. ते म्हणतात, एखादे तणनाशक एखाद्या पिकासाठी निवडक म्हणून शिफारस केली जाते. मात्र, तरीही एखाद्या पिकाची नवीन जातीची लागवड करतेवेळी तणनाशकाच्या निवडकतेची मर्यादित क्षेत्रावर चाचणी करून पाहावी. योग्य खात्री पटल्यानंतरच सर्व क्षेत्रावर फवारणी करावी. निवडक तणनाशक म्हणजे शिफारसीत पिकामधील तणांसाठी तणनाशक वापरल्यानंतर सर्वसाधारणपणे पिकावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. मात्र, एखाद्या पिकाची एक जात निवडक असल्याने तणनाशकाला दाद देत नसली तरी त्याच पिकाच्या दुसऱ्या जातीवर अंशतः अगर संपूर्ण वाईट परिणाम दाखवू शकते. अनेक शास्त्रज्ञांनी या गुणधर्मावर संशोधन केले असून, अनेक पिकाबाबतचे अशा आंतरजातीय कमी - जास्त परिणामाचे संदर्भ पुस्तकात दिले आहेत. पिकावर एखादे रसायन पडल्यानंतर, त्याचे शोषण होणे, पसरणे व अन्नरसात मिसळून जाणे या सर्व टप्प्यावर काही अनुवंशिक गुणसूत्राचा संबंध येत असावा. यामुळे असे वेगवेगळे परिणाम मिळू शकतात. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये एखाद्या नवीन जातीसोबत निवडक तणनाशकांची फवारणी करून परिणामाची खात्री करून पाहावी लागेल. असेच परिणाम वेगवेगळ्या तणांबाबतही होऊ शकतात. तणनाशक अत्यल्प प्रमाणात फवारल्यास ते वाढ वृद्धिकारक म्हणूनही काम करत असल्याचे संदर्भ आहेत. किंबहुना तणनाशक म्हणून शोध लागण्यापूर्वी वाढ वृद्धिकारक म्हणूनच अनेक रसायनांचा शोध लागल्याचे संदर्भ येतात. काही रसायनांच्या सूक्ष्म प्रमाणातील फवारणीमुळे पिकांची वाढ जोमदार होते, उत्पादन वाढते, उत्पादनामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढते, काही अन्नघटकांचे जास्त पोषण होऊ शकते, याबाबत भरपूर संशोधन झालेले आहे. यासाठी फेनॉक्‍सी व ट्रायझीन गटांतील काही तणनाशकांचा वापर केला गेला. मात्र, पुढे याबाबत पाठपुरावा होऊन, त्याचे प्रत्यक्ष शेतात वापरण्यायोग्य शिफारशीमध्ये रूपांतर झाल्याचे दिसत नाही. जर यांच्या वापरामुळे प्रथिनांचे प्रमाण वाढत असल्यास भविष्यामध्ये वाढत्या लोकसंख्येला प्रथिने पुरवण्यासाठी हे संशोधन फायदेशीर होऊ शकेल, असा दावा लेखक डॉ. व्ही. एस. राव करतात. पुढील प्रकरणामध्ये तणनाशकांचे मिश्रण, फेरपालटाची फवारणी व तणनाशकांचे -इतर रसायनांचे आंतरसंबंध या विषयासंबंधी माहिती दिली आहे. दोन किंवा अधिक तणनाशके एकत्र करून मारण्यासंबंधीही उल्लेख आहेत. अशा मिश्रणामुळे तण नियंत्रणाची व्याप्ती वाढते, स्वतंत्र फवारणीपेक्षा परिणामकारकता वाढते, असे उल्लेख आहेत. मात्र, यामुळे दोन वेगवेगळ्या गुणधर्माची तणनाशकांच्या एकत्र वापरतेवेळी त्यांचा निवडकपणा संपुष्टात येणे, परिणामकारकता कमी होणे असे परिणाम उद्भवू शकतात. परदेशामध्ये अशी मिश्र तणनाशके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरीही काही शेतकरी फवारणीसाठी स्वतः अशी मिश्रणे करून वापरतात. वर्षभरात दोन किंवा तीन हंगामात एका पाठोपाठ एक पीक घेतले जाते, त्या वेळी घ्यावयाचे पीक तणांचा प्रकार, जमिनीवरील व पानांवरील परिणामांचा अभ्यास करून एका ठरावीक क्रमाने तणनाशकांच्या फवारणीचे वेळापत्रक तयार केले जाते. मी २००५ पासून शून्य मशागतीची शेती स्वतःच्या विचाराने, अभ्यासाने सुरू केली. त्या वेळी पेरणीपूर्वी अनिवडक गटातील तणनाशक मारून जमीन तणमुक्त करणे व पुढे पेरणीनंतर पीक व तण उगवणीपूर्वी जमिनीवर मारण्याचे तणनाशक फवारून तण नियंत्रण करणे अशी एक पद्धत तयार केली.  तणनाशकांचा विकास म्हणजे तारेवरील कसरत एखादे नवीन तणनाशक शोधणे हे अत्यंत खर्चिक, वेळ खाऊ काम आहे. एखादे रसायन शोधण्यासाठी सुमारे १ ते १२ हजार रसायने हाताळली जातात. राष्ट्रीय कृषी रसायन संघटनेचा अहवाल (अमेरिका, १९७०) नुसार, दरवर्षी ६० हजारेपेक्षा जास्त रसायनांचा अभ्यास केला जातो. एखाद्या रसायनाच्या शोधाला किमान ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागतो. या कामावर ३.४ पासून ५.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च होतो. रसायनांचा खप १९६७ साली ८.२ टक्के होता, तो ७० पर्यंत ९.७ टक्क्यापर्यंत वाढला. ६० ते ७० च्या दशकात पेट्रोलियम पदार्थांचे दरात प्रचंड वाढ झाल्याने उत्पादन खर्चातही समांतर वाढ झाली. यासोबतच रसायनांचे पीक, मानव व पर्यावरण यावरील हानिकारकतेचा अभ्यास करण्याचे बंधन कारखानदारांवर आले. रसायनाचा शोध घेणे, शासकीय नियमांच्या अधीन राहून बाजारपेठेत उतरवणे या सर्व खर्चात वाढ झाली. त्याची वसुली १२ ते २० वर्षाच्या स्वामित्व हक्‍काच्या काळात करावी लागते. अशा तारेवरील कसरतीमुळे तणनाशकांचे शोधकार्य मंदावत गेल्याचे संदर्भ आहे. लेखक प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर येथिल प्रगतशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com