छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?

आपल्या उत्पादनाची नेमकी किंमत किती ठरवावी, त्यातील फायद्याचे प्रमाण किती असले पाहिजे या मूलभूत प्रश्नांपासून प्रत्यक्ष व्यवहारातील अनेक बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?

नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या उत्पादनाची नेमकी किंमत किती ठरवावी, त्यातील फायद्याचे प्रमाण किती असले पाहिजे या मूलभूत प्रश्नांपासून प्रत्यक्ष व्यवहारातील अनेक बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही लघू उद्योजकासमोर आपल्या उत्पादन आणि बाजारपेठेशी संबंधित अनेक प्रश्न असतात. आपल्या उत्पादनाची बाजारात मागणी वाढली पाहिजे, असे कितीही वाटत असले तरी प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत उत्पादन नेण्यासाठी, पोचवण्यासाठी जाहिराती करण्याइतके आर्थिक बळ असत नाही. अशा वेळी त्याच्या पातळीवर प्रयत्न करत तो उद्योगाचे, बाजारपेठेतील बारकावे शिकत असतो. अर्थात, यामध्ये प्रत्येक टप्प्यावर फायद्याचे प्रमाण अत्यंत कमी राहते, अनेकवेळा तर नुकसानही सोसावे लागते. म्हणतात ना, अनुभव हा सर्वात मोठा गुरू आहे, मात्र त्याचा मारही तितका मोठा असतो. उद्योगांमध्ये नुकसान सहन करत शिकत असताना प्रत्येक अनुभवातून धडा घेत पुढे जावे लागते. प्रत्येक उद्योगाचे आणि उद्योजकाचे त्याच स्वतःचे एक वैशिष्ट्य किंवा बलस्थान असते. उर्वरित सर्व बऱ्याच गोष्टी त्याला शिकाव्या लागतात. उदा. एखादा उद्योजक जर तांत्रिक दृष्ट्या पारंगत असला तरी त्याला आर्थिक बाबी, नोंदी ठेवणे, बाजारपेठेमध्ये ग्राहक, भागीदार, विक्रेते अशा अन्य अनेक लोकांची सातत्याने संपर्क आणि समन्वय ठेवावा लागतो. त्याचेही एक तंत्र असते. यातील प्रत्येक व्यक्तीची एक मानसिकता ठरलेली असते, त्यानुसार त्याच्याशी संवाद करावा, वाढवावा लागतो. उद्योगात शाश्वत नफा मिळवायचा असेल तर उद्योजकाला एक किंवा दोन गोष्टींमध्ये पारंगत असून चालत नाही तर त्याला उद्योगातील विविध अंगामध्ये प्रावीण्य मिळवावे लागते. उद्योगामध्ये नफा वाढवण्यासाठी सामान्यतः दोन प्रकारची धोरणे राबवली जातात. १) किंमत ही वास्तव आहे (बाजार ठरवतो) व खर्च कमी करणे हे धोरण आहे. आपण उत्पादित करत असलेल्या उत्पादनाची किंमत ही बाजाराद्वारे ठरवली जात असेल तर नफा वाढविण्यासाठी आपल्याकडे केवळ खर्च कमी करण्याचा पर्याय राहतो. कारण आपण उत्पादित करत असलेल्या उत्पादन अथवा सेवेला ग्राहकांकडे बाजारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विशेष वेगळेपण नसते. खर्चामध्ये आपण मागील लेखामध्ये पाहिल्याप्रमाणे दोन प्रकारचे खर्च असतात. १) स्थिर खर्च २) बदलणारा खर्च. खर्च कमी करण्याच्या धोरणामध्ये बदलणारा खर्च कमी करणे तुलनेने अधिक शक्य असते. त्यात कच्च्या मालाचा खर्च कमी करणे व संसाधनाचा खर्च कमी करणे हे मुख्य पर्याय असतात. कच्च्या मालाचा खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी व साठवण हा एक मार्ग असतो, पण यासाठी मोठे खेळते भांडवल लागते. संसाधनांचा खर्च कमी करण्यासाठी कार्यक्षम मनुष्यबळ व यंत्रसामग्री यांचा समावेश होतो. स्वयंचलित व कार्यक्षम यंत्रणा लावण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक असते. स्थिर खर्च कमी करण्यासाठी उद्योजक हे कमी गुंतवणुकीमध्ये मोठी क्षमता असलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. मोठ्या क्षमतेचा उद्योग चालवण्यासाठी जास्त खेळते भांडवल लागते. जास्त खेळत्या भांडवलाचा उद्योग करताना उद्योगावर खेळते भांडवल लवकर वळते करून घेण्याचा नेहमी दबाव असतो. या दबावामुळे बरेचदा बाजारात उत्पादन हे कमी किमतीला विकावे लागते. याचा परिणाम उद्योगाच्या नफ्यावर होतो. २) खर्च हे वास्तव आहे, मग किंमत वाढवणे हे धोरण आहे. आपण उत्पादित केलेल्या वस्तूचा खर्च हा वास्तव आहे. म्हणजेच तो कमी करण्याला मर्यादा आहेत. अशा वेळी बाजारात रास्त किंमत मिळवण्याचे धोरण राबवावे लागते. हे धोरण राबवताना आपण देत असलेल्या उत्पादनामध्ये ग्राहकाला उत्पादनामध्ये मूल्यवर्धन दिसले पाहिजे. बाजारामध्ये अन्य स्पर्धक ते देत नाहीत, असे स्पष्ट करता आले पाहिजे. या उत्पादनाला बाजारामध्ये पर्याय अत्यंत कमी असले पाहिजेत. या धोरणामध्ये ग्राहकांच्या गरजांची नेमकी जाणीव उद्योजकाला असणे आणि त्याचे रूपांतर त्या उत्पादनामध्ये उमटणे आवश्यक असते. या गरजा भागवण्यासाठी ग्राहकाची खर्च करायची तयारी कितपत आहे, याचा अंदाज उद्योजकाला असला पाहिजे. त्यासाठी सामान्यतः ग्राहकांच्या सर्वेक्षणाचा पर्याय राबवला जातो. त्यातून आपल्या उत्पादनासाठी अपेक्षित ग्राहक नेमक्या समाजाच्या कोणत्या थरातून येतो, त्याच्या गरजा, त्याची आर्थिक कुवत, याबरोबर यातील नेमक्या कोणत्या गरजांना तो प्राधान्य देतो याचा अंदाज मिळवला जातो. ग्राहकांचे वेगवेगळ्या निकषांवर आधारित वर्गीकरण केले जाते. ग्राहकांचा विशिष्ट वर्ग व त्यांच्या गरजा याचा समन्वय साधून त्या वर्गासाठीच उत्पादन किंवा सेवेची निर्मिती केली जाते. तशी त्याची त्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत जाहिरात केली जाते. अ) यामध्ये विशिष्ट ग्राहक वर्गाच्या मागणीचा आलेख मिळवला जातो. म्हणजेच तो कधी, कुठे, कसे, व किती खरेदी करतो अशा घटकांचा अभ्यास केला जातो. ब) हे धोरण राबवताना ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादनाची निर्मिती आवश्यक असते. क) योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या उत्पादनाचे किंवा सेवेचे सादरीकरण, जाहिरात यावर खर्च करावा लागतो. वेगवेगळ्या प्रसार माध्यमांचा वापर करावा लागतो. आपण केलेले मूल्यवर्धन हे ग्राहकांच्या अपेक्षेला पात्र ठरल्यानंतर आपल्याला ग्राहकांनी लक्षात ठेवण्यासाठी ब्रँडची गरज असते. जाहिरात आणि ब्रँडिंगद्वारे ग्राहकाच्या मनात उद्योगाचे विशिष्ट स्थान निर्माण केले जाते. ब्रॅण्डींगद्वारे उत्पादनास एक प्रकारे ओळख दिली जाते. ब्रँड तयार करण्यासाठी व तो ग्राहकांसमोर वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्यासाठी खर्च करावा लागतो. नेमके कोणते धोरण अवलंबावे?

  • अनेकवेळा उत्पादनाच्या प्रकारानुसार, त्याच्या बाजारातील स्थितीनुसार आपण कोणते धोरण राबवायचे, हे ठरत असते.
  • वरील दोन्ही धोरणे आळीपाळीने उद्योगाच्या स्थितीनुसार राबवली जातात.
  • जर उद्योगाची उत्पादने बाजारात प्रस्थापित असतील व त्याच्या मागणीच्या आलेखाचा योग्य अंदाज असेल तर अशा उद्योगाने खर्च कमी करण्याचे धोरण अवलंबणे योग्य ठरते.
  • जर एखाद्या उद्योगाचे उत्पादन बाजारात प्रस्थापित नाही तर त्याच्या मागणीचा आलेख व अंदाज बांधणे कठीण असते. अशा परिस्थितीत रास्त किंमत मिळवण्याचे धोरणाचा अवलंब करणे योग्य ठरते.
  • छोट्या उद्योगाने किती उलाढाल केली यापेक्षा कमाल नफा किती मिळवावा, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
  • उद्योग करताना नफा वाढवण्यासाठी खर्च कमी करण्यावर मर्यादा असतात. किंमत वाढवण्यासाठी योग्य ग्राहक वर्गांची कास धरल्यास अमर्याद संधी असते.
  • पुढील लेखात आपण नवीन लघु उद्योग सुरू करण्यासाठी पूर्वतयारी व त्यासाठीचे निकष यांचा अभ्यास करणार आहोत.
  • डॉ. विशाल सरदेशपांडे, ८७८८४६०७६६ (लेखक आय. आय. टी. मुंबई येथे अनुबंध सह प्राध्यापक असून, ग्रामीण उद्योग धंदे व त्यांचे सबलीकरण विषयातील तज्ज्ञ आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com