संपादकीय
संपादकीय

ग्रामविकासातून जाते उन्नत भारताची वाट

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३२ वा दीक्षान्त समारंभ ५ फेब्रुवारीला झाला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पद्मभूषण डॉ. विजय भटकर उपस्थित होते. यांनी उन्नत भारताचे स्वप्न प्रत्यक्षात अाणण्यासाठी ग्रामीण विकासाचे किती अाणि कसे महत्त्व अाहे, हे अधोरेखित केले. त्यांच्या या चिंतनाचा हा संपादित भाग...!
२१व्या शतकात भारताला एक प्रगत राष्ट्र बनविण्याचे अामचे स्वप्न अाहे. भारत देश हा उन्नत असावा व त्यासाठी खेडी उन्नत करणे गरजेचे अाहे. देशामध्ये सहा लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. या देशात गुरुकुल हे वैदिक काळापासून वाढू लागले. जगातील पहिले विश्वविद्यालय, तक्षशिला, नालंदा अाणि विक्रमशिला यांच्या निर्मितीमुळे देशाला वैभव प्राप्त झाले. नालंदा विद्यापीठाला दोनशे गावे व त्यांचा परिसर जोडला अाहे. अाज या गावांची स्थिती दयनिय अाहे. एकेकाळी या गावांनी जगातील नामांकीत नालंदा विश्वविद्यालयाला भरभरून सहकार्य केले. यांचा प्रभाव जगावर पडला. भारताला विश्व गुरू म्हणून संबोधल्या गेले, हे त्यांच्या प्रगत ज्ञान प्रणालीमुळे. ११ व्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत देशावर अनेक परकीय अाक्रमणे होऊनसुद्धा जगातील अर्थव्यवस्था व व्यापारावर वर्चस्व राखले. त्याचे कारण अापल्या येथील वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक व्यवस्था अाणि सार्वजनिक जागतिक दृष्टिकोन. भारत जगातील सर्वात सधन भूमी असलेला; परंतु ब्रिटिशांच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जगातील गरीब देश अोळखला गेला. १९४७ पासून भारताने अापल्या शाळा, महाविद्यालये, विद्यापिठे तसेच प्रयोगशाळा व उद्योग यांच्यादृष्टीने पुन्हा राष्ट्र बांधणीस सुरवात केली. अाज ७० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर भारत समानता व क्रयशक्तीच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास अाली. जगातील तिसरे सर्वात मोठे शैक्षणिक, संशोधन संसाधने भारतात आहेत. त्यात विज्ञान अाणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन जसे अाण्विक ऊर्जा, सुपर कॉम्प्युटिंग, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, अणु तंत्रज्ञान अादींचा समावेश आहे. दरम्यान भारताने जगातील सर्वात उच्च पायाभूत शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. देशात ९०० विद्यापिठे, ४० हजार महाविद्यालयांचा समावेश अाहे. यात २३ भारतीय तंत्रज्ञान संस्था, ७ अायअायएससीअार, ७ एनअायपीईअारएस, ३१ एनअायटी, १० हजार एअासीटीई तांत्रिक संस्था, ६७ कृषी विद्यापिठे, ५०० कृषी महाविद्यालये अाणि ४५० वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश अाहे. नुकतेच भारताने सीएसअायअार, अायसीएअार, अायसीएमअार, डीएई, इस्त्रो, डीअारडीअो अाणि एमईअायटीवाय अंतर्गत संशोधन प्रयोगशाळांची एक श्रृखंला प्रस्थापित केली अाहे. अाज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वैज्ञानिक व तांत्रिक मनुष्यबळ असलेला देश अाहे. जागतिक स्तरावर भारत ५०० नामांकित कंपन्यांना अायटी मनुष्यबळ पुरविण्यात सक्षम व अग्रणी अाहे. समृद्धीसह, संशोधन अाणि परिवर्तनासाठी जागतिक संशोधन व विकासासाठी भारत एक मनपसंत ठिकाण ठरत अाहे. देश एकीकडे अशी चमकदार कामगिरी करीत असताना दुसरीकडे याच देशात मोठा विरोधाभास व असमानता दिसून येते. जगातील सर्वात श्रीमंत व गरीब लोक भारतात विखुरलेले अाहेत. नवीन भारताचे स्वप्न पाहत असताना यामार्गात एक मोठे अाव्हान म्हणजे सहा लाख ४० हजार गावांची अस्थीर अवस्था असून त्यात राहणारे ८५ कोटी लोक गरिबीमुळे त्रस्त अाहेत. ते शेतीवर अवलंबून असून कर्जबाजारीपणा, निराशा त्यांच्या पदरात पडते अाहे. त्यांच्यावर वाढत असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी शासनाने दोन दशकात कर्जमाफीचे उपचारात्मक पाऊल उचलले. तरीही दहा हजारांवर शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या. शेती ही न परवडणारी असून गावातील लोकांचे शहरी भागात स्थलांतर होत अाहे. शहरी भागात सर्वत्र झोपडपट्ट्यांची सूज निर्माण झाली आहे. उन्नत भारताचे नवीन स्वप्न हे उन्नत गावांशिवाय शक्य नाही. याअनुषंगाने महात्मा गांधींना खूप दूरदृष्टी होती. त्यांनी यावर भरही दिला. त्यांच्यामते स्वतंत्र भारताची इमारत ही सात लाख गावांवर अवलंबून अाहे. या वास्तवाची जाणीव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अापल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात करून दिली होती. त्यांनी सांसद अादर्शग्राम योजनेची घोषणा केली. सिद्ध ज्ञानासह प्रमुख शैक्षणिक अाणि संशोधन संस्थांच्या ज्ञानाची इच्छाशक्ती वाढवून गावांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धती अाणि धोरणांचा वापर करून सर्वसमावेशक अाणि शाश्वत विकासांच्या मार्गावर त्यांना चालना देणे हे उन्नत भारताचे उद्दिष्ट होय. उन्नत भारत निर्माण करण्याचा विचार म्हणजे प्रत्येक गाव उन्नत करणे होय. भारतात सहा लाख ४० हजार गावे किंवा अडीच लाख ग्रामपंचायती अाणि ४० हजार शैक्षणिक संस्था अाहेत. एक गाव किंवा एक ग्रामपंचायत प्रयोग, संशोधन अाणि नवीन उपक्रमासाठी एक जिवंत प्रयोगशाळा म्हणून पाहिल्या जाऊ शकते. एक शैक्षणिक संस्था अनेक गावांसोबत जोडून त्यांच्या क्षमतेनुसार एक महाविद्यालय एक ते दहा गावांना शिक्षण व विकासासाठी दत्तक घेऊ शकते. गावांची निवड संबंधित महाविद्यालयांनी करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी द्यावी. महाविद्यालयासारख्या शैक्षणिक संस्थांसोबत गावे का जोडावी याचे कारण म्हणजे अर्थव्यवस्था ही गावांना भौतिक संपत्तीपेक्षा नैसर्गिक संसाधनांवर अाधारीत जैव अर्थव्यवस्था असेल. उच्च शिक्षणामध्ये उदयन्मुख तंत्रज्ञान व्यवस्थापन, मानवता अाणि औषध यासह सर्व विषयांमध्ये ग्रामीण भागाचा सामाजिक विकास यावर भर देऊन कृषी मंत्रालयाने सुधारीत योजना अाणण्याची गरज अाहे. उन्नत गावाची व्याख्या करताना पूर्वपरिभाषित किंवा अोळखता येण्याजोगे मानक जसे अोडीएफ (उघड्यावर शौचमुक्त गाव), जेथे सांडपाणी व नाले नसणे, कचरा अाणि घाण, शुद्ध पिण्याचे पाणी, पर्याप्त हिरवळ, खेळायची मैदाने, विद्युत व पथदिव्यांसहीत उच्च शैक्षणिक पातळी व चांगल्या शाळा, ज्यामध्ये ई-लर्निंग सुविधा, ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी, ई-ग्राम पंचायत अाणि सांप्रदायिक शांतता अाणि सकारात्मक व अानंदी वातावरण असेल. ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबवून सुद्धा ७० वर्षांच्या स्वतंत्र काळानंतरही अाज संपूर्ण देशात १०० अादर्श गावे क्वचित बघायला मिळतात. त्यामुळे २०२० हे उन्नत ग्रामचा पहिला मैलाचा दगड ठरू शकतो. केंद्र- राज्य सरकार अाणि जिल्हास्तरीय योजनांचे निधी एकत्रिकरण करून ग्रामविकास योजना राबविली जाईल. विकासाची जबाबदारी ग्रामपंचायत, सरपंच, क्षेत्रीय विकास अधिकारी/उपविभागीय अधिकारी अाणि जिल्हाधिकाऱ्यांवर राहील. ज्ञान संस्था अाणि ग्राम पंचायत यांचे स्वयंसेवी संस्था अाणि स्थानिक एमएसएमईएस कडून मदत घेतील. सीएसअार निधी अाणि देणग्यांचे स्त्रोत जेथे शक्यता असेल तेथे वापर केला जाऊ शकतो. राष्‍ट्रीय पातळीवर उन्नत भारत मिशन हे समांतर प्रोसेसींग मॉडेलद्वारे प्रत्येक गावात शासकीय मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेशी जोडून ग्राम दत्तक प्रक्रियेद्वारे होऊ शकेल. दीर्घकालीन विकासासाठी ग्राम पंचायत अाणि शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार करता येईल. डॉ. विजय भटकर (लेखक नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु आहेत.) (संकलन ः गोपाल हागे, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com