वृक्ष होऊन जगू या

माणसाने वृक्ष होऊन जगावे ही कल्पनाच किती सुखावह आहे. ज्याच्याकडे देण्याची वृत्ती असते तो नेहमीच आनंदी असतो. जेथे वृक्ष तेथे आनंदाचा झरा पाझरत असतो.
संपादकीय
संपादकीय

मागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर पाहिला. मुलाखतकारास उत्तर देणारे होते ज्‍येष्ठ मराठी दक्षिणात्य अभिनेते सयाजी शिंदे. मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारला ‘‘कुणाला उभे करण्यासाठी कष्ट कराल? झाड की माणूस!’’ त्वरित उत्तर मिळाले, ‘‘झाडाला! माणसाला नाही, कारण माणूस उलटेन पण झाड कधीही उलटणार नाही. आपला मुलगा २० वर्षांनंतर आपणास दगा देऊ शकतो पण आपण लावलेले झाड २० वर्षांनी सुद्धा कधीही दगा देणार नाही उलट ते कायम आपणास फुले, फळे आणि सावलीच देणार!’’ उत्तर देताना सयाजी मला थोडे भावूक वाटले. विचारधनाने संपन्न असलेला तो कार्यक्रम केव्हा संपला कळलेच नाही केवढी तरी सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये होती. खरंच वृक्ष आणि मूल यामध्ये काहीही फरक नाही. दोघांनाही लहान असताना आधाराची गरज असते. वृक्ष लवकर म्हणजे ६/७ वर्षांत स्वतंत्र होतो मात्र लहान मुलाला त्यासाठी वीस वर्ष वाट पहावी लागते. आधाराशिवाय कसे जगायचे, संकटाला तोंड देत दात्याच्या रूपात आयुष्य कसे काढायचे, हे वृक्ष आपणास शिकवतो पण आपण तसे शिकतो का? आजचा शेतकरी आधाराशिवाय जगूच शकत नाही. शेती करण्यासाठी त्याला निसर्गाच्या रूप रंगाची आणि शासनाच्या मदतीची गरज आहे. कमी म्हणून की काय? शेती उत्पादन पश्चात त्याला दलालांचाही आधार घ्यावा लागतो. शेतकऱ्याने वृक्ष होऊन जगायचे ठरविल्यास हे सर्व आधार आपोआपच भुईसपाट होतील आणि यासाठीच प्रयत्नांची गरज आहे. 

वृक्षाच्या उल्लेखाने मनात आठवणींची उजळणी सुरू झाली. एका डेरेदार आंब्याखाली ‘‘हरी मुखे म्हणा! हरी मुखे म्हणा! पुण्याची गणना कोण करी’’ असे म्हणत शांत बसलेला एक वृद्ध शेतकरी मला माझ्या गावाकडे उन्हाळ्यात भर दुपारी दिसला. वृक्षाकडे बोट दाखवत तो बोलत होता, ‘‘याला मी लावले, उन्हाळयात डोक्यावर पाणी आणून वाढवले, आता या उतार वयात हाच मला मुलासारखा आधार देत आहे, सावली देतो, फळे देतो आणि सोबत जगण्याचा आनंदसुद्धा. घरी पण जावेसे वाटत नाही बाबा! या माणसांचे काही खरे नाही.’’ मी बाबांच्या संसाराची काहीही चौकशी केली नाही.  हरिद्वारपासून २० कि.मी अंतरावर दिल्ली डेहरादून महामार्गावर एक योग, आयुर्वेद विद्यापीठ आहे. शिक्षणाबरोबरच अनेक आयुर्वेदिक उत्पादने तेथे विकत मिळतात. काही वर्षांपूर्वी ‘च्यवनप्राश’ निर्मितीसाठी त्यांना आवळा कमी पडू लागला तेव्हा त्याच्या शोधात तेथील कर्मचारी परिसरात हिंडु लागले. उद्देश होता शेतकऱ्यांना आवळा लागवडीस प्रोत्साहन द्यावयाचे आणि सोबत कुठे आवळा मोठ्या प्रमाणावर विकत मिळतो का? याचा शोध घ्यावयाचा. त्यांचा हा शोध एका गावापाशी थांबला. तेथील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर आवळ्यांनी लगडलेले एक तरी झाड होतेच. चौकशी करताना कळाले की, गावात एक वृद्ध शेतकरी आला होता, त्याने प्रत्येकाच्या बांधावर आवळीच झाड लावण्याचा निश्चय केला. सगळ्याकडे त्याने बांधावर हातभर जागा मागितली. आवळीचे झाड लावून, पाणी तोच घालणार म्हटल्यावर कोणीही नाही म्हटले नाही. सर्वांच्या बांधावर एक एक रोप लागले. त्या शेतकऱ्याने हरिद्वाररहून कृष्णाच्या लहान मूर्ती आणल्या आणि प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये एक मूर्ती ठेऊन दररोज सकाळी तो तिला स्नान घालू लागला. आवळ्याची झाडे झपाट्याने वाढू लागली. वर्षानंतर केव्हा तरी त्या वृद्ध शेतकऱ्याने सर्वांना सांगितले की, तो एक महिना गावास जाणार आहे, बांधावरचा देव स्नानाशिवाय कसा राहील म्हणून सर्वांनी आवळ्याच्या झाडाला पाणी घातले आणि  त्यात पुन्हा खंड पडला नाही कारण तो शेतकरी पुन्हा आलाच नाही. आवळ्याची झाडे मोठी झाली, ती फळांनी लगडली आणि विद्यापीठाचे गिऱ्हाईक बांधावर चालत आले. त्या वृद्ध शेतकऱ्याने शेकडो आवळ्यांच्या झाडांना त्याच्या मुलांप्रमाणे वाढविले. त्यांना वाढवताना तो वृक्ष होऊन जगला हे महत्त्वाचे! 

सांदिपनी ऋषींच्या आश्रमात इतरांबरोबर कृष्ण, बलराम गुरुकुलाचे शिक्षण घेत होते. शिक्षण पूर्ण होत असताना ऋषींनी त्यांच्या शिष्यांना प्रश्न विचारला, ‘‘तुम्हास कोण होण्यास आवडेल?’’ अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली मात्र श्रीकृष्णाचे उत्तर समर्पक होते. तो म्हणाला, ‘‘गुरुवर्य! मला वृक्ष होण्यास जास्त आवडेल कारण तो माणूस, पशू, पक्षी, कीटक, मधमाशी यांना उदार हस्ते फक्त देत असतो, तो याचक नसून दाता आहे.’’ कृष्ण ही वृक्ष देवता आहे ती याचमुळे.

माणसाने वृक्ष होऊन जगावे ही कल्पनाच किती सुखावह आहे. ज्याच्याकडे देण्याची वृत्ती असते तो नेहमीच आनंदी असतो. जेथे वृक्ष तेथे आनंदाचा झरा पाझरत असतो. भूतानमधील आनंदी शेतकरी हा वृक्ष श्रीमंतीमुळेच आहे. श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, चीन आणि अशी कितीतरी लहान मोठी राष्ट्रे आहेत जेथे वृक्ष श्रीमंती ६० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. वृक्ष आणि दुष्काळाचा किती जवळचा संबंध आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. भूगर्भातील पाणी वृक्षामुळे धरून ठेवले जाते, मातीतील ओलावा, नद्यांचे वाहणे, पक्षांचा किलबिलाट, हवेतील गारवा आणि मुबलक पडणारा पाऊस हे सर्व वृक्षामुळेच साध्य होते. 

महाराष्ट्रातील सध्याचा दुष्काळ हा कुठेतरी वृक्ष संख्या झपाट्याने कमी झाल्याशी जोडलेला आहे याचा आपणास विसर पडला आहे. आपण देण्याचे टाळतो मात्र जे काही मिळेल ते घेण्यासाठी आपली करकमले नेहमीच पुढे असतात. शेतीचे गणित यामुळेच चुकत आहे. माती फक्त आपलीच आहे असे समजून आपण तिला ओरबाडत असतो. वास्तविक ती विविध जिवाणू, कीटांणूची सुद्धा आहे याचा आपल्याला विसर पडतो. भूगर्भातील पाणी वृक्षांच्या मुळांचे सुद्धा आहे, झाडाची सावली पशु-पक्षांची सुद्धा आहे याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. एकाचे हिरावून घेतले की दुसऱ्याचे आपोआप संपते आणि यामुळेच दुष्काळाची निर्मिती होते. ज्याचा वाटा त्याला मिळाला तर दुष्काळ समिपही येणार नाही. आपण देत राहिलो तर घेणारा दुपटीने परतफेड करतो. जमिनीला सेंद्रिय खत दिले तर शाश्वत उत्पन्न तर मिळतेच पण त्यासोबत कायम ओलावासुद्धा मिळतो. बांधावर वृक्ष लावले तर वावरामधील उन्हाची लाही कमी होते आणि फळ उत्पादनही मिळते म्हणूनच फक्त ओरबाडत राहणे योग्य नाही. अपेक्षा हे सर्व दु:खाचे मूळ आहे म्हणूनच प्रत्येकाने वृक्ष होऊन जगावे आणि वृक्ष होऊन जगावयाचे असेल तर त्यासाठी प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून वाढवायला हवाच. वृक्षाच्या शीतल छायेमध्ये दुष्काळाची झळ तेवढीच शीतल आणि सौम्य होऊ शकते हा अनुकरणीय आदर्श एक शेतकरीच इतरांना सांगू शकतो. कारण, तो लावलेल्या वृक्षांस आपला सांभाळ करणाऱ्या मुलांच्या रूपात पाहत असतो म्हणूनच वृक्ष होऊन जगणे हे खरे पुण्याचे काम आहे आणि अशा पुण्याची गणना कोण करणार? 

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com