इमारतींमध्येच पिकतात भाज्या आणि फळे

जपानमधील एका हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच मला प्रशस्त बाल्कनीमध्ये चेरी, तसेच टोमॅटोने लगडलेल्या आणि गोड ब्ल्यू बेरीचे घोस लागलेल्या दोन कुंड्या दिसल्या. जपानी व्यक्तीने अभिवादन करून ‘हे फक्त तुमच्यासाठीच आहे’, असे मला सांगितले.
संपादकीय
संपादकीय
जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते. म्हणूनच सकाळच्या सूर्यकिरणांमधील ऊर्जेचा सन्मान करण्यासाठी या देशात एका वेगळ्याच शहरी शेतीचा प्रयोग दोन दशकापूर्वी झाला. आज बघता बघता त्याचा वटवृक्ष झालेला आपणास पाहावयास मिळतो. राजधानी टोकियो, ओसाका, ओकलामा, क्वेटो, कावासाकी या महानगरांमध्ये आकाशाला गवसणी घालणाऱ्या हजारो इमारती आपणास पाहावयास मिळतात. या इमारतींना हरित मानांकन मिळवून देण्यासाठी सौरऊर्जेच्या प्रभावी वापराबरोबरच उंच इमारतींच्या खिडक्या, गॅलरी, प्रथम दर्शनी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस बंद काचेमध्ये आणि गच्चीवर शहरी शेतीची कल्पना शासन, महापालिका आणि इमारतमालकांनी राबवून ती यशस्वी केली आहे. शहारामधील लोकांना तेथील इमारतीमध्येच पिकविलेल्या सेंद्रिय भाज्या, फळे, कंदमुळे ताजी स्वच्छ आणि जवळच्या जवळ उपलब्ध व्हावीत, लोकांचे आरोग्य आणि आहार उत्तम आणि चौरस असावा, लोकांची कार्यालयामधील कामाची उत्पादन क्षमता वाढावी, त्यांच्यामध्ये वनस्पतींच्या माध्यमातून आनंदी, प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे, शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि उत्पादन केलेल्या मालाची शहरी ग्राहकांना ओळख व्हावी, शेतकरी आणि शहरवासी यांच्यामध्ये सौहार्दतेचे संबंध निर्माण व्हावेत, यासाठी ही शहारामधील शेतीची कल्पना जपानमध्ये राबवली जात आहे. या व्यवसायात तेथे अनेक कंपन्या काम करतात. एक एका कंपनीकडे कमीत कमी ४०-५० इमारती शहरी शेतीच्या निगराणीसाठी असतात. प्रत्येक उंच इमारतीसाठी कंपन्याचे चार-पाच कर्मचारी काम करतात. जपानमध्ये शहरी शेतीसाठी आज या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत आणि भविष्यात ही मागणी वाढतच जाणार आहे. जपान हा सहा हजारापेक्षा जास्त बेटांचा देश आहे आणि त्यातील कांही मोजक्या बेटावरच सर्वांत जास्त मनुष्यवस्ती आढळते. त्यामुळेच या बेटांना वातावरण बदलाची झळ जाणवण्याची जास्त शक्यता असते. थोडक्यात उंच इमारतींची गर्दी, वाढती मनुष्यवस्ती आणि वाहतुकीचे जाळे यामुळे आज ही बेटे तापू लागली आहेत. त्यावर उपाय म्हणजे या उंच इमारतींना आणि बेटांना नैसर्गिक थंडावा मिळवून देणे आणि नेमके हेच काम शहरी शेती करत आहे. प्रयोगाअंती असे सिद्ध झाले आहे, की ज्या इमारतीत शहरी शेतीचा प्रयोग केला तिचे तापमान २७ अंशांपर्यंत खाली आले होते आणि हेच तापमान त्याच उंचीच्या आणि आकाराच्या शहरी शेती नसलेल्या इमारतीत ४० अंशांपर्यंत पोचले होते. जपानी व्यक्ती ही लहान मुलांपासून ते शंभरीच्या वृद्धापर्यंत निसर्गावर मनमुराद प्रेम करते आणि याचा प्रत्यय आपणास पावलोपावली जाणवतो. अनेक शहरांमधील शुद्ध हवेचा संबंध त्या शहरामधील स्वच्छ शेतीशी प्रत्यक्ष जोडलेला आहे. अनेक उंच इमारतींच्या बाह्यदर्शनी आणि दोन्ही बाजूंना विदेशी पालेभाज्यांचे मोठमोठे स्थिर पडदे लावलेले आढळतात. या पडद्यांना पॉलिफिल्मने संरक्षित केलेले असते. या भाजीपाल्याची नियमित काढणी करून इमारतीमधील कॅन्टीन अथवा कॅफेटोरियामध्ये सलाडच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिला जातो. प्रयोगअंती असेही लक्षात आले आहे, की अशा बंदिस्त इमारतीमध्ये प्राणवायूचे प्रमाणही जास्त असते, तिच्या वातानुकूलित यंत्रणेत विजेची बचत होते आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून कंपनीला जास्त नफाही होतो. इमारतींना असे भाजीपाल्याचे मोठमोठे पडदे पुरविणाऱ्या अनेक कंपन्या तेथे आहेत. भाजी संपली की ते पडदे घेऊन जातात आणि नवीन आणून बसवितात. टोकियोमधील अनेक हॉटेलमध्ये शहरी शेतीचा प्रयोग अत्यंत यशस्वीपणे राबविला जातो. रेस्टॉरंटमधील जेवणाच्या रांगांमध्ये असलेल्या विभाजकाच्या दोन्हींही बाजूला वेलवर्गीय फळभाज्या आणि कमळाच्या वेली सोडलेल्या असतात. या वेलीवर आलेली फळे येथे अनेकांना आवडतात. चर्चासत्रासाठी राखून ठेवलेल्या हॉलमध्ये चारही बाजूंना सलाडच्या आकर्षक कुंड्या मांडून ठेवतात. त्यामध्ये लेट्यूस, सेलरी, अशा पालेभाज्यांचा जास्त अंतर्भाव असतो. चर्चासत्राच्या मध्यंतरात सहभागी लोकांना यांचा आस्वादही घेता येतो. बाल्कनीमध्ये वाढवलेली ऑरेंजेस व इतर स्थानिक फळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. शहरी शेती असणाऱ्या हॉटेलमध्ये तुम्ही मेनू कार्ड हातात घेऊन बागेची पाहणी करून हव्या असलेल्या भाजीची जेवणामध्ये मागणी करू शकता. जेवणाच्या प्रशस्त गोलाकार टेबलाच्या मध्यावर मिरची, टोमॅटो, लेट्यूस, बीन्सच्या कुंड्या असतात. टेबलावर तुम्हास फक्त नैसर्गिक भाजीच दिसते. कुंड्या खुबीने टेबलाखाली झाकलेल्या असतात. अनेक उंच इमारतींच्या गच्चीवर मोकळ्या जागेत भात लागवडसुद्धा केलेली आढळते. या भाताचा उपयोग हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये ‘शहरी शेतीचे उत्पादन’ असे करून त्याची वेगळी किंमत लिहिलेली असते. गच्चीवरच्या सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देण्यासाठी तेथे जमिनीवर पसरणाऱ्या रताळ्याच्या वेली मी पाहिल्या आणि चकित झालो. टोकियो शहरात हजारो मोठमोठे मॉल आहेत. या मॉलमध्ये मोकळ्या जागेत शहरी शेतीचे कितीतरी प्रयोग सुरू असतात. तुम्हाला ताजा भाजीपाला स्वहस्ते खुडून हवा असेल तर तीसुद्धा व्यवस्था आहे, एवढेच काय पण अशा मॉलमध्ये तुम्ही महिन्याचे भाडे भरून १५ X २० फुटांचा एक तुकडा घेऊन त्यावर भाजी लागवड करून त्यातील उत्पादनाचा आनंदही लुटू शकता. महानगरांच्या शाळांतील अनेक विद्यार्थी ज्यांना शेती आणि शेतकरी काय असते हेच माहीत नसते, ते सर्व त्यांच्या पालकांसह या उपक्रमात सहभागी होतात. शहरी नागरिक आणि शेतकरी यांच्यामधील या सुंदर नात्याचा हा अनोख मिलाफ पाहिल्यावर आपल्याकडील परिस्थिती काळजाला चटका लावून जाते. टोकियो शहरामधील मेट्रो स्टेशनवरसुद्धा स्वतंत्र वातानुकूलित खोल्यांत हायड्रोपोनिक्स पद्धतीने भाज्यांचे उत्पादन घेतात आणि हजारो प्रवासी या ‘टोकियो सलाड’चा आस्वाद घेतात. त्या अनेक भाग्यवंतापैकी मी एक होतो. हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच मला प्रशस्त बाल्कनीमध्ये चेरी तसेच टोमॅटोने लगडलेल्या आणि गोड ब्ल्यू बेरीचे घोस लागलेल्या दोन कुंड्या दिसल्या. जपानी व्यक्तीने अभिवादन करून ‘हे फक्त तुमच्यासाठीच आहे’, असे मला सांगितले. तिथे एक लहान पाटी होती, त्यावर लिहिले होते, ‘‘ही आमची छोटी बाळे, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा सन्मान करा, ते नक्कीच तुम्हाला त्यांचा गोड आस्वाद देतील.’’ जपानी व्यक्ती अभिवादन करून परत केव्हा गेली कळलेच नाही, मी मात्र १९ व्या मजल्यावरच्या माझ्या खोलीमधील बाल्कनीमधील फळांनी लगडलेल्या त्या कुंड्यांकडे आणि त्या पाटीकडे पहातच निशब्द झालो होतो. कारण आमच्या शब्दकोषात फक्त ‘ओरबाडणे’ हा एकच शब्द आधोरेखित आहे, मग ती शेतजमीन असो की जंगल! डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com