एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा १५’ वाणात यशस्वी प्रयोग

नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कॅलिफोर्निया येथील ‘आरा-१५’ हे वाण उपलब्ध केले असून, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. रावळगाव (ता. मालेगाव जि. नाशिक) येथील लागवडीमध्ये एका वर्षात दुबार उत्पादन घेण्याचा प्रयोग नुकताच यशस्वी झाला आहे.
एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा १५’ वाणात यशस्वी प्रयोग
एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा १५’ वाणात यशस्वी प्रयोग

द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत चालली असून, वाढत्या खर्चासोबत उत्पादनात घट होत आहे. वातावरण बदलाच्या काळात शाश्वत निर्यातक्षम उत्पादन देणाऱ्या द्राक्ष वाणांची गरज बागायतदार सातत्याने व्यक्त करत. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कॅलिफोर्निया येथील ‘आरा-१५’ हे वाण उपलब्ध केले असून, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. रावळगाव (ता. मालेगाव जि. नाशिक) येथील लागवडीमध्ये एका वर्षात दुबार उत्पादन घेण्याचा प्रयोग नुकताच यशस्वी झाला आहे. सलग तिसऱ्यांदा गोडी बहार छाटणी घेऊन जोरदार घडनिर्मिती झाली. सध्याच्या द्राक्ष शेतीसमोर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च या प्रमुख अडचणी आहेत. या दोन्ही घटकांमुळे परिणामी जोखीम वाढत असताना उत्पन्न घटत आहे. बदलणाऱ्या वातावरणात कमी खर्चात शाश्वत उत्पादन देणाऱ्या निर्यातक्षम द्राक्ष वाणांची गरज बागायतदारांना भासत होती. शेतकऱ्यांची कंपनी म्हणून लौकिक असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने यासाठी पुढाकार घेतला. अधिक उत्पादकता, कमी उत्पादन खर्च व निर्यातक्षम अशी वैशिष्ट्ये असलेला ‘आरा-१५’ हा कॅलिफोर्निया येथील वाण भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. या वाणाची ‘लागवड ते विक्री’ हे सर्व अधिकार प्राप्त केले. जिल्ह्यामध्ये पूर्ण शास्त्रीय प्रक्रिया (प्लॅन्ट क्वॉरन्टाइन ) व नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांकडे लागवडी झालेल्या आहेत. भारतातील ‘आरा-१५’ लागवडीचे टप्पे : २०१५...वाण भारतात आणण्यासाठीच्या प्रक्रिया सुरु २०१६...सह्याद्री कंपनीच्‍या माध्यमातून वाण भारतात पहिल्यांदा उपलब्ध २०१७-१८...पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यातील रावळगाव (ता.मालेगाव) येथे लागवड नुकसान झाल्याने दुबार गोडी बहार छाटणीचा निर्णय : सन २०१८ च्या दुष्काळी परिस्थितीत २९ एकरवर लागवड करण्यात आली. मात्र, पुढे २०१९ साली कसमादे भागात अतिवृष्टी झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अखेरीस छाटणी झाली असताना पावसामुळे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे ६० ते ७० दिवस बागेत पाणी साचून राहिल्याने रोग नियंत्रणासाठी फवारण्या व हंगामनिहाय कामे करताना अडचणी आल्या. परिणामी बागेत वेलीवर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाले. या वाणास फळधारणक्षमता अधिक आहे. त्यामुळे वर्षातून दुसऱ्यांदा छाटणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीत द्राक्ष पीक हातातून गेल्यास बागेस विश्रांती दिल्यानंतर ‘आरा १५’ वाणाची पुन्हा छाटणी करून उत्पादन घेणे शक्य होते. डिसेंबर-२०१९ मध्ये एकदा उत्पादन घेतल्यानंतर आता पुन्हा जून-२०२०मध्ये दुसरे उत्पादन तेही अपेक्षित गुणवत्तेप्रमाणे मिळाले आहे. ‘आरा-१५’ उत्पादनातील घटनाक्रम :

  • रिकट तारीख...१८ फेब्रुवारी २०१९
  • पहिली गोडीबहार फळछाटणी...३१ ऑगस्ट २०१९
  • पहिला काढणी हंगाम...१५ ते २२ डिसेंबर २०१९
  • बागेला विश्रांती...२३ डिसेंबर २०१९ ते ७ फेब्रुवारी २०२०
  • दुसरी गोडीबहार फळछाटणी...८ ते १६ फेब्रुवारी २०२०
  • दुसरा काढणी हंगाम...५ ते २० जून २०२०
  • सलग तिसऱ्यांदा गोडीबहार फळछाटणी...२७ जुलै २०२०
  • कामकाजाचे नियोजन :

  • विश्रांती व पीक काळात अन्नद्रव्य व पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले. वेलीतील कर्बोदके (कार्बोहायड्रेटस) वाढवून फेब्रुवारी-२०२० मध्ये बागेची तीन टप्प्यात दुसरी फळछाटणी घेतली.
  • फळधारणक्षमता अधिक असल्याने योग्य प्रमाणात घडसंख्येच्या नियोजनावर भर.
  • रोग कीड व्यवस्थापनात युरोपियन मानकांनुसार ‘अपेडा’ व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने मान्यता दिलेल्या रसायनांचा योग्य प्रमाणातच वापर केला गेला. परिणामी डाऊनी, भुरी, करपा या रोगाचे आणि थ्रिप्स या किडींचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करणे शक्य झाले.
  • विविध प्रयोगांमध्ये फक्त ५ ते ७.५० पीपीएम ‘जीए’चा वापर केला.
  • याखेरीज अन्य कोणत्याही संजीवकाचा वापर केला नाही. पर्यायाने खर्चात मोठी बचत झाली.
  • व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे :

  • सह्याद्री फार्मच्या ऑपरेशन विभागाने प्रामुख्याने ‘ग्राफा’कडून आलेल्या प्रोटोकॉलनुसार व्यवस्थापन केले. स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक असे काही बदल करण्यात आले. मागील एक दीड वर्षांपासून या वाणाचा वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. व्यवस्थापनामध्ये सिंचन, अन्नद्रव्य, कॅनोपी आणि रोग-कीड व्यवस्थापन हे चारही मुद्दे व त्याला दिलेले महत्त्व (टक्केवारीमध्ये ) पुढील प्रमाणे...
  • -पाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला. (६५ टक्के)
  • अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी ३ ते ४ वेळा पर्णदेठ परिक्षण करण्यात आले. त्यानंतर खतांचे व्यवस्थापन केले गेले. (१० टक्के)
  • रोग, कीड व्यवस्थापनासाठी युरोपियन मानकांनुसार ‘अपेडा’ व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने मान्यता दिलेल्या रसायनांचा योग्य प्रमाणातच वापर. (५ टक्के)
  • उत्पादनासाठी कॅनोपी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी अंतराचे नियोजन केले गेले. (१० टक्के)
  •  हवामान आधारित उपाययोजना. (१० टक्के)
  •  काटेकोर व्यवस्‍थापनातून उत्पादन खर्च मर्यादित ठेवण्यात आला.
  • दुबार हंगामातील प्रमुख निरीक्षणे:

  • माल तयार होऊन सरासरी २० मिमी आकाराची द्राक्षे तयार झाली.
  • यासह ४०० ते ४५० ग्रॅम वजनाचे घड तयार झाले.
  • साखरेचे प्रमाण संपूर्ण घडात सरासरी १८ ते २० ब्रिक्स इतके होते.
  • मण्यांचा एकसारखा दुधाळ रंग व कोणत्याही प्रकारची मणीगळ झाली नाही.
  • अन्य वाणाप्रमाणे पेपर रॅपिंग केले नव्हते.
  • या क्षेत्रावर काढणीदरम्यान जोरदार वादळासह १६० मिमी पाऊस झाला. बागेतून तब्बल ५२ तास पाणी वाहत असतानाही द्राक्षघडाच्या एकाही मण्याला तडा गेला नाही.
  • नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यानंतर उत्पादनाची जोखीम कमी करणे या वाणामुळे शक्य होईल.
  • तुलनात्मक फळधारण क्षमता (टक्के)

  • थॉमसन ः ७५-८०
  • फ्लेम सीडलेस ः ९०-९५
  • आरा-१५ ः १५०-१७०
  • दुबार हंगामातील उत्पादनातील ठळक बाबी :

  • एकरी सरासरी ९ टन उत्पादकता
  • द्राक्षमणी आकार...१८ ते २२ मिमी
  • साखर...१९ ते २० ब्रिक्स
  • बेरी ॲटॅचमेंट हे विशेष
  • वाणाच्या सकारात्मक बाजू:

  • अन्य वाणांच्या तुलनेत व्यवस्थापन खर्च कमी. (साधारण एकरी ५० हजार रुपये बचत शक्य.)
  • संजीवकांचा वापर नगण्य. (अन्य वाणांच्या तुलनेत २५ ते ३० हजार खर्चात बचत शक्य.)
  • पेपर रॅपिंगची गरज नाही. ( एकरी २५ ते ३० हजार खर्च कमी.)
  • उत्पादन खर्च २० टक्क्यांनी कमी होतो.
  • उत्पादनामध्ये १५ टक्क्यांपर्यत उत्पादन वाढ.
  • अन्य वाणांच्या तुलनेत व्यवस्थापनातील श्रम व खर्चात बचत.
  • हंगाम वाया गेल्यास विश्रांती देऊन पुन्हा त्याच वर्षात दुबार हंगाम घेणे शक्य. उत्पन्नातून केलेला खर्च परत मिळवणे शक्य.
  • ‘आरा-१५’ द्राक्षाची वैशिष्ट्ये :

  • मण्यांना चमक, कडकपणा
  • मोठा घड व उत्तम टिकवणक्षमता
  • पाऊस व प्रतिकूल हवामानास प्रतिकारक्षम
  • खाण्यास कुरकुरीत व भरपूर गर, उत्तम चव
  • नैसर्गिक आपत्तीत प्रतिकारक्षम वाणामुळे दुबार हंगाम झाला शक्य

  • २०१९ साली ‘कसमादे’ पट्ट्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा भागात अतिवृष्टी झाल्याने द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा या नैसर्गिक आपत्तीतही ‘आरा-१५’ व ‘क्रिमसन’ या दोनच वाणांनी टिकाव धरला. कॅनोपी चांगली झाल्याने मणी व घड आकार, गुणवत्ता, त्यातील घडाच्या आंग्र्या (शोल्डर्स) यांचे नियोजन चांगले झाले. पानांची जास्त व पुरेशी संख्या असल्याने कॅनोपीमुळे घड दणकट व मण्याची संलग्नता असल्याने आकार चांगला मिळाला.
  • बहुतांश द्राक्ष उत्पादकांची मानसिकता रासायनिक बुरशीनाशके व संजीवके यांच्या वापरातून उत्पादकता वाढ मिळवण्याकडे आहे. मात्र या प्रयोगात सिंचन, अन्नद्रव्य व्यवस्थापनावर मुख्य भर देण्यात आला. सोबतच कॅनोपी व संजीवकांचा योग्य वापर, रॅपिंग न करणे यामुळे खर्चात बचत शक्य झाली. तसेच आपत्तीमध्ये योग्य विश्रांती दिल्यानंतर पुढील हंगाम घेणेही शक्य होते.
  • सलग तिसऱ्यांदा बहार छाटणी यशस्वी :
  • सलग दुसऱ्या वर्षी द्राक्ष गोडीबहार छाटणी सलग तिसऱ्यांदा घेण्याचा द्राक्ष शेतीतील प्रयोग सह्याद्रीने केला आहे. विशेष म्हणजे हाही प्रयोग यशस्वी झाला असून वेलींवर जोरदार घड निघाले आहेत.
  • आरा- १५ वाण लागवडीची सद्यस्थिती ः

  • सह्याद्रीकडून करण्यात आलेली लागवड : ५० एकर
  • त्यातील पहिल्या टप्प्यातील प्रायोगिक लागवड : १६ एकर
  • सहभागी शेतकरी : २१५
  • शेतकऱ्यांकडील लागवड क्षेत्र : ३३० एकर
  • आजअखेर झालेली एकूण लागवड : ३८० एकर
  • या हंगामासाठी नवीन शेतकरी नोंदणी : १२४
  • या हंगामासाठी नवीन क्षेत्र लागवड नोंदणी : २१४ एकर
  • पडीक जमिनीवर खुलले द्राक्ष शेतीचे प्रयोग : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे पडीक क्षेत्र सह्याद्री फार्म्सने भाडेतत्वावर घेतले आहे. या ठिकाणी द्राक्ष शेतीतील नव्या वाणांच्या लागवडीसह अनेक प्रयोग केले जात आहेत. बदलत्या द्राक्ष शेतीत टिकाव धरण्यासाठी सह्याद्रीने नवीन ११ वाण उपलब्ध केले आहेत. पुढील दोन वर्षात त्यांचेही निष्कर्ष तपासले जात आहेत. हिरवा वाण... आरा३०, आरा३३, आरा ८A-१९+४ लाल वाण... आरा २९, आरा १०A-३+३, आरा ३०A-११+३, आरा ७९B-४४+१, आरा २८-८४+२ काळा वाण... आरा ३२, आरा २४A-१५+३

    बदलणाऱ्या प्रतिकूल वातावरणात अनुकूल व निर्यातक्षम वाणांची गरज आहे. ‘आरा १५’ वाणाच्या लागवडीनंतर मागील तीन प्रयोगात जी गुण वैशिष्ट्ये समोर आली आहेत, त्यातून आरा वाण बदलत्या द्राक्ष शेतीसाठी वरदान ठरणार असल्याचा अंदाज येत आहे. पुढील पाच वर्षात द्राक्ष शेती नक्कीच बदललेली असेल. -विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी, जि.नाशिक.

    संपर्क : सचिन वाळूंज, ९४२२१७ ८९८६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com