डोंगराचे अश्रू कोण आणि कधी पुसणार?

आंबेनळी घाटात बस दरीत कोसळूनझालेला अपघात आणि चार वर्षांपूर्वीची माळीणची दुर्घटना या दोन्ही घटनांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या जीवघेण्या अपघातांस डोंगरावरून वाहून आलेली लाल मातीच जबाबदार होती.
संपादकीय
संपादकीय

डोंगराची व्याख्या काय? एका ग्रामीण साहित्यकाराने डोंगराची व्याख्या करताना म्हटले आहे की ‘‘डोक्यावर हिरवी कंच टोपी आणि हजारो वृक्षांना आपल्या विशाल कवेत घेऊन बारमाही वाहणाऱ्या नद्यांना जन्म देणारा हा देवऋषी म्हणजे आमचा भलामोठा डोंगर.’’ निसर्ग आणि पर्यावरणाच्या भाषेत जेव्हा आपण डोंगराचे वाचन करतो तेव्हा ही साहित्यिक भाषा तंतोतंत खरी निघते. उंच डोंगराचा डोक्याकडचा विशाल मोकळा भाग हा विविध प्रकारच्या गवतांनी झाकलेला असतो. कारण जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांना तेच धैर्याने सामोरे जाऊ शकतात. लहानपणी गावाजवळच्या उंच डोंगरावर पावसाळ्यात धाप लागेपर्यंत आम्ही चढत असू तेव्हा पायाला फक्त गवताची हिरवी मलमलच लागत असे आणि सोबत दिसत असे ते जागोजागी आढळणारे स्वच्छ पाणी. ते मातीत मुरत असे आणि नंतर स्वच्छ झऱ्यांच्या रूपाने पृष्ठ भागाकडे धावताना दिसे. गवताच्या तंतुमय मुळामधून मातीच्या एकाही कणास पाण्याबरोबर खाली जाता येत नसे.

२८ जुलै २०१८ ला पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा बस अपघात झाला. त्यात ३० कर्मचारी अकाली निधन पावले. अपघाताची दु:खद बातमी ऐकली आणि मला चार वर्षांपूर्वी (३० जुलै २०१४ ) मध्यरात्री झालेली माळीणची दुर्घटना आठवली. ७२२ लोकांच्या गावात १५० जीव मातीखाली गाडले गेले. दोन घटनामध्ये केवढे साम्य, दोन्हीही ठिकाणी सह्याद्रीचे डोंगरच, महिना जुलै, संततधार पाऊस आणि अकाली उद्‌ध्वस्त झालेले कुटुंब. या दोन्ही घटनांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या जीवघेण्या अपघातास जबाबदार होती ती डोंगरावरून वाहून आलेली लाल माती. 

माळीण घटनेमध्ये डोंगरावरून लाल चिखलाचा प्रचंड लोंढाच वाहून खाली आला आणि निद्रिस्त गावास काळ झोपेकडे घेऊन गेला. बस अपघातात डोंगरावरून वाहून आलेली माती रस्त्याच्या कडेला ढिगाऱ्यासारखी साचलेली होती आणि हीच चिकट माती बसला दरीमध्ये खेचत घेऊन गेली. माळीण घटनेमध्ये मातीचा प्रचंड पूर का आला? याची चौकशी झाली. स्वयंसेवी संस्था म्हणतात डोंगर माथ्यावरील आणि उतारावरील शेतीच त्यास जबाबदार होती. दोन्हीही ठिकाणी माती सैल झाली होती. प्रश्न उभा राहतो तो म्हणजे वळवाचा आणि मृगाचा पाऊस पडून गेल्यानंतरही डोंगरावरून माती वाहून खाली का येते? सुरवातीच्या पावसात ती येणे अपेक्षित असते. कारण, उष्ण कटीबंधामधील कडक उन्हाळा, मातीमधील हरवलेली आर्द्रता, सोसाट्याचे वारे त्यामुळे पृष्ठभागावरची सैल माती खाली येऊ शकते. पण, नंतर गवताचे आच्छादन तयार झाल्यावरही मातीचे लोट खाली येणे अनैसर्गिक वाटते. पावसाळ्यात आंबेनळी घाटात डोंगरावरील मातीचे ढिगारे वाहात रस्त्यावर येतात. ही वाहून आलेली माती रस्त्याच्या कडेला जमा करून ठेवली जाते. या घाटात पावसाळ्यात धुक्यामुळे दृष्यमानता नेहमीच कमी असते. त्यामुळे या चिकट मातीच्या निसरड्या ढिगाऱ्यावरून लहान मोठी वाहन नेहमीच खाली दरीमध्ये घसरण्याची शक्यता असते. म्हणूनच वन विभागाकडून घाटामधील दोन्हीही बाजूचे डोंगर संपूर्ण आच्छादित करणे आवश्यक आहे. माती खाली येते म्हणजे तेथे मानवी वर्दळ, माती उघडी पडणे, वृक्ष तोड याची शक्यता जास्त आहे. डोंगर गवतांनी संपूर्ण आच्छादित झाले आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्षसंपदा फुलली तर असे अपघात होण्याची शक्यता दुरावते. 

चीनमध्ये २००८ ला बीजिंग शहरात जागतिक ऑलंपिक स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी बीजिंग शहरामधील तापमान कमी करून प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी कोट्यवधी झाडे लावण्यात आली. शहराच्या ३०० कि. मी. परिसरामधील डोंगर रांगा गवतांनी आच्छादित केल्या गेल्या. ऑलंपिकसाठी लाखो देशीविदेशी नागरिक येणार, पर्यटनस्थळांना भेटी देणार आणि परकीय चलनाने गंगाजळी भरून जाणार याचा अंदाज घेऊन चीन सरकारने राजधानी बीजिंग ते ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ हा चार तासांचा रस्ता सहा पदरी केला. पूर्वी आजूबाजूच्या डोंगरावरची माती पावसामुळे रस्त्यावर वाहून येत असे. ती बंद करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमधून गवताचे काही वाण आणून डोंगर सदाहरित केले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली आणि मुसळधार पावसातही रस्त्यावर माती वाहून येण्याचे प्रमाण शून्य झाले. चीनची ही निसर्गसेवा २००४ मध्ये (ऑलंपिकच्या चार वर्ष अगोदरच) पूर्ण झाली होती. चीनच्या ऑलंपिक आयोजनाचा सर्व खर्च पर्यटकांनी त्या काळात ‘ग्रेट वॉल ऑफ चायनाला’ दिलेल्या भेटीमधूनच वसूल झाला. 

चारपाच दशकापूर्वी जैव विविधतेने समृद्ध असलेला पश्चिम घाट विकासाचे वारू उधळल्यामुळे आज अर्ध्यावरच आला आहे. डॉ. माधव गाडगीळ अहवाल बासणात गेला, डॉ. कस्तुरीरंगन अहवालाने मलमपट्टी केली, माळीण घटना भूतकाळामध्ये जमा झाली. केवढे तरी लहान मोठे अपघात झाले हे सर्व पश्चिम घाटाच्या मातीलाच निगडित होते. डोंगरावरची सुपीक माती वाहून जाते आणि आपणास त्याचे काहीच वाटत नाही. मातीला थांबवून ठेवावयाचे असेल तर वृक्ष लागवड करू डोंगर हरित करावे लागतील. पूर्वी डोंगराच्या पायथ्याशी चारही बाजूंनी वाहून आलेली माती अडविण्यासाठी चर खोदलेली असत आणि त्यास जोडून सैनिकासारखे वृक्ष उभे असत. आम्ही रस्ते दोन्हीही बाजूने वाढवत गेलो. ज्याचा अडथळा येईल त्याला कापत गेलो, विकास झाला पण डोंगर निसर्ग भकास झाला. वाहून येत असलेली ही सुपीक माती हे या डोंगराचे अश्रूच आहेत, त्यांना वेळेवर पुसायला हवे, थांबण्यास प्रवृत्त करावयास हवे.

डॉ. नागेश टेकाळे  : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com