कोंडलेला श्वास-निष्पापांचा!

शेतीतील काडीकचरा व पाचट जाळल्यानंतरचा धूर, धुके, वाहनांचा धूर व औद्योगिक वायुउत्सर्जनामुळे दिल्लीत वायुप्रदूषण वाढत आहे. हे प्रदूषण इतके घातक आहे दिल्ली परिसराचे रूपांतर गॅस चेंबरमध्ये झाले होते.
संपादकीय
संपादकीय

‘प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता निसर्गात आहे; परंतु प्रत्येकाची हाव पूर्ण करण्याची क्षमता निसर्गात नाही,’ असे महात्मा गांधी म्हणायचे. देशातल्या मोठ्या गावापासून ते महानगरापर्यंतच्या घराघरांतला प्रत्येक व्यक्ती जीव मुठीत घेऊन जगतो आहे. तुंबलेली गटारे, जागोजागी साचलेले कचऱ्यांचे ढीग, गावाबाहेरच्या डंपिंग ग्राउंडमधला बारमाही धुमसणारा धूर, रिकाम्या प्लॉटवरचा प्लॅस्टिकबंद अन्नाचा कुजका वास, त्यावर तुटून पडलेली कुत्री, जागोजागी जळणाऱ्या प्लॅस्टिकयुक्त कचऱ्याचा धूर, वाहनांचा विषारी धूर, जोडीला वाहनाचे धडकी भरणारे आवाज, जोरजोरात चहूकडे वाजणारे भोंगे, किरकोळ आनंदाच्या क्षणीही वाजवली जाणारी फटाके या सर्वातून हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच होणारे पाणी व मातीचे प्रदूषणही आम्हाला अंगवळणी पडले आहे. हे कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात भरच पडते आहे.

हवा प्रदूषणामुळे मानव प्राणी व इतर सजीवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यात डोळ्याची जळजळ, श्वसनाचे, फुफ्फुसाचे दुर्धर विकार, दमा, न थांबणारा खोकला, त्वचेचे अनेक विकार, झोपेचे आजार, चिडचिड, आस्थमा, मळमळ, डोळ्याचे आजार; तर ध्वनिप्रदूषणाने कानठिळ्या बसणे, भीती वाटणे, दुर्बल व आजारी व्यक्तींचे हृदयविकार, बालकांच्या हृदयाची गती वाढून झोपेत दचकून उठणे, ऐकू कमी येणे, कानाची पडदे फाटणे अशा अनेक आजारांनी ९० टक्के व्यक्ती कुठली ना कुठली समस्या घेऊन डॉक्‍टरकडे गर्दी करताहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात खर्च वाढतो व वेळही वाया जातो. अशा एकाहून एक समस्या आज उग्र रूप धारण करताहेत. पर्यावरण तज्ज्ञ सुनिता नारायण म्हणतात, ‘‘भारतात एकतृतीयांश मृत्यू केवळ हवा प्रदूषणाने होत असून या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’’

शेतीतील काडीकचरा व पाचट जाळल्यानंतरचा धूर, धुके, वाहनांचा धूर व औद्योगिक वायुउत्सर्जनामुळे दिल्लीत वायुप्रदूषण वाढत आहे. हे प्रदूषण इतके घातक आहे दिल्ली परिसराचे रूपांतर गॅस चेंबरमध्ये झाले होते. त्यात कोंडून मरण्याची वेळ तेथील लोकांवर आली आहे. अशी आरोग्य आणीबाणी तेथे मागील आठवड्यात उद्भवली होती. दिल्लीसारख्या शहरात आता घरात हवा शुद्ध करून देणारी उपकरणे बसवावी लागताहेत. हे सगळे वाढत्या प्रदूषणामुळे घडते आहे. ही परिस्थिती का आली, याचा गांभीर्याने विचार करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा परिस्थिती हाताबोहर जायला वेळ लागणार नाही. 

या अडीचशे वर्षांच्या काळात पृथ्वीवरील सर्वच संसाधणे जंगल, माती, खनिज, पाणी यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. ही क्रिया अजूनही सुरू आहे. नद्या, जलाशय, भूजल, समुद्र असे सर्वच प्रकारचे जलस्रोत प्रदूषित झाले. कचरा नावाचा राक्षस अंगावर येतो आहे. सर्व परिसंस्थांमधील शाश्‍वतता मागे पडली. याचा परिणाम पर्यावरणाचं कधीही भरून न निघणारं नुकसान सुरू झाले आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्ज म्हणतात, ‘‘माणसाला पृथ्वीवर टिकून राहायचं असेल तर त्याने परग्रहावर वसाहत निर्माण केली पाहिजे. त्यासाठी फार वेळ उरलेला नाही. हे पुढच्या शंभर वर्षांत करायला हवे. नाहीतर माणूस जातच नामशेष होईल. रोगराई, महामारी, लोकसंख्या वाढ, हवामान बदल आणि पृथ्वीवरील अशनी वादळं यातून फारफार तर तो पृथ्वीवर हजारेक वर्ष टिकून राहिल त्यानंतर त्याचं नामशेष होणं अटळ आहे.’’

पृथ्वी लोकसंख्येचा भार उचलू शकेल याबाबत काही तज्ज्ञ असं सांगताहेत की माणसाची विकासाच्या टप्प्यात भटक्‍या अवस्थेत जेवढी लोकसंख्या होती तो आकडा दीड अब्जांच्या दरम्यान आहे. प्रत्यक्षात आता सात अब्जापर्यंत ती पोचली. पुढे २०५० पर्यंत लोकसंख्या नऊ अब्जांपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे. एक-दीड अब्ज लोकसंख्येला पुरतील एवढीच संसाधने पृथ्वीवर आहेत. सध्या ती एवढ्या वाढलेल्या लोकसंख्येला पुरी पडणार नाहीत. कचरा व वातावरणात सोडला जाणारा कार्बन वायू या दोन प्रमुख समस्या माणसाला भेडसावत आहेत. यावर उत्तर म्हणजे आपली जीवनशैली बदलणे आणि संसाधनाच्या वापराचा वेग कमी करणे हे होय.

‘‘विकास हा आपल्याला भरपूर पैसा मिळवून देईल; पण मोकळा श्‍वास देणार नाही.’’ हे एक सर्वश्रृत मत आहे. भारतात प्रदुषणाचा वेग प्रचंड वाढला असून, देशातील सर्वाधिक मृत्यू प्रदूषणाशी निगडीत कारणामुळे होताहेत असे ‘लॅन्सेट मेडिकल जर्नल’च्या अहवालात म्हटले आहे. २०१५ मध्ये भारतात ५ लाख लोकांचा मृत्यू प्रदूषणाशी संबंधित आजारामुळे झाले. यात चीन दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे तिथे साडेचार लाख मृत्यू झाले. यात रक्तदाब, हृदय आणि संबंधित आजार, मधुमेह, आस्थमा, दमा; तसेच फुफ्फुसाचे कर्करोग यामुळे उपचारावर ४६०० अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च होतो. हा खर्च जगाच्या अर्थव्यवस्थेच्या ६.२ टक्के एवढा आहे.

लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात असेही नमूद केले आहे की, आकाराने २.५ मायक्रॉनपेक्षा लहान कणांच्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचे बळी गेलेत. हे लहान कण औद्योगिक वा वाहनातून नाहीतर घरातील लाकडाच्या किंवा गवरीच्या ज्वलनाने झाला आहे. त्याचा स्वयंपाक करणाऱ्या ग्रामीण महिलांना जास्त फटका बसतो. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते... आपुल्याच हाताने-आवळला फास कोंडलेला श्वास - निष्पापांचा! रमेश चिल्ले : ९४२२६१०७७५ (लेखक शेती व पर्यावरणाचे  अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com