सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली संत्रागळ

अंजनगावसुर्जी तालुक्यातील जवळा खुर्द येथील रमेश मातकर यांनी सेंद्रिय पद्धतीने संत्रा बागेचे व्यवस्थापन करत कीड, रोग आणि एकूणच संत्रा फळगळ रोखण्यात यश मिळवले आहे.
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली संत्रागळ
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली संत्रागळ

सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख मिळवलेल्या अमरावती जिल्ह्यात कीड, रोग आणि फळगळ यामुळे अनेक ठिकाणी संत्रा बागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा वेळी अंजनगावसुर्जी तालुक्यातील जवळा खुर्द येथील रमेश मातकर यांनी सेंद्रिय पद्धतीने संत्रा बागेचे व्यवस्थापन करत कीड, रोग आणि एकूणच संत्रा फळगळ रोखण्यात यश मिळवले आहे. जवळा खुर्द शिवारात रमेश मातकर यांचे वडील विठ्ठलराव यांची दहा एकर शेती. त्याच शिवारालगत रमेश मातकर यांनी १९९१-९२ मध्ये ४५ एकर शेती खरेदी केली. रमेश हे पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता पदावर ते होते. नोकरीच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने या शेतीचा विकास करत सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू केली. २०१२ मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ शेतीमध्ये लक्ष घातले. बेडवरील संत्रा लागवड ठरली फायदेशीर सन २००२ व २००४ या दरम्यान एक फूट उंचीच्या गादीवाफ्यावर २० बाय २० फूट अंतरावर संत्रा लागवड केली आहे. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रातून दर्जेदार रोपे खरेदी करण्यात आली. दोन झाडांमध्ये सहा फुटाचा चर असल्याने पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होतो. बागेमध्ये पाणी फार काळ थांबत नाही. झाडाच्या खोडापासून पाणी दूर राहते. त्यामुळे बागेतील झाडांवर फायटोप्थोरा, डिंक्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. हेच रोग फळगळीसाठीही बऱ्यापैकी कारणीभूत असल्याने फळगळ रोखली जाते. सिंचनासाठी आगळी पद्धत पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास बाग कीडरोगमुक्त राहते. कमी पाण्यात दर्जेदार संत्रा उत्पादन घेणे शक्य होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. रिंग पद्धतीचा अवलंब केला असून, ठिबकनळ्या झाडाभोवती गोलाकार लावल्या आहेत. तसेच दोन झाडाच्या मध्यभागीही एक इनलाईन ठिबक टाकली आहे. यामुळे झाडांच्या सभोवार दूरपर्यंत वाढलेल्या मुळांना पाणी मिळते. जमिनींना भेगा पडत नाहीत. झाडाची मुळे दूरपर्यंत कार्यक्षम राहत असल्याने वादळातही झाडे कोलमडत नाहीत. संत्र्याला बांबू बांधावे लागत नाहीत. तसेच रोगांचा प्रादुर्भावही कमी राहतो. सेंद्रिय शेतीचे प्रयोग १) सेंद्रिय शेतीचा वारसा जपणाऱ्या मातकर यांच्याकडे गीर जातीची २१ जनावरे. २) संत्र्याच्या प्रत्येक झाडाला दरवर्षी तीन ते चार टोपली शेणखताची मात्रा ४) गोमुत्रासह जैविक घटकांचा रोग कीड नियंत्रणासाठी वापर. सेंद्रिय निविष्ठा निर्मिती जिवामृत, त्रिभूती, गोमूत्र, दशपर्णी अर्क अशा विविध सेंद्रिय घटकांच्या निर्मितीसाठी ६२५ लिटर क्षमतेच्या तब्बल १५ टाक्या केल्या आहेत. खास १४ हजार लिटरची टाकी बांधली असून, त्यात गोठा धुतल्यानंतर गोमूत्र, शेण यांचे पाणी गाळून जमा होते. या दोन्हींचे मिश्रण करून किंवा वेगवेगळे देण्याचीही सोय केली आहे. या टाक्यांना थेट व्हॉल्व बसवला असून, मडपंप किंवा ठिबकद्वारे शेतीला दिले जाते. यामुळे वेळ व श्रमाची बचत होते. सेंद्रिय संत्र्याचे विपणन सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या संत्रा उत्पादनाला सर्वदूर मागणी राहते. बागेत १६०० झाडे असून, या वर्षी प्रति झाड सरासरी १००० फळे याप्रमाणे १५० ते १८० टन फळ उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १७५ टन संत्रा उत्पादन मिळाले व त्याला ३७ हजार रुपये प्रति टन असा दर मिळाला होता. संत्रा बागेच्या व्यवस्थापनावर एकरी सरासरी ५० हजार रुपयांचा खर्च होतो. जलपुर्नभरणाकरिता खोदले चर त्यांनी जेसीबीच्या मदतीने शेतीच्या चौफेर चर खोदले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचून मुरत असल्याने भूजल पुनर्भरण होते. भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे रमेश मातकर सांगतात. सिंचनासाठी तीन बोअरवेल असून संपूर्ण वीस एकर क्षेत्र ठिबकखाली आहे. प्रयोगशीलतेचा गौरव नोकरीमध्येही चांगल्या कामासाठी केंद्र व राज्यशासनामार्फत उत्कृष्ट अभियंतासह राजीव गांधी स्वच्छता अभियानासह अन्य सात कार्यालयीन पुरस्कारांनी त्यांनी सन्मानित केले होते. शेतीतील त्यांच्या प्रयोगशीलतेचा राष्ट्रीय कृषी उत्पादक परिषद, नवी दिल्ली, रयत पुरस्कार, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र यांनी विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे. संत्रा बागेचे आदर्श व्यवस्थापन १) अंबिया बहाराच्या फळाची तोडणी नोव्हेंबरअखेर करण्यावर भर २) कालावधी वाढल्यास वाढलेल्या फांद्याची संख्या म्हणजे सलीचे प्रमाण वाढते. त्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. ३) जमीन काळ्या पोताची असून, नोव्हेंबरपासून पाण्याचा ५० ते ६० दिवसांचा ताण दिला जातो. ४) ताणाच्या कालावधीत झाडावरील सल काढणे, रोगग्रस्त झाडांचा उपचार यावर भर. ५) निंबोळी अर्क व गोमूत्रांच्या द्रावणाचा रोग कीड नियंत्रणासाठी वापर. ६) शेणखत, निंबोळी पावडर, कोंबडी खत अशा सेंद्रिय घटकांद्वारे खत व्यवस्थापन ७) शेतातील तणे काढल्यानंतर तिथेच आच्छादन केले जाते. त्यावर एकरी एक हजार लिटर जीवामृताची फवारणी करतात. ८) वेस्ट डिकंपोजरचा वापर ड्रेचिंग आणि फवारणीसाठी केला जातो. डिंक्या व मुळकूज रोगाचे केले नियंत्रण १०० लिटर पाण्यात वीस किलो गावरान गाईचे शेण, दहा किलो कडू लिंबाचा पाला, पाच लिटर गोमूत्र, गेरू पाच किलो या घटकांचा तीन ते चार दिवस कुजू दिले जाते. हे मिश्रण घोटून ६० ते ९० सें.मी. उंचीपर्यंत खोडाला लावले जाते. तसेच जखम व खोडकीडी असल्यास गोमुत्राने निर्जंतुकीकरण करतात. याप्रमाणे वर्षातून दोन ते तीन वेळा वरील द्रावणाचा वापर करत असल्याने डिंक्या व मुळकुज सारख्या रोगावर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे रमेश मातकर सांगतात. प्रभावी शेती व्यवस्थापनावर भर

  1.  संत्रा अंबिया बहरासाठी पहिले पाणी डिसेंबर अखेरीस तुषार पद्धतीने देतात. यामुळे बागेतील सेंद्रिय घटक कुजतात.
  2. अंबिया बहराची फळे, झाड व पानांची संख्या संतुलीत राखली जाता.
  3. मार्च अखेर झाडांना आवश्यक असणाऱ्या मुलद्रव्यांचा जमिनीतून पोषक घटक व घातक बुरशीचे नियंत्रण होण्यासाठी प्रत्येक झाडाला जिवामृत दहा लिटर, ट्रायकोडर्मा २५ मिली, पीएसबी ५० मिली, अ‍ॅझोटोबॅक्टर ५० मिली या प्रमाणे ठिबकद्वारे देण्याचे नियोजन असते.
  4. सूक्ष्म अन्नद्रव्ये, वेस्ट डि - कंपोजर, जीवामृत हे स्वतः तयार करतात. त्याची प्रयोगशाळेत चाचणी करून घेतली असून, परिपूर्ण मुख्य, दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असल्याचा अहवाल नुकताच मिळाला आहे.

शेतीसोबत पूरक व्यवसाय

  • गीर गाई लहान मोठ्या २१ आहेत.
  • शेतीसोबत १५० कडकनाथ कोंबड्याचे पालन करतात.
  • त्यांच्याकडे २५ उस्मानाबादी शेळ्या आहेत.  त्यातून मांसासाठी उत्तम बोकड मिळतात. त्यांची विक्री शेतावरूनच केली जाते.
  • संपूर्णा या जातीच्या चाऱ्याची लागवड एक एकर, उर्वरित मका व अन्य चारा पिकांची २ एकर क्षेत्रावर लागवड असते.
  • संपर्क ः रमेश मातकर, ९४२२१५६६१३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com