मॉन्सून आला; पण पुढे काय?

एक जूनपासून २५ जूनपर्यंतच्या काळात भारतावरील सरासरी पाऊस सामान्याच्या ३७ टक्के कमी पडला आहे. पण, महाराष्ट्रावरील पावसाच्या त्रुटीचे प्रमाण याहून पुष्कळ अधिक आहे. अशा परिस्थितीत पेरण्या करायच्या की नाही, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
संपादकीय
संपादकीय

ख रीप हंगामासाठी कोणते पीक निवडायचे आणि त्याची पेरणी कधी करायची, हे अतिशय महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीस घ्यावे लागतात. हा निर्णय घेताना शेतकरी तीन गोष्टी विचारात घेतात. पहिली म्हणजे, मे महिन्यात किती पाऊस पडला होता. वळवाचा पाऊस ज्याला कधी अवकाळी पाऊस, असेही म्हटले जाते; थोडा जरी पडला तरी त्याच्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण होतो. 

दुसरी गोष्ट म्हणजे मॉन्सूनच्या आगमनाची अपेक्षित तारीख काय आहे. कारण, मॉन्सून दरवर्षी एकाच ठरावीक तारखेस येत नाही, तो कधी लवकर येतो तर कधी उशिरा. पण, मॉन्सून एकदा केरळमध्ये दाखल झाला, की तो त्यानंतरच्या दहा-बारा दिवसांत राज्याच्या विविध भागांत प्रवेश करेल, अशी अपेक्षा करता येते. पेरणीच्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखी तिसरी गोष्ट ही की मॉन्सूनचा जोर किती आहे. तो एक मंदप्रवाह आहे की शक्तिशाली आणि गतिमान आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते. मॉन्सूनचे आगमन एका दुर्बळ प्रवाहाच्या रूपात झाले असले, तर त्याच्या आगमनानंतर लगेचच पावसात खंड पडतो. हा खंड जर जास्त लांबला, तर मग पेरण्या वाया जाऊ शकतात. यंदाच्या वर्षी मे आणि जून महिन्यांतील हवामानाची परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी वळवाचा पाऊस, मॉन्सूनचे आगमन आणि त्याचा प्रवास या तिन्ही दृष्टींनी विपरीत राहिली, असे म्हणावे लागेल.

विदर्भात आणि मराठवाड्यात या वर्षीच्या मे महिन्यात असह्य उकाडा राहिला. उत्तरेकडचे उष्ण आणि शुष्क वारे सतत वाहत राहिल्यामुळे वळवाचा पाऊस यंदा पडलाच नाही. जमिनी कोरड्या पडल्या, धरणांतील पाण्याची पातळी खालावली. या वर्षीचा मॉन्सून सरासरीच्या ९६ टक्के म्हणजे सामान्य राहील, असा दीर्घ अवधी अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. पण, मॉन्सून केरळवर उशिरा येईल, असेही भाकीत केले गेले होते. त्यानुसार मॉन्सून केरळवर ८ जूनला म्हणजे एका आठवड्याने उशिरा आला खरा. पण, त्याच्या पाठोपाठ ‘वायू’ नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रावर उद्भवले. ते हळूहळू उत्तरेकडे सरकले,  आणि कोकणच्या किनाऱ्यापासून काहीसे अंतर राखून, गुजरातच्या दिशेने गेले. सुदैवाने त्या वादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर मोठा तडाखा बसून प्राणहानी झाली नाही. पण, अतितीव्र अशा या चक्रीवादळाच्या वाऱ्यांनी आपल्या भोवतालचे सर्व बाष्प शोषून घेण्याचे काम केले. परिणामी, मॉन्सूनचे वारे शुष्क झाले आणि मॉन्सूनची उत्तरेकडची वाटचाल खुंटली. राज्यात सर्वांत आधी म्हणजे सामान्यपणे १० जूनला मुंबईत दाखल होणारा मॉन्सून या वर्षी सगळ्यात शेवटी म्हणजे २५ जूनला पोचला आहे.  

एक जूनपासून २५ जूनपर्यंतच्या काळात भारतावरील सरासरी पाऊस सामान्याच्या ३७ टक्के कमी पडला आहे. पण, महाराष्ट्रावरील पावसाच्या त्रुटीचे प्रमाण याहून पुष्कळ अधिक आहे. १ जून ते २५ जूनदरम्यानचे पर्जन्यमान विदर्भात सामान्याहून ७४ टक्के कमी, मराठवाड्यात ४४ टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात ४८ टक्के कमी, तर कोकणात ५५ टक्के कमी आहे. हे सर्व आकडे चिंताजनक आहेत. कारण, अशा परिस्थितीत पेरण्या करायच्या की नाही, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जून महिन्यातील पावसाची त्रुटी मॉन्सूनच्या उर्वरित तीन महिन्यांत भरून निघायची असेल, तर त्यासाठी त्या तिन्ही महिन्यांत भरपूर पाऊस पडायला हवा. तसे घडायची शक्यता हवामान विभागाने अजून तरी वर्तविलेली नाही. धरणांतील पाणीसाठा वाढविण्यासाठी पाऊस कधीही पडला तरी तो उपयोगी ठरू शकतो. पण, शेतीची कामे करण्याचे एक वेळापत्रक असते. वेळच्या वेळी पाऊस पडला नाही, तर ते वेळापत्रक कोलमडू शकते आणि पिकांचे नुकसान होऊ शकते. 

हवामान विभागाच्या http://nwp.imd.gov.in/ या संकेतस्थळावर पुढील दहा दिवसांसाठीचे मॉडेलवर आधारलेले पूर्वानुमान देणारे नकाशे प्रकाशित केले जात असतात. ते वायुदाब, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पर्जन्यमान, अशा हवामानाच्या विविध घटकांसाठी असतात. त्यातील पावसाचे नकाशे काळजीपूर्वक पाहिले, तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशांवर पावसाची परिस्थिती येणाऱ्या दहा दिवसांत दैनंदिन कशी बदलत जाण्याची शक्यता आहे, हे समजू शकते. या संकेतस्थळावरील नकाशांवरून असे दिसते की, बंगालच्या उपसागरावर एक जुलैच्या सुमारास एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची आणि ते हळूहळू पश्चिमेकडे सरकत जायची शक्यता आहे. ते कमी दाबाचे क्षेत्र जर प्रत्यक्षात निर्माण झाले आणि त्याने पश्चिमेकडे मार्गक्रमण केले, तर त्याच्या प्रभावाखाली महाराष्ट्रावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडायची संभावना आहे. 

http://satellite.imd.gov.in/insat.htm या हवामान विभागाच्या संकेतस्थळावर भारताच्या इन्सॅट-३ डी उपग्रहाने दर अर्ध्या तासाने टिपलेली ढगांची छायाचित्रे पाहायला मिळतात. त्यात महाराष्ट्रावर कुठेकुठे ढग दाटून येत आहेत, हे सहजपणे दिसते. त्याशिवाय कुठेकुठे वीज कोसळण्याची शक्यता आहे, हे दाखविणारा एक नकाशाही दाखविला जातो.

http://www.imdagrimet.gov.in/ हे हवामान विभागाचे संकेतस्थळ खास शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारी माहिती देत असते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी हवामानशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी तयार केलेला सल्ला या संकेतस्थळावर दिला जातो. हा मराठी भाषेत दिला जातो आणि तो प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा असतो.    हवामान विभागाची मुंबई आणि नागपूर येथे प्रादेशिक हवामान केंद्रे कार्यरत आहेत. त्यांची http://www.imdmumbai.gov.in/ आणि http://www.imdnagpur.gov.in/ ही दोन स्वतंत्र संकेतस्थळे आहेत. त्यावर त्यांच्या प्रदेशातील हवामानाची विशिष्ट माहिती उपलब्ध केली जाते.  मॉन्सूनचे आगमन काहीसे निराशजनक झाले असले, तरी आगामी काळात त्याचे स्वरूप कसे राहण्याची शक्यता आहे, हे शेतकरी बंधूंनी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. हल्लीच्या काळी अनेक खासगी संकेतस्थळांवर आणि व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे हवामानाचे अनधिकृत अंदाज मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात आहेत. त्यातील माहिती आणि अंदाजांचा वापर करण्यापूर्वी त्यांचा वैज्ञानिक आधार पडताळून पाहणे गरजेचे आहे. हवामान विभागांची वर दिलेली संकेतस्थळे अधिकृत माहिती देतात आणि त्यांचा उपयोग शेतकऱ्यांना सध्याच्या अनिश्चित परिस्थितीत नक्कीच लाभदायक ठरेल.

डॉ. रंजन केळकर : ९८५०१८३४७५ (लेखक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com