शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचे व्यवस्थापन

जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवून ठेवायची असेल, तर सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खते शेतकरी वापरतात. या खतातील नेमके घटक आणि वापरण्याचे प्रमाण याविषयी माहिती घेऊ.
शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचे व्यवस्थापन
शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचे व्यवस्थापन

जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवून ठेवायची असेल, तर सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खते शेतकरी वापरतात. या खतातील नेमके घटक आणि वापरण्याचे प्रमाण याविषयी माहिती घेऊ. शेती आधुनिकतेकडे जाताना रासायनिक घटकांचा वापर वाढत चालला आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके यांचा वापर करत असताना जनावरांचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतीला सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी होत आहे. परिणामी जमिनीची सुपीकता व जमिनीतील सूक्ष्म जीवांची जिवाणूंची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. याचा विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीत सर्वसाधारणपणे १ ते  १.५ टक्के सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. त्याचा भरपाई न करता दीर्घकाळ सलग पिके घेत गेल्याने जमीन नापीक होण्याची शक्यता आहे.    भारतीय संस्कृतीप्रमाणे काळी आई म्हणजेच माती ही जिवंत असल्याचे मानले जाते. हे जिवंतपण शास्त्रीय दृष्ट्या जमिनीतील असंख्य  जिवाणूंशी संबंधित आहे. जिवाणूंची कार्यप्रवणता मातीतील किंवा दिलेल्या रासायनिक खतातून अन्नद्रव्याच्या पिकांसाठी उपलब्ध करण्यात महत्त्वाची आहे. जमिनीतील जिवाणूंची संख्या व कार्यप्रवणता ही जमिनीतील सेंद्रिय कर्बावर  अवलंबून असते. म्हणूनच जमिनीची सुपीकता व शाश्वतता टिकवण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. विविध सेंद्रिय खते व त्यांचा वापर शेणखत : प्राचीन काळापासून शेतकरी  पीक उत्पादनासाठी शेणखताचा वापर करीत आहे. चांगल्या कुजलेल्या एक टन शेणखतातून जवळपास १०० किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत मिसळला जातो. शेणखतामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढून सेंद्रिय कर्बाचे योग्य व्यवस्थापन होते.  शेणखतातून नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यासोबतच गंधक, मंगल, जास्त, तांबे, लोह आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. सर्वसाधारणपणे शेणखतामध्ये नत्राचे प्रमाण ०.५ ते ०.८%, स्फुरद ०.२ ते ०.४% आणि पालाश ०.५  ते १.२% असते.  कडधान्य पिकांना ४ ते ५ टन, कापसासारख्या पिकांना ८-१० टन चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या वखराच्या वेळेस किंवा पेरणी अगोदर जांभूळवाहीचे वेळेस मातीत मिसळावे. कंपोस्ट खत :  कंपोस्ट खत निर्मितीमध्ये शेतातील  उरलेल्या पिकांच्या  अवशेषांचा  पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वापर केला जातो. कंपोस्ट खत निर्मितीच्या नाडेप कंपोस्ट, इंदोर कंपोस्ट, बेंगलोर कंपोस्ट, पीडीकेव्ही कंपोस्ट, बायोडायनामिक कंपोस्ट अशा विविध पद्धती आहेत. या सर्व कंपोस्ट पद्धतींमध्ये पिकांचे अवशेष, शेण, पाणी, माती आणि कचरा कुजवणाऱ्या विविध बुरशींचा नियंत्रित वापर केला जातो. शेतातील पीक अवशेषांचा म्हणजेच जमिनीतून शोषून घेतलेल्या अन्नद्रव्यांचा पुनर्वापर यात केला जातो. खर्चसुद्धा कमी लागतो. कंपोस्ट खते शेणखतापेक्षा अधिक प्रभावी खते असतात. कंपोस्ट खतामध्ये नत्राचे प्रमाण ०.८ ते २.० %, स्फुरद ०.५ ते १.५% आणि पालाश ०.७  ते १.५% असते. कडधान्य पिकांना १.५ ते २ टन प्रती एकर, कापसासारख्या पिकांना ३ ते ४ टन प्रती एकर पेरणीआधी जांभूळवाहीच्या वेळी मातीत मिसळून दिल्यास चांगला परिणाम मिळतो.  फॉस्फोकंपोस्ट खत : साध्या कंपोस्ट खतातील स्फुरदाचे प्रमाण वाढविण्याकरिता कंपोस्टिंगवेळी रॉकफॉस्फेट खनिज मिसळले जाते. यामुळे कुजण्याची क्रिया लवकर होते. सोबतच स्फुरद व नत्र वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. कंपोस्ट खताचा दर्जा सुधारतो. गांडूळ खत : शेतातील किंवा गोठ्यातील पीक अवशेषांचा वापर करून गांडुळांच्या साह्याने उत्तम गांडूळ खत आपल्या शेतातच तयार करता येते. गांडूळ खत दिल्यामुळे अन्नद्रव्यांसोबतच गांडुळाची पिल्ले व अंडी आपल्या शेतात सोडली जातात. त्यांची वाढ शेतात झाल्याने जमिनीची सच्छिद्रता वाढते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही वाढते. कडधान्य पिकांना १ ते १.५ टन प्रती एकर, कापसासारख्या पिकांना २.५ ते ३ टन प्रती एकर पेरणीआधी जांभूळवाहीच्या वेळी मातीत ओलावा असताना गांडुळ खत द्यावे. पेरणीच्या वेळेस दिल्यास पिकांची वाढ चांगली होते. हिरवळीचे खत : सेंद्रिय खतांची गरज भागवण्याकरिता हिरवळीची खते शेतीसाठी वरदान ठरू शकतात. यात मुख्यत: झाडांचा पाला, फांद्या आणि वनस्पतीचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. बोरू, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार इ. द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरून जमिनीत गाडली जातात. याशिवाय गिरीपुष्प, सुबाभूळ इ. झाडांच्या कोवळ्या फांद्या, पाने जमिनीत गाडून कुजविली जातात. करंज, गाजर गवत/फुली सारख्या या हिरवळीच्या खतामुळे जमिनीस सेंद्रीय पदार्थ पुरविले जातात. जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. शिवाय पीकपोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. हिरवळीचे पीक मुख्य पीक म्हणून किंवा मिश्र किंवा मुख्य पिकात आंतरपीक म्हणून घेतले जाते. कापसासारख्या दीर्घकालीन पिकाच्या ओळीमध्ये हिरवळीचे पिके लावून ती जमिनीत  ३०-३५ दिवसांनी गाडतात.  हिरवळीच्या पिकांच्या मुळांवर जिवाणूंच्या गाठी असल्यामुळे हवेतील नत्र शोषून मुख्य पिकास नत्राची उपलब्धता होते. उसाची मळी खत : उसामध्ये शेतातील पाचट खोडव्यातील सरीमध्ये समप्रमाणात पसरल्यानंतर त्यावर एकरी एक बॅग युरिया, एक बॅग सुपर फॉस्फेट, १० टन उसाची मळी व शेवटी चार किलो पाचट कुजविणारे जिवाणू पसरावे. त्यानंतर खोडव्याच्या बगला फोडून माती पाचटावर पसरावी. काही पाचटे उघडी राहिल्यास पाणी देताना उघडे पडलेले पाचट दाबून टाकावे. त्यानंतर पिकास नेहमीच्या पद्धतीने पाणी व खते द्यावी. ३-४ महिन्यात संपूर्ण पाचट कुजून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळते. प्राण्यांच्या अवशेषांचे खत : १) माशाचे खत - समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून व माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून खत तयार केले जाते. त्याला माशाचे खत म्हणतात. ते मुख्यत्वे फळझाडांना वापरले जाते. या खतात नत्राचे प्रमाण ५ .९५ %, स्फुरदाचे प्रमाण ५ .२० % व पालाशाचे प्रमाण ९ .३६ % असते. २) हाडांचे खत - कत्तलखान्यामध्ये शिल्लक राहिलेली हाडे दळून बारीक करतात. किंवा हाडांवर पाण्याची वाफ दाबाने सोडली जाते. वाफेतील उष्णतेमुळे स्निग्ध पदार्थ वेगळे होऊन हाडे मऊ, ठिसूळ बनतात, दळून बारीक करतात. अशा खतांना हाडाचे खत म्हणतात. ही खते मुख्यत्वे फळझाडांना वापरली जातात. या खतात नत्राचे प्रमाण ३ .८८ %, स्फुरदाचे प्रमाण २१.५६ % असते. ३) कोंबडी खत : ग्रामीण भागामध्ये पोल्ट्री व्यावसायिकांकडे हे खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. या खतामध्ये नत्र (३.०४ %), स्फुरद (२.६४ % ) व पालाश (१.४१ %) या मुख्य घटकासोबत कॅल्शिअम हाही घटकही असतो. ते मुळातच सेंद्रिय असल्याने कंपोस्टिंगची गरज भासत नाही. त्याचा शेतात थेट वापर करता येतो. ऊस, बागमळा पिके, फळ व फुलपिके अशी पिके पोल्ट्री खताला चांगला प्रतिसाद देतात. मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. ताजे कोंबडीखत उभ्या पिकात जमिनीत मिसळू नये. उभ्या पिकात फक्त पूर्ण कुजलेले कोंबडीखत वापरता येते.. पीक अवशेष  पिकांच्या हंगामानंतर संपूर्ण देशात जवळपास ५०० दशलक्ष टन पीक अवशेष निर्माण होतो. त्यापैकी जवळपास ९० टक्के पीक अवशेष शेतकरी जाळून टाकतात. परिणामी वातावरणात कार्बनडाय ऑक्साइड मिसळला जाऊन प्रदूषण वाढते. सोबतच जमिनीचा वरचा थर टणक होतो. जमिनीतील सूक्ष्मजिवांची संख्या कमी होते. पिकांची वाढ खुंटते. पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी हंगामानंतर  क्रशर किंवा चिपरसारख्या यंत्राने बारीक तुकडे किंवा भुगा करून जमिनीत मिसळावा. जमिनीला हलके पाणी देऊन जमिनीवर ट्रायकोडर्मा किंवा डीकंपोजरची फवारा करावी. यामुळे पीक अवशेष जमिनीत लवकर कुजतात. जमिनीला मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात.   डॉ. विनोद खडसे, ९८५००८५९६६ (विस्तार कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com