कृषी सल्ला : सूर्यफूल, बाजरी, कापूस, सोयाबीन, मका, तूर

राहुरी विभागातील विविध खरीप पिकांसाठी लागवडीचा सल्ला
कृषी सल्ला (राहुरी विभाग)
कृषी सल्ला (राहुरी विभाग)

सूर्यफूल

  • पेरणी
  • वाणांची निवड :  अ) सुधारित जाती : फुले भास्कर, एसएस-५६, मॉर्डेन, ई सी-६८४१४, भानू  ब) संकरित वाण : केबीएसएच-१, एलएसएफएच-१७१, एलएसएफएच-३५, एलएसएफएच -४४, फुले रविराज, एमएसएफएच-१७
  • बीजप्रक्रिया : केवडा रोग टाळण्यासाठी मेटॅलॅक्झील (३५ डब्लू.एस.) ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. तसेच, सुरुवातीच्या टप्प्यातील किडींच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड (७० डब्ल्यू.एस.) ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास लावावे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
  • बाजरी

  • वाणांची निवड : 
  • अ) संकरित : फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती 
  •  ब) सुधारित : धनशक्ती 
  • बीजप्रक्रिया 
  • अ) २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया : बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी, त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्यांचा नाश करावा. तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने २ ते ३ वेळा धुवावे. त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
  • ब) रासायनिक बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाण्यास मेटॅलॅक्झील (३५ डब्लू.एस.) ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
  • क) जैविक बीजप्रक्रिया ः ॲझोस्पिरीलम २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळून पेरणी करावी, त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खताची बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते. तसेच, स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूची २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • कापूस

  • अ) बागायती कापूस : लागवडीनंतर ३० दिवसांनी बीटी कापसाला नत्र खताचा दुसरा हप्ता ५० किलो नत्र आणि बिगरबीटी कापसाला ४० किलो नत्र प्रतिहेक्टर द्यावे.
  • ब) कोरडवाहू कापूस : पेरणीनंतर १० दिवसांनी बी न उगवलेल्या ठिकाणी राखून ठेवलेल्या त्याच वाणाच्या बियाण्यांद्वारे नांग्या भराव्यात. १५ दिवसांनंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटून टाकावीत. विरळणी जमीन ओली असताना करावी.
  • सोयाबीन

  • बीजप्रक्रिया : बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकिलो बियाण्यांस ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे; तसेच नत्र स्थिरीकरणासाठी रायझोबियम २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यांस चोळावे.
  • खत मात्रा : चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी १२ ते १५ टन वापरावे. पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्यावेळी द्यावे.
  • आंतरपिके : मध्यम, भारी जमिनीत सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ओळीचे प्रमाण ३:१ असे ठेवावे.
  • मका

  • बीजप्रक्रिया : थायरम २ ते २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणांस पेरणीपूर्वी लावावे; तसेच पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर वापरावे.
  • खतमात्रा : पेरणीच्यावेळी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रतिहेक्टर द्यावे.
  • आंतरपिके : मक्याच्या दोन ओळींतील असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये (उडीद, मूग, चवळी), तेलबिया (भुईमूग, सोयाबीन) आणि भाजीपाला (मेथी, कोथिंबीर, पालक, कोबी इ.) ही आंतरपिके घ्यावीत.
  • तूर

  • बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस ट्रायकोडर्माची ५ ग्रॅमप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यानंतर रायझोबियम जिवाणूसंवर्धन २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यांस गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
  • खत मात्रा : सलग तुरीसाठी १२५ किलो डीएपी पेरणीच्यावेळी द्यावे.
  • आंतरपिके : कपाशीच्या ६ किंवा ८ ओळीनंतर एक ओळ तुरीची लागवड करावी. मूग, उडीद किंवा चवळी याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीची सुरुवात होण्यापूर्वी मूग किंवा उडिदाचे पीक काढणीस येते.
  • भुईमूग

  • बीजप्रक्रीया ः बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यांस थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणे चोळावे. त्यानंतर प्रतिकिलो बियाण्यास रायझोबीयम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे. बीजप्रक्रीया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.
  • खत व्यवस्थापन : पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद द्यावे. भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रेसोबत जिप्सम २०० किलो प्रती हेक्टर पेरणीवेळी जमिनीत मिसळून द्यावे.
  • ज्वारी

  • बीजप्रक्रिया : खरीप ज्वारीस प्रती किलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरीलम हे जिवाणूखत २५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
  • खत व्यवस्थापन : खरीप ज्वारीस पेरणीच्या वेळी ५०:५०:५० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रतिहेक्टरी द्यावे.
  • आंतरपिके : मूग, उडीद किंवा चवळी याप्रमाणे आंतरपीक घ्यावे.
  • मूग व उडीद

  • बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस ट्रायकोडर्मा भुकटी ५
  • ग्रॅम लावावी. त्यानंतर रायझोबियम जिवाणू संवर्धन २५ ग्रॅम या प्रमाणात गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी. मूग, उडीद या पिकांच्या बियाणासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धन वापरावे.
  • खतमात्रा : १०० किलो डीएपी प्रतिहेक्टरी द्यावे.
  • पपई

  • वाढीची अवस्था
  • खत व्यवस्थापन : पपई लागवडीनंतर २००:२००:२०० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येक झाडास समान चार हप्त्यांत पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या व सातव्या महिन्यात बांगडी पद्धतीने विभागून द्यावे.
  • ः ०२४२६- २४३२३९ (प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर) संपर्क ः सचिन फड, ०२५६४ -२६०५४४, (कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com