जंगलाच्या अभ्यासातून शेतीमध्ये सुधारणा शक्य

गाव परिसरातील जंगलांचे संवर्धन पर्यावरण आणि शेतीसाठी फायदेशीर ठरते.
गाव परिसरातील जंगलांचे संवर्धन पर्यावरण आणि शेतीसाठी फायदेशीर ठरते.

महाराष्ट्रात कोठेही फिरत असता, कोणत्याही दिसणाऱ्या डोंगराकडे पाहिल्यास फारशी झाडे दिसत नाहीत. अपवादात्मक काही ठिकाणी मुद्दाम नंतर लावलेली झाडे आढळली. डोंगर रांगा सोडून जसजसे नदीचे बाजूला यावे तसे सर्वत्र शेतजमिनी दिसतील. डोंगर व शेत जमिनी यांमधील पट्ट्यात वरकस पडीक माळ दिसतील. पूर्वी केव्हातरी या सर्व जमिनी घनदाट जंगलांनी आच्छादित होत्या. मानवाने आपल्या विविध गरजा भागविणेसाठी जंगले तोडली. पुढे ज्या ठिकाणी जमिनी सपाट होत्या, मातीची खोली चांगली होती, तेथे शेती सुरू झाली. ज्या ठिकाणी शेती करणे शक्‍य नव्हते, त्या जमिनी पडून राहिल्या. पावसाने वर्षानुवर्षे धुपत गेल्या. पावसाळ्यात चराई नसल्यास खुरटे गवत वाढते, अशी अवस्था आहे. डोंगरावरील जंगले तोडली. पुढे लाकडाचे जमिनी खालचे अवशेषही उकरून आपण वापरले. परंतु, तेथे परत झाडे लागली गेली पाहिजेत, असे कोणालाच वाटले नाही. शास्त्राचा इतका विकास झाला असला तरीही जंगलाचे पर्यावरणीय महत्त्व अजूनही लोकांपर्यंत पोचलेले नाही. स्वयंपाकासाठी एल.पी.जी. वापरणे हे ४० ते ५० वर्षांपूर्वी उच्चभ्रू मक्तेदारी होती. आता ही सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोचली आहे. सरकार आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांनी गॅसचा वापर करावा यासाठी काही योजना राबविते. यामुळे जळाऊ लाकडाची गरज खूप कमी झाली आहे. इमारती लाकडालाही अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने तेथेही लाकडाचा वापर खूप मर्यादित होत आहे. लाकडाला मागणी होती, तेव्हाही लोक झाडे तोडत होती. परत लावत नव्हती. आज तोडतही नाहीत आणि झाडे लावतही नाहीत. जंगलांची काळजी घ्या  पर्यावरण शास्त्राच्या विविध शाखांतर्गत अभ्यास केला जातो. प्रत्येक शाखेशी संबंधित एक परिस्थितीकी (इकॉलॉजी) असते. जंगल या परिसंस्थेचा (इको सिस्टिम) परिस्थितीकीय अभ्यास अमेरिकेत काही शास्त्रज्ञांनी केला. त्यावर चिंतन केल्यास आपल्या ज्ञानात तर भर पडेलच, त्याचबरोबर शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा करणेसाठीही त्याचा खूप मोठा उपयोग होण्यासारखा आहे. जंगल जर तोडले तर त्याचा परिसंस्थेतील घटकावर व परिस्थितीकीवर काय परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी एका नैसर्गिक पूर्ण वाढलेल्या जंगलापैकी अर्धाभागातील जंगल कापून टाकले तर अर्ध्याभागाला अजिबात धक्का लावला नाही. त्यापुढील तीन वर्षे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सविस्तर केला गेला. कापलेला जैवभार तेथेच खाली सोडून देण्यात आला. पहिले महत्त्वाचे निरीक्षण नोंदले गेले ते असे की, त्या तीन वर्षांत पावसाचे पाणी तोडलेल्या जंगलात आडवे उभे वाहून जाण्याचे प्रमाण अनुक्रमे ४०, २८ व २६ टक्क्यांनी वाढले. (न तोडलेल्या तुलनेत) याला कारण झाड तोडल्यामुळे पाण्याचे शोषण शरीर क्रियेसाठी व पर्णोत्सर्जनासाठी बंद झाले. वाहून गेलेल्या पाण्यातून वनस्पतीच्या गरजेची अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणावर धुपून गेली. असे दिसून येते, की सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम व पोटॅशियम अनुक्रमे तुटलेल्या जंगलातून २.५, ६, ८.५ व २० पट जास्त प्रमाणात धुपून गेले. त्यामानाने अमोनियम नत्र व सल्फेटवरफारसा परिणाम झालेला नाही. परंतु, नायट्रेट नत्र मात्र या काळात ५१ पट जास्त धुपून गेला. अशाप्रकारे नत्राचा झालेला ऱ्हास पुढील जंगल वाढीसाठी अडथळा होतो, तर त्याखालील बाजूचे पिण्याच्या पाण्याच्या साह्याचे प्रदूषण होते. पुढील तीन वर्षांच्या प्रयोगानंतर हे तोडलेले जंगल परत वाढू दिले. त्याचाही सविस्तर अभ्यास केला.     काही घटकांच्या उपलब्धतेत दुसऱ्या वर्षी सुरवात झाली. पुढील पाच वर्षांनंतर मूळ उपलब्धतेच्या तुलनेत ६६ टक्के सुधारणा झाली. हे जंगल इमारती लाकडासाठी वाढविलेले होते. आता या लाकडाचा दर्जा मूळ दर्जापर्यंत सुधारण्यासाठी ६० ते ८० वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी काढला. - संपर्क : प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com