‘कृषी पदविकेत‘ हवा काळानुरूप बदल

कृषी तंत्र पदविकेचा सध्याचा अभ्यासक्रम खूपच मोठा आहे. या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सर्वांना समान ठेवून दुसऱ्या वर्षी वेगवेगळे विषय निवडण्याची मुभा द्यावी. असे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी त्या क्षेत्रात थेट काम सुरू करू शकेल.
sampadkiya
sampadkiya

एकीकडे जैव तंत्रज्ञानातील नवनवीन शोध; ड्रोन, रोबोटिक्स, सेन्सर्स आदींचा शेतीतला वाढता उपयोग; हायड्रोपोनिक्स, प्रिसिजन फार्मिंगसारखी नियंत्रित शेतीची नवीन तंत्रे या सर्वांमुळे शेतकरी तांत्रिकदृष्ट्या साक्षर असणे आवश्यक झाले आहे; तर दुसरीकडे शेतकऱ्यांची शिकलेली मुले शेती सोडून शहरांकडे जाताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण १० वी किंवा १२ वी जेमतेम पास झाले असतात आणि शहरात पडेल ते काम करताना दिसतात. त्याऐवजी अशा युवकांना त्यांना समजेल अशा पद्धतीने आधुनिक शेतीतील तंत्रांचे शिक्षण दिले गेले तर ते आपापल्या गावी स्वतःच्या शेतात किंवा एखाद्या कृषी उद्योगात उत्तम काम करू शकतील. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊनच राज्य शासन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (एमसीएईआर) आणि चारही कृषी विद्यापीठे राज्याच्या सर्व जिल्ह्यांत २ वर्षांचा कृषी तंत्र पदविका (कृषी पदविका) अभ्यासक्रम चालवितात. १० वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले, साधारण १६ ते १८ या वयोगटातील मुले व मुली या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात फारसा रस नसतो आणि लवकर स्वावलंबी व्हायची इच्छा असते अशांसाठी हा अभ्यासक्रम खूपच उपयुक्त आहे. तसेच राज्य सरकारच्या कृषी विभागातील कृषी सहायक या महत्त्वाच्या पदासाठीही ही पदविकाच पात्रता म्हणून धरली जाते.

आज शेतीतील उच्चशिक्षणाची काय स्थिती दिसून येते? बहुतेक सर्व कृषी पदवीधर शहरातील नोकरीच्या मागे लागलेले दिसतात.  त्यांनी नोकरी करू नये असे अजिबात म्हणायचे नाही, पण मग खेड्यापाड्यात, शेताशेतात नवीन तंत्रज्ञान, नवी दृष्टी कोण घेऊन जाणार? तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान पदविका केलेले बहुसंख्य तरुणही पुढे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन तीच वाट पकडताना दिसतात. अशा परिस्थितीत हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम हाच शेती क्षेत्रासाठी आशेचा किरण म्हणून दिसतो आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाला तोच मुळी कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार व्हावे या दृष्टीने ! असे युवा मनुष्यबळ जे कृषी क्षेत्रातील प्रगतीचे वाहक ठरू शकतील, जे कृषी आधारित उद्योगांचे जाळे निर्माण करू शकतील, जे स्वत:च्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाची जोड देऊन यशस्वी शेती व्यावसायिक होऊ शकतील. पण हा हेतू जर यशस्वी करायचा असेल, तर काळानुरूप बदल या अभ्यासक्रमात होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासन, एमसीएईआर, कृषी विद्यापीठे आणि हा अभ्यासक्रम राबविणारी कृषी विद्यालये या सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. 

गेल्या ३ वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात असलेल्या ज्ञान प्रबोधिनी कृषी तंत्र विद्यालय, हराळी येथे अनुभव शिक्षणाचे विविध प्रयोग चालू आहेत. शेतावरील प्रात्यक्षिकांच्या जोडीने यशस्वी शेतकऱ्यांच्या आणि शेती उद्योजकांच्या मुलाखती; विविध कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी उद्योग यांना भेटी, विद्यालयाच्या शेतीवर होत असलेल्या प्रयोगांमध्ये सहभाग; शेतीमाल विक्री आदी अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. सुटीच्या काळात ‘कमवा आणि शिका’ योजना राबविली जाते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी निवासी शिबिरे, साहस सहली, इंग्रजी संभाषण वर्ग, गटचर्चा, प्रेरणादायी चरित्रांचे वाचन आदी उपक्रम घेतले जातात. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. परंतु गेली काही वर्षे या अभ्यासक्रमाला मिळणारा प्रतिसाद कमी होत चालला आहे. या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेता त्याच्या कारणांचा अभ्यास करून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. मुळात या वयोगटातील ग्रामीण मुलांना या अभ्याक्रमाविषयी आणि तो पूर्ण केल्यावर कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी फारशी माहिती नसते. या विषयीचे मार्गदर्शन प्रत्येक गावात आणि शाळेत उपलब्ध करून दिले पाहिजे. मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागात, जिथे अजूनही शेती हेच उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे अशा ठिकाणी योग्य मार्गदर्शनच महत्त्वाचे आहे, अन्यथा तरुण मुले सरकारी किंवा खासगी नोकरीच्या आशेने अनेक वर्षे वाया घालविताना दिसून येतात. 

दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृषी तंत्र पदविका हा अभ्यासक्रम १२ वी समकक्ष धरला जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचे मार्ग खुंटतात (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बीएससी ॲग्री हा कोर्स मात्र करता येतो). तसेच आजकाल बहुसंख्य नोकऱ्यांसाठी १२ वी उत्तीर्ण ही पात्रता धरली जाते, तेथेही या विद्यार्थ्यांना तोटा होतो. राज्य शासन आणि विद्यापीठाने एकत्र प्रयत्न केले तर अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करून त्याला १२ वी समकक्ष करणे शक्य आहे. नियमित १२ वी शक्य नसेल, तर ‘राष्ट्रीय मुक्त विद्यालय’च्या धर्तीवर प्रस्तावित असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय’ या अंतर्गत अशी समकक्षता देणे सहज शक्य होईल.

या पदविकेचा सध्याचा अभ्यासक्रम खूपच मोठा आहे. विद्यार्थांना शेतीतील सर्वच गोष्टींची थोडीफार माहिती व्हावी असा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु त्याचा परिणाम असा झाला आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याच विषयातली अपेक्षित कौशल्यपातळी गाठणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सर्वांना समान ठेवून दुसऱ्या वर्षी वेगवेगळे विषय निवडण्याची मुभा द्यावी. उदा. उद्यानविद्या, मृदा व जलसंधारण, कीड व रोगनियंत्रण, सेंद्रिय शेती, नियंत्रित शेती, पशुपालन, शेतीमाल प्रक्रिया व काढणी पश्चात तंत्रज्ञान, शेती अवजारे व यांत्रिकीकरण, शेतीमाल विपणन आदी. यातील कुठलाही एक विषय निवडून तो प्रात्यक्षिके आणि प्रकल्प या माध्यमातून वर्षभर शिकल्यास बाहेर पडणारा विद्यार्थी त्या क्षेत्रात थेट काम सुरू करू शकेल. जिथे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते अशा अनेक आधुनिक शेती उद्योगांत या विद्यार्थ्यांना थेट नोकऱ्याही मिळू शकतील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. थोडा पुढचा विचार केला तर याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या अनेक खेड्यांमध्ये विविध कारणांमुळे महिलांचा शेतीतील सहभाग वाढत चाललेला दिसतो. हा अभ्यासक्रम केलेल्या युवती जर पुढे घरची शेती बघू लागल्या तर एक वेगळा प्रभाव दिसून येईल. तसेच महिलांना गावातल्या गावात उद्योग सुरू करण्यासाठीही याची मदत होऊ शकते. हा विचार करून सरकारने ग्रामीण मुलींना हा अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे वाटते.

भविष्यातील शेतीसमोर नवनवी आव्हाने उभी राहणार आहेत. बदलते तंत्रज्ञान, हवामानबदल, जागतिक आर्थिक धोरणांचा शेतीवर परिणाम, विक्री आणि विपणनाच्या नव्या संधी या सगळ्यांचा अभ्यास करून शेती पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील. शेतीतील समस्या सोडविण्यासाठी एकट्याने नाही तर गटाने काम करायला शिकायला लागेल. या सर्व कौशल्यांचा पाया कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमात घातला गेला पाहिजे. राज्य शासन व कृषी विद्यापीठांनी या अभ्यासक्रमाकडे निम्नस्तर कृषी शिक्षण असे न बघता ग्रामीण शिक्षणातील एक पायाभूत अभ्यासक्रम असा विचार करावा. अभ्यासक्रमात योग्य ते बदल करून त्याची काळानुरूप रचना केल्यास हा अभ्यासक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरू शकेल. PROF. GOURI KAPARE ः ८८८८८०२६१४ (लेखिका ज्ञान प्रबोधिनी कृषी तंत्र विद्यालय, हराळी, जि. उस्मानाबाद येथे प्राचार्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com