Agriculture stories in Marathi, agrowon kavata (Dist- Vashim) village sucess story | Agrowon

जलसंधारणामुळे डोलू लागले कवठागावाचे शिवार

गोपाल हागे
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

माझ्याकडे चार एकर शेती आहे. मी शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी कूपनलिका खोदली. पूर्वी त्यातून टप्प्याने पाणी मिळत होते. आता बंधाऱ्यात पाणी साठा झाल्याचा खूपच फायदा होत आहे. कूपनलिकेला चांगले पाणी आले आहे. त्याचा पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपयोग करीत आहे.
- बबनराव हरिमकार, शेतकरी

वाशीम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कवठा (ता. रिसोड) गावामध्ये सुविदे फाउंडेशनच्या सहकार्याने नाला खोलीकरण, जलसंधारण, बांधबंदिस्ती ही कामे करण्यात आली. सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही बंधारा चांगल्या प्रकारे भरल्याने खरिपातील पावसाच्या अनियमिततेमध्येही पिके जगविणे शक्य झाले. सध्या शिवारामध्ये रब्बीतील पिके डोलत आहेत.

रिसोड तालुक्यातील कवठा (जि. वाशीम) हे गाव प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले. गावातील ७५ टक्क्यांपर्यंत शेती ही जिरायती. अनेक वेळा पिण्याच्या पाण्याची टंचाई असते, तिथे सिंचनासाठी पाणी मिळणे अवघडच. पावसाच्या अनियमिततेमुळे गावकऱ्यांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पैनगंगा नदी गावापासून अडीच किलोमीटर असली तरी तीही केवळ पावसाळ्यातच वाहते. परिणामी एकूण शेतीच हंगामी. त्याचा परिणाम गावातील एकूण शेती आणि बहुतांश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर जाणवतो. वास्तविक या गावाची अोळख पूर्वी भाजीपाला उत्पादनासाठी होती. ती मध्यंतरीच्या काळात पुसली गेली. यावर मात करण्यासाठी रिसोड येथील सुविदे फाउंडेशनने गावातील लोकांना एकत्र आणले. त्यांना एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचे महत्त्व समजावले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून जागृती केली. त्यानंतर मे २०१७ मध्ये गावशिवारात जलसंधारणाच्या कामांना सुरवात झाली.

गावातील एक मोठा व तीन छोट्या नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यात आले. शेकडो ब्रास गाळ उपसला गेला. या वर्षी पडलेल्या चांगल्या पावसामुळे बंधाऱ्यामध्ये अधिक पाणी साठले. शेतीतील बांधबंदिस्तीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे शेतातून वाहून जाणारे पाणी अडवले गेले. जलसंधारणाच्या कामांमुळे शेतशिवारात पाणी खळाळत अाहे. विहिरींच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी खरीप हंगामात पावसात मोठा खंड पडला तरी शेतकऱ्यांना किमान दोनशे एकरांपेक्षा अधिक क्षेत्रातील पिके वाचवण्यात यश आले. रब्बीतील गहू, हरभरा या पिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. 

बंधारा उपसला, पाणी साचले

२००३-०४ मध्ये शासनाने कवठा शिवारातील नाल्यावर सिमेंट बंधारा बांधला होता. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये त्यात गाळ साचत गेल्याने पाण्याचा साठा होत नव्हता. कवठा गावाची निवड झाल्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात नाला खोलीकरण व गाळ काढण्याचे काम केले. त्यात बंधाऱ्यातील हजारो ब्रास गाळ उपसला गेला. अनेक शेतकऱ्यांनी शेतात नेऊन टाकला. पूर्वी गाळामुळे नाल्यात केवळ ०.७० टीसीएम पाणीसाठा व्हायचा, त्यात वाढ होऊन साठा ३.६० टीसीएम पर्यंत पोचला. या वर्षी पाऊस कमी झाला असला बंधाऱ्यामुळे पाणी जिरले, साठवले गेले. परिसरातील सुमारे २५० हेक्टर क्षेत्रातील शेतीला याचा फायदा झाला. 
    
पाण्यामुळे साधला हंगाम

देवेंद्र देशमुख यांची ४० एकर शेती अाहे. त्यात डाळिंब व वांगी, मिरची, टोमॅटो अशी भाजीपाला पिके ते घेतात. त्याच प्रमाणे कोरडवाहू स्वरुपामध्ये सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मूग या सारखी पिके घेतात. जमीन हलकी असल्याने पाणी धरून ठेवत नाही. पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादनामध्ये मोठी घट होते. यावर्षी पेरणीनंतर महिनाभराचा खंड पडल्याने पिके धोक्यात आली होती. याकाळात बंधाऱ्यातील उपलब्ध पाण्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. सोयाबीनला एकरी दहा क्विंटलपर्यंत उतारा मिळाला. सध्या दोन एकरात वांगी असून, त्यातून उत्पादन सुरू झाले आहे. आतापर्यंत खर्च वजा जाता ८० हजारांपेक्षा अधिक मिळकत झाली. अाता हरभरा, गव्हाचीही त्यांनी लागवड केली. रब्बीच्या मध्यापर्यंत पाणी पुरण्याची शक्यता असल्याचे देशमुख यांनी सांगितले. असाच प्रत्यक्ष फायदा गावातील १२, तर अप्रत्यक्ष फायदा १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला.  
 
पाणीपातळीत वाढ

डिसेंबर-जानेवारीपासून या भागातील विहिरी कोरड्या पडू लागतात. यावर्षी जलसंधारणाच्या कामामुळे शेतातील विहिरीची पातळी वाढली आहे. अाजवर कधीही एवढे पाणी पाहिले नसल्याचे वयोवृद्ध शेतकरी भारावून सांगतात. असाच फायदा बबनराव हरीमकार, किशोर देशमुख, जानराव सरनाईक, बाळाभाऊ देशमुख अशा अनेकांना झाला. सध्या या शेतशिवारात रब्बी लागवडीची, पिकांना पाणी देण्याची एकच धामधूम बघायला मिळते. सध्या रब्बीतील गहू, हरभऱ्याची पिके शेतशिवारात बहरली अाहेत. 

गत दोन वर्षांपासून जलयुक्त शिवारची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत तीन वर्षात वाशीम जिल्ह्यातील ४६९ गावे निवडली. त्यात ७,६७६ कामे पूर्ण झाली. या कामांमुळे ५५ हजार १०४ टीएमसी पाणी साठा निर्माण झाला. जिल्ह्याने जलसंधारण कामामध्ये आघाडी घेतली आहे. वास्तविक या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला असला तरी जलसंधारणामुळे पिके जगवणे शक्य झाले. कवठा गावशिवारातील परिणाम शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणारा ठरत आहे.  
- डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशीम  

सुरवातीपासूनच केव्हिकेमार्फत पीक उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले जाते. त्याला सुविदे फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे त्याला बळ मिळाले आहे. सध्या पिकाच्या संवेदनशील अवस्थेत सिंचन देण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.  
- डॉ. अार. एल. काळे,  
वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशीम  

संपर्क : देवेंद्र देशमुख,  ९५२७११४९८४

संपर्क : डॉ. अार. एल. काळे, ७३५०२०५७४६ 


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...