विकेंद्रित विकासाची चौथी औद्योगिक क्रांती

भारतात चौथ्या औद्योगिक क्रांतीचा प्रसार होण्यासाठी ज्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्याला या सेवा पुरवण्यासाठी जलदगतीने प्रशिक्षित करता येईल. यामुळे ग्रामीण भागात मोठे सेवा उद्योग विकसित होतील.
संपादकीय
संपादकीय

त्रिमिती उत्पादन प्रक्रियेच्या वापराने मालांच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या ऊर्जेचा वापरही कमी होईल; कारण तो माल जिथे त्याची गरज आहे तिथेच निर्माण केला जाऊन उपलब्ध होईल. यामुळे उत्पादनाचे विकेंद्रीकरण व्हायलाही मदत होईल. सध्याच्या परिस्थितीत वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे, उत्पादन किती होते? यावर अवलंबून असते. त्रिमिती वस्तू निर्माणात कोणत्याही ठिकाणी वस्तूची गुणवत्ता आणि किंमत योग्य राखली जाईल. खरे तर बहुतेकदा किंमतीत मोठ्या प्रमाणावर घटच होते. कारण मालाचा अपव्यय होत नाही. त्रिमिती उत्पादनात यांत्रिक क्रियेएवजी उभारणी करण्यात येते. शिवाय वितरकांचे जाळे विकसित करण्याची गरज नसते. म्हणून ग्रामीण भागात उच्च तंत्रज्ञानावर आधारित लघुउद्योगांचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार पहायला मिळेल. त्रिमिती वस्तुनिर्माणाचा आराखडा नैसर्गिक प्रणालीला अगदी जवळचा आहे. कारण जनुकीय संहितेत साचा एकदा का चपखल बसला की स्थानिक पातळीवर उत्पादन होते. त्रिमिती उत्पादनात हा साचा इंटरनेटच्या दळणवळण यंत्रणेतून कोठेही प्रसारित करता येतो.

ग्रामीण दळणवळणासाठी विद्युत वाहने आधारस्तंभ ठरू शकतील आणि त्यांना विद्युतभारित करण्यासाठी स्थानिकरित्या तयार केलेल्या नूतनीकरणक्षम विजेचा वापर करता येईल. अशा वाहनांच्या उत्पादनासाठी ग्रामीण भागात त्रिमिती उत्पादन यंत्रणेची मदत होऊ शकेल. भारताच्या ग्रामीण भागात चौथ्या औद्योगिक क्रांतीचे काही पैलू आधीपासूनच दिसू लागले आहेत. ढगातील शाळा (स्कूल इन द क्लाउड) या एका प्रयोगातून असे दिसून आले आहे, की अशिक्षित मुलांना इंटरनेट वापरण्याची संधी दिली तर कोणत्याही वस्तू कशा तयार करायच्या याची माहिती यूट्यूबवरून मिळवायला ती जलदगतीने शिकतात. पश्चिम बंगालमधल्या एका ग्रामीण माध्यमिक शाळेतील प्रयोगात स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या साध्या सामानातून एका विद्यार्थ्याने एक बऱ्यापैकी सुविकसित उपकरण तयार करून चालवले. यूट्यूबवरील ध्वनिचित्रफितींमुळे या मुलांची कल्पनाशक्ती उत्तेजित झाली आणि औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांना उपयुक्त उत्पादने बनवता आली. जेव्हा गांधीजी म्हणाले की प्रत्येक ग्रामस्थाला जर पुरेशी आदाने पुरवून आव्हान दिले तर तो उपयुक्त उत्पादने बनवू शकेल, तेव्हा त्यांनी याचेच भाकित केले होते. ग्रामस्थांनी जास्त चांगला चरखा तयार करावा ही त्यांची कल्पना याचाच भाग होती. जसजसा वस्तूंच्या महाजालाचा (इंटरनेट ऑफ थिंग्ज - आयओटी)चा विकास होत आहे तसतशा प्रगत अर्थव्यवस्था चौथ्या औद्योगिक क्रांतीचा भाग म्हणून अतिवेगाने ५ जी महाजालाचे अनावरण करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहेत. 

५ जीचा एक आकर्षक पैलू म्हणजे अतिशय कमी ऊर्जा लागणाऱ्या उपकरणांमध्येही ते काम करू शकेल. अशा तऱ्हेने स्मार्टफोनचा विद्युतभार जास्त काळ टिकेल. ५ जीच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी करणारे तंत्रज्ञानही विकसित होत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाला ३ जी आणि ४ जीच्या जाळ्यातून संदेश रेटण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. मोठ्या, बेडौल, ऊर्जेचा अतिवापर करणाऱ्या शृंगिकांची (अंटेना) जागा संदेशवहनासाठी कितीतरी कमी ऊर्जा वापरणाऱ्या, लहान असंख्य पण जास्त कार्यक्षम शृंगिका घेत आहेत. जर भारताने ४ जी जाळ्याला बगल देऊन जोमाने ५ जीच्या मार्गाचा पाठपुरावा केला तर चौथ्या औद्योगिक क्रांतीत उडी घेण्याची संधी भारताला मिळण्याचा जास्त संभव आहे. पाश्चिमात्य देशांतील बहुसंख्य ग्राहकांना मिळणारी वायफायची सुविधा अतिशय जलद असते. याचे कारण घरांना जोडणाऱ्या प्रकाशीय तंतूचे (ऑप्टिकल फायबर) व्यापक जाळे. परंतु, भारतासारख्या विकसनशील देशात जिथे प्रकाशीय तंतूची लागणारी घनता अजून उपलब्ध नाही तिथे दूरच्या भागात अतिजलद सेवा देण्यासाठी ५ जीचा वापर करता येईल. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या काही समर्थकांनी अशी भीती व्यक्त केली आहे, की तिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरेल किंवा फक्त ज्ञानाधारित रोजगार मिळेल. परंतु, ही भीती निराधार आहे असे मला वाटते, कारण ही यंत्रे आणि आधारभूत संरचना चालवण्यासाठी आणि सुस्थितीत राखण्यासाठी माणसांची मोठी फौज आवश्यक आहे जी ग्रामीण भागातच उपलब्ध होऊ शकेल. 

मानवी शरीर हे एक  गुंतागुंतीचे यंत्र असूनही प्रजनन ही एक साधी आणि सहज क्रिया आहे आणि त्यासाठी प्रजनन संस्थेची कार्यपद्धती सर्वांना माहीत असणे काही आवश्यक नाही. याचप्रमाणे श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित आपण सर्वजण आपल्या अनेक गरजांसाठी स्मार्टफोनचा लीलया उपयोग करतो. त्या फोनच्या यंत्रणेबद्दल आपल्याला काही देणेघेणे नसते. असते ते फक्त आपल्या कामासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, याच्याशी संबधित माहितीशी. शिवाय स्मार्टफोन वापरायला काही विशेष शिक्षणाची गरज नसते. या दोन्ही उदाहरणांवरून शिकण्यासारखा मोठा धडा असा की भारतात चौथ्या औद्योगिक क्रांतीचा प्रसार होण्यासाठी ज्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्याला या सेवा पुरवण्यासाठी जलदगतीने प्रशिक्षित करता येईल. यामुळे ग्रामीण भागात मोठे सेवा उद्योग विकसित होईल आणि त्याच्या अनुषंगाने रोजगार उपलब्ध होईल.  आरोग्य क्षेत्रालाही चौथ्या औद्योगिक क्रांतीचा फायदा होऊ शकेल. योग्य त्या अटॅचमेंट्स आणि ॲप्स सहित स्मार्टफोन विकसित करण्यात येत आहेत. त्यांच्या वापराने रोग्याची अत्यावश्यक वैद्यकीय माहिती इस्पितळात पाठवता येईल. ती पाहून डॉक्टरांना औषधे आणि अनुसरायच्या मार्गाविषयी सल्ला देता येईल. सध्या अस्तिवात असलेल्या टेलिमेडिसिनचाच हा एक भाग आहे. जगभरातील ग्रामीण भागातल्या रुग्णांच्या मदतीसाठी त्याचा वेगाने विकास होत आहे. रुग्णाला इस्पितळात जाण्याची गरज फक्त आपत्कालीन परिस्थितीत आणि शस्त्रक्रिया करावयाची असल्यासच भासेल. टेलिमेडिसिनच्या क्षेत्रात प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. हे कर्मचारी रुग्णांना भेट देऊन स्मार्टफोनच्या सहाय्याने त्यांची वैद्यकीय माहिती गोळा करून इस्पितळात पाठवू शकतील आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना औषधे  देऊ शकतील.

चौथी औद्योगिक क्रांती गतिमान होण्यासाठी भारत सरकारला उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल तसेच अधिक प्रबुद्ध धोरणे राबवावी लागतील. याशिवाय ज्यांना काटेकोर शेती, त्रिमिती मुद्रण आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक अशा अनेक तंत्रज्ञानांचे चांगले ज्ञान आहे असे अभियंते आणि शास्त्रज्ञ यांचीही गरज आहे. उत्पादनाची साधने आणि त्यांचा उपयोग यांचे नियंत्रण स्थानिक लोकांच्या हाती असल्याने चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे विकेंद्रित लोकशाही समाजाचा उदय होऊ शकेल. परंतु त्याचा प्रसार होऊन शाश्वत आणि समग्र समाज निर्माण होण्यासाठी आपल्या साधनसंपत्ती लालसेला लगाम घालणे आवश्यक आहे. हे आपण सर्वांनी अध्यात्मवादाची कास धरली तरच होणे शक्य आहे. 

अनिलकुमार राजवंशी : anilrajvanshi@gmail.com (लेखक फलटण येथील निंबकर  कृषी संशोधन संस्था (नारी) येथे  कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com