agriculture stories in marathi agrowon Self-sufficient suburban settlement for one family | Agrowon

एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहत

पैगंबर म. तांबोळी
गुरुवार, 25 जून 2020

अर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व वर्षाला दोन हजार घनमीटर पाणी इतक्या बेगमीच्या बळावर संपूर्ण कुटुंबाचे पोषण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अंकोली (ता. मोहोळ) येथील विज्ञानग्राम मध्ये फोटोट्रॉन बागेची निर्मिती केली आहे. 

अर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व वर्षाला दोन हजार घनमीटर पाणी इतक्या बेगमीच्या बळावर संपूर्ण कुटुंबाचे पोषण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अंकोली (ता. मोहोळ) येथील विज्ञानग्राम मध्ये फोटोट्रॉन बागेची निर्मिती केली आहे. विज्ञानग्राम च्या सुमंगला व अरुण देशपांडे या दांपत्यांच्या संशोधनातून स्वयंपूर्ण शिवार वसाहत उभारली आले आहे.

हवामान बदल, गारपीट, ओला व सुका दुष्काळ, कीटक-टोळधाड यांचा हल्ला अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा नैसर्गिक आपत्तीतून वाचण्यासाठी बहुतांश वेळा संरक्षित शेतीचा पर्याय सुचवला जातो. मात्र, अनेक वेळा पिकासोबत घरांचेही होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्याला सावरणे कठीण होते. या दोन्ही समस्यांवर मात करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अंकोली (ता. मोहोळ) येथील विज्ञानग्राममध्ये सुमंगला देशपांडे व अरुण देशपांडे या दांपत्यांनी प्रयोग सुरू केले. तीन वर्षाच्या अथक संशोधनातून त्यांनी केवळ शेतीपुरताच संरक्षित शेतीचा विचार न करता जैवविविधतेसह शिवार वसाहतीचे प्रारूप तयार केले आहे. महात्मा गांधींच्या स्वयंपूर्ण खेड्याच्या कल्पनेवर आधारित विज्ञान ग्राम येथे अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये चार जणांच्या कुटुंबाच्या स्वयंपूर्ण जीवनासाठी योग्य ठरेल अशा प्रकारचे प्रारूप उभारले आहे. त्याला फोटोट्रॉन बाग असे नाव दिले आहे. या बागेचे उद्घाटन एप्रिल २०१८ मध्ये डॉ. प्रकाश आमटे व मंदाताई आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. शेतातील घर ही संकल्पना आपल्याकडे रुजलेली आहे. त्यातून घरातील शेतीपर्यंत ही संकल्पना पुढे ओढली आहे. त्यातून अत्यंत कमी क्षेत्रामध्येही शेतकऱ्यांना नियंत्रित शेती करता येईल.

फोटोट्रॉन बागेची रचना ः

 • अर्धा एकर क्षेत्रात १० गुंठ्यामध्ये बंदिस्त फोटोट्रॉन बाग व १० गुंठ्याची सभोवताली अकिरा मियावाकीची देवराई अशी या शेतीची रचना आहे.
 • लोखंडी चौरस पाईप व तव्याचा वापर करत दहा हजार चौ. फूट क्षेत्रामध्ये जिओडेसिक डोम (घुमटाकार घर) उभारले आहे. या संपूर्ण डोमवर पांढऱ्या शेडनेटचे आवरण आहे. यामुळे सूर्यकिरणातील अवरक्त व अतिनील किरणांची तीव्रता (इन्फ्रा रेड) कमी होऊन आवश्यक तेवढाच सूर्यप्रकाश पिकांना मिळतो. पांढऱ्या शेडनेटमुळे योग्य प्रकारे वायुविजनही होते.
 • बागेच्या सभोवती बाजूने जमिनीलगत पारदर्शी प्लॅस्टिकचे आवरण केले आहे. यामुळे हरितगृहाप्रमाणे परिणाम मिळवणे शक्य होते. रात्री वनस्पतींनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू जमिनीलगत साचून राहतो. सकाळी पिकांद्वारे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वापरला जातो. परिणामी उत्पादनात वाढ होते.
 • या प्लॅस्टिकमुळे वेगाने वाहणारे वाराही अडवले जाते. परिणामी आतील वनस्पतींना, त्यांच्या पानांना इजा होत नाही.
 • बागेच्या मध्यभागी पंचकोनी आकाराचे पाच मजली घर आहे. तळमजल्याचे क्षेत्रफळ तीनशे चौ.फूट, एकूण क्षेत्रफळ १५०० चौ.फूट होते. तळमजल्यावर स्वयंपाकगृहाची योजना केली आहे. त्यावरील दोन मजले हे शयनगृह, चौथा मजला अभ्यास खोली व पाचवा मजल्यावर भेट देणाऱ्या पाहुण्याची खोली असे नियोजन केले आहे. हे घर भूकंपरोधक व अन्य सर्व नैसर्गिक आपत्तीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे.
 • मध्यभागी १०० फुटांचा कॉरिडॉर केला आहे.
 • शिवाय एक खिलार गाय किंवा दोन शेळ्यांसाठी स्वतंत्र गोठा आहे.

पिकासाठी पाण्याची सोय ः
बागेच्या मध्यभागी असलेल्या पाच मजली घरावर रेनगन बसवली आहे. अंकोली परिसरातील पावसाची सरासरी ५५ सेंमी असून रेनगनद्वारे १०० सेंमी पर्यंत पाणी दिले जाते. वर्षभरात एकूण १५० सेंमी पर्यंत पाणी बागेला मिळते. रेनगनने पाणी दिल्याने उन्हाळ्यात बागेचे व आतील घराचे तापमान कमी राहते. ए.सी. किंवा कुलरची आवश्यकता राहत नाही. फोटोट्रॉन बागेत वारे वाहत नसल्याने व शेडनेटमुळे बाष्पीभवनाचा वेग खूपच कमी राहतो. पाण्याची मोठी बचत होते. शिवाय स्वयंपाकगृह व बाथरूमचेही पाणी बागेला देण्याची सोय आहे.

कुटुंबाच्या किमान गरजांची पूर्तता करणारी पिके ः

 • वर्षभर एका कुटुंबाला लागणारी तृणधान्ये, कडधान्ये व गळिताची धान्ये यांचे उत्पादन बागेत करण्याचे नियोजन केले जाते. त्यातून कुटुंबाची गरज भागते.
 • वर्षभर येणारी हंगामी फळझाडे, भाजीपाला यांची लागवड केली आहे. घरगुती उत्पादनामुळे रसायन अवशेषमुक्त ताजी फळे, भाजीपाला उपलब्ध होतो. घरातील वातावरण थंड राहत असल्याने रेफ्रिजरेटरची गरज लागत नाही. विजेची मोठी बचत होते.
 • सर्व वनस्पतींना आधार दिल्याने मूळ व खोड यात जाणारी ऊर्जा वाचते. फलधारणा व वाढ अधिक होते.
 • पिकातील अवशेष व पालापाचोळा तिथेच पडू दिला जातो. त्याचेच कंपोस्ट खत मिळत राहिल्याने गांडुळांची संख्या नैसर्गिकरित्या खूप वाढते. गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत होते. गांडूळ खतही मिळत राहते. पालापाचोळ्याच्या आच्छादनामुळे जिवाणू वाढतात. हे जिवाणू जमिनीतील खनिजे, अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देतात. गांडूळे, जिवाणू जितके अधिक तितकी पिके सुदृढ होत असल्याचा अनुभव आहे.
 • कॉरिडॉरच्या वरच्या भागात वेलवर्गीय फळभाज्या पिके लावली आहेत. कोणत्याही रसायनांचा वापर न करणारी ही विषमुक्त शेती कुटुंबांच्या किमान गरजांची नक्कीच पूर्तता करू शकते.

पूरक प्रथिनांसोबत परागीकरणही ः
कुटुंबाच्या प्रथिनांची गरज पूर्ण व्हावी, या दृष्टीने एक गाय पाळण्याची सोय केली आहे. सध्या या प्रारूपामध्ये एक खिलार गाय पाळली आहे. कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार गायीऐवजी दोन शेळ्याही पाळता येतील. सोबत पाच गावरान कोंबड्या पाळल्या आहेत. त्यांच्या अंड्यांद्वारेही प्रथिनांची गरज भागू शकते. या कोंबड्या बागेतील किडे, अळ्या खाऊन बाग स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. मधमाश्यांच्या चार पेट्या परागीभवनासाठी ठेवल्या आहेत. त्यातून किमान दोन किलोग्रॅम मधही मिळतो.

फोटोट्रॉन बाग व हरितगृहातील फरक ः
हरितगृह (पॉलीहाऊस) ही एक नियंत्रित पद्धतीची शेती असून, त्यात बहुतांश व्यावसायिक एक पीक पद्धतीचा अवलंब केला जातो. पीक पद्धतीमध्ये विविधता नसते. फोटोट्रॉन बागेमध्ये शेती आणि परिसरातील जैवविविधतेचा विचार केलेला आहे. शिवाय त्यात राहण्यासाठी घर आणि शिवार बागही आहे. ही बाग व घर सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती उदा. हवामान बदल, भूकंप, वादळ, गारपीट, तीव्र ऊन, तसेच कीटक व टोळधाड यापासून सुरक्षित राहू शकतो.

अकिरा मियावाकीची देवराई ः
फोटोट्रॉन बागेभोवती जपानी संशोधक अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या पद्धतीने वेगाने वाढणारी देवराई तयार केली आहे. त्यात औषधी वनस्पती, फळझाडे, जंगली वनस्पती, बांबू, गवत व काही तृणधान्ये यांची लागवड केली आहे. पक्ष्यांसाठी ही देवराई आकर्षणाचे केंद्र बनली आहे. त्याच प्रमाणे कुटुंबाच्या काही गरजाही त्यातून भागू शकतात. फोटोट्रॉन बागेच्या बाहेरून देवराईतून विविध वेली चढविण्यात आल्या आहेत.

शाळकरी मुलांचाही संशोधनात सहभाग ः
जि.प.शाळा, शेजबाभूळगाव व इनोव्हेटिव्ह स्कूल, अंकोली या शाळातील मुलांनीही फोटोट्रॉन बागेच्या संशोधन विकासामध्ये सहभाग घेतला. सध्या असणाऱ्या बागेतील त्रुटी शोधण्याचे आव्हान त्यांच्यापुढे ठेवण्यात आले होते. या शालेय विद्यार्थ्यांनीही अरुण देशपांडे व सुमंगला देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रारूप अधिक अचूक करण्यासाठी काम केले. शेजबाभूळगाव शाळेतील शिक्षक पैगंबर म. तांबोळी यांनीही संशोधन विकासामध्ये पुढाकार घेतला.
 

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्णपणे स्वतंत्र, नैसर्गिक आणि तरिही पंचतारांकित जीवन सगळ्यांना निश्चितच आवडेल. महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेड्याला अशा स्वयंपूर्ण शिवार वसाहती नक्कीच अधिक स्वावलंबी करतील. शाळकरी वयातच मुलांवर समस्या शोधणे, व त्यातून मार्ग काढण्याचे संस्कार झाल्यास संशोधन वृत्ती रुजत जाते. मुलांचे कुतूहल आणि जिज्ञासा वाढत जाते.
- अरुण देशपांडे

 

उभारणी खर्च ः

 • दहा हजार चौ.फूट फोटोट्रॉन बाग उभारणीसाठी सुमारे पंधरा लाख रुपये इतका खर्च येतो.
 • सिमेंट काँक्रीटच्या घर आणि शेडनेट उभारणी या दोहोंचा एकत्रित खर्च विचारात घेतल्यास हा अत्यल्प आहे. यात घरासाठी घ्यावा लागणारा पायाचा खर्च कमी होतो.
 • हे तंत्रज्ञान स्वत: शिका, वापरा व हस्तांतरित करा ( Do it yourself ) प्रकारचे आहे.
 • सुरुवातीस ही बाग विकसित होईपर्यंत पहिली दोन वर्षे जास्त परिश्रम लागतात. त्यानंतर मात्र दिवसाकाठी फक्त दोन ते तीन तास कामे केल्यास बागेतून कुटुंबाच्या गरजेचे इतके उत्पादन नक्कीच मिळू शकते.
 • अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
 • महिलांसाठी अशा प्रकारची नियंत्रित व संरक्षित शेती घराजवळच उपलब्ध झाल्यास त्यांच्या स्वयंपूर्णता व सबलतेला चालना मिळेल.

अरुण देशपांडे, ९८२२१७४०३८
(विज्ञानग्राम, अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर)

पैगंबर म. तांबोळी, ९५१८९८८२२१
( जि. प. शाळा, शेजबाभूळगाव )

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
पिकातील सूर्यप्रकाशाची प्रत मोजणारी...आपल्याकडेही हरितगृह, शेडनेटगृहातील लागवड वेगाने...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
संरक्षित व नियंत्रित शेतीचे तंत्रज्ञानकृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण...
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...
वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...
न रडवणारा गोड कांदा!कांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर...
संपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...
निर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, ...जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला...
तापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...
सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...