कृषिसेवा केंद्रधारक व्हावेत शेतकरी मित्र

शेतकरी बहुतांश निविष्ठांचा वापर दुसऱ्या शेतकऱ्याकडे बघून अथवा कृषिसेवा केंद्र चालकाच्या सल्ल्याने करतो. अशावेळी कृषिसेवा केंद्रधारका कोणती निविष्ठा कधी, किती, कशी वापरायची, याबाबतचे ज्ञान असेल तरच ते शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील.
संपादकीय
संपादकीय

सध्या शेती न परवडण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाजारभाव व नैसर्गिक आपत्ती नंतरची तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे निविष्ठांच्या वाढत्या किंमतीमुळे उत्पादन खर्चही वाढला हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. निविष्ठांच्या किमती कमी करायचे शासनाच्या व उत्पादकांच्या हातात असले तरी, त्या कशा व किती वापरून उत्पादनखर्च कमी करता येईल, हे कृषी सेवा केंद्र मालकांच्या हातात आहे. याचे कारण म्हणजे शेतकरी निविष्ठा खरेदी करतांना एकमेकांच्या सांगण्यावरून करीत असतो. गरज नसणारी, नको त्या ग्रेडची, नको तेवढी खते, कीडनाशके, तृणनाशके तो खरेदी करून शेतीवरचा बोझा वाढवत असतो. त्याला योग्य वेळी मार्गदर्शन न मिळाल्याने त्याला त्या खरेदी कराव्या लागत असतात. मी मागील तीस- पस्तीस वर्षे कृषी अधिकारी म्हणून कृषी विभागात वेगवेगळ्या जिल्ह्यांत कार्यरत असताना, तेथील वेगवेगळ्या कृषिसेवा केंद्रात जाण्याचा योग यायचा. तेथील शेतकरी व दुकानदार यांच्या संभाषणातून व परवा लातूरच्या मांजरा कृषी विज्ञान केंद्रातील कृषिसेवा केंद्रधारकांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना बऱ्याच बाबी समोर आल्या. त्याच इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय.

बहुतांश शेतकरी स्वत:च्या शेतातील मातीची तपासणी करून घेत नाहीत. कृषी विभागाकडून जबरदस्ती केली गेली तरी त्यात कशाची कमतरता आहे, कोणता घटक जास्त आहे, हे ही तो विचारायला जात नाही, अन्‌ कृषी सहायकही त्याला सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. नुसते टार्गेट ओरिएंटेड काम चालू आहे. मिटींगमध्ये आकडेवारी दिली जाते. तीच पेपरमध्ये व तीच शासनकर्ते सांगत सुटतात. मूळ दुखण्यावरचे निदान करून कोणीही इलाज करताना दिसत नाही. त्याला नगण्य अपवादही असतील. याबाबी दररोज संबंध येणारा कृषिसेवा केंद्रधारक व्यवस्थित सांगू शकतो. जमिनीची आरोग्यपत्रिका बघण्याचे, त्यावर उपाय सांगण्याचे ज्ञान जर या मध्यस्ताला योग्य प्रमाणात असेल तर कोणते खत किती टाकावे, कोणते टाकू नये, अमूक एका खताचा आग्रह शेतकरी धरीत असेल तर त्याची फोड करून नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण कोणत्या संयुक्त खतात किती आहे अशी माहिती तो शेतकऱ्यांना देईल. पिकाच्या पानाची, धाटाची (खोडाची) पहाणी करून त्याला कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, त्याला कशातून किती खत, सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावे, हेही तो सुचवेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा अतिरिक्त खर्च वाचेल. अन पीक चांगले येऊन उत्पादन वाढेल. 

हीच बाब सेंद्रिय खतांची व सेंद्रिय, जैविक कीडनाशकांची. ही खते, कीडनाशके दिल्याने उत्पादन खर्च वाचेल, पिकांची रसायनमुक्त वाढ होऊन मित्र किडींची संख्या वाढेल, शत्रू किडी मरतील व ते अन्नधान्य, भाजीपाला, फळे खाल्याने आरोग्याचे होणारे नुकसान, विविध आजारांचे प्रमाण कमी होऊन नाहक खर्च वाचेल. आणीबाणीच्या वेळेस फवारावी लागणारी रासायनिक कीडनाशके त्याचा ग्रेड, तीव्रता, उपयुक्तता, रोगकिडीची लक्षणे पाहून किती मात्रेत फवारावी हे त्याला सुचवू शकतील. एकतर फवारल्या जाणाऱ्या कीडनाशकात कशात काय मिसळावे? सूक्ष्म अन्नद्रव्य, खते, बुरशीनाशके, कीडनाशके, संजीवके कशात किती मिसळावीत हे कळेल. तणनाशकाबाबतीतही बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांना अनभिज्ञ असतात. एकदल-द्विदल पिकातील तणनाशके, उगवणीपूर्वीची-उगवणीनंतरची तणनाशके, त्याची मात्रा, फवारणी करताना काय काळजी घ्यायची, अशा असंख्य बाबी ज्या सुज्ञ शेतकऱ्यांनाही चटकण लक्षात येत नाहीत. हे कृषिसेवा केंद्रधारकांना माहिती करून सांगाव्या लागणार आहेत. नाहीतर थोड्याशा चुकीमुळे अख्खे पीक जळून जाण्याची अन होत्याचे नव्हते होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

इतके दिवस हा निविष्ठा विक्रीचा व्यवसाय म्हणून करणारी बांधव होती. त्यातले बरेचजण शेतकरी होते नव्हते, ही बाब वेगळी. पण आम्ही फक्त नफा कमावण्यासाठी, घातलेले भांडवल कसे व्याजासह वसूल करू हा दृष्टिकोन समोर ठेवून व्यवसाय केला जात होता. एखाद्या तिऱ्हायतागत, पाहूण्यासारखे शेतकरी जमातीकडे पहात होतो, पण आता काळ बदललाय. याही व्यवसायात तज्ञांनीच उतरले पाहिजे. हा व्यवसाय करणारी व्यक्ती परवानाधारक शेतकरी व शेतीचे ज्ञान असणारी, सुशिक्षित असावी हा नवा दृष्टिकोन समोर येतोय. म्हणून कृषिसेवा केंद्रधारक कृषी पदवीधर, पदवीकाधारक किंवा नवीन कोर्सनुसार किमान ज्ञान असणारा प्रमाणपत्र धारक असावा, ही बाब निश्‍चितच स्वागतार्ह आहे. आता त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करावे लागणार आहे. कारण मित्र म्हटल्यावर सगळ्याच बाबी व्यावसायिक रहात नाहीत. काही मित्रत्वाला जागणाऱ्या असतात. शेतकरी टिकला, शेती उत्पादन वाढले तर तोच पैसा खतं-कीडनाशकांच्या माध्यमातून दुकानदाराकडे येत असतो. शेतकरी समाधानी तर आपल्या व्यवसायाला बरकत राहील. ज्याच्या जीवावर आपण व्यवसाय करतो त्याचे भले, त्याचे कल्याण व्हावे ही किमान अपेक्षा प्रत्येकाची असावी तरच दोघांचीही भरभराट होते.

त्यापुढे जाऊन सांगेन की, कृषी निविष्ठाधारक हा शेतकऱ्यांच्या प्रगतीतला वाटेकरी असला पाहिजे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ह्या विश्‍वासाने सोडवण्याचे ठिकाण म्हणून मी अशा केंद्राकडे पहातोय. मातीनंतर, पाण्याची तपासणी, देठ, पाने तपासणी बाबतही मार्गदर्शन करून कीडनाशके फवारणी, खते देणे, त्यांची मात्राही सांगता आली पाहिजेत. कारण गेल्या दहा पंधरा वर्षांतील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा पाहिला की मनात धस्स करतंय. त्यांना आपण विश्‍वासाने आधार देण्याची, मित्र म्हणून समजून घेण्याची गरज आहे.  त्यानंतरचा मुद्दा बीजप्रक्रिया, बियाणाची निवड, ठिबकमधून द्यावयाची सूक्ष्म अन्नद्रव्ये, फवारणीची खते, संजिवके अशा बाबतीतही अद्यावत ज्ञान आता पुढच्या काळात निविष्ठा केंद्र धारकांना असावयास हवे.

बाजारातील मालाचे भाव, वातावरणाचा अभ्यास, अशा शेती पिकांच्या अनुशंगिक सगळ्या बाबी सर्वच शेतकऱ्यांना समजतातच असे नाही. आपण एक तज्ञ म्हणून, मार्गदर्शक म्हणून, मित्र होऊन शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिल्यास मला वाटत नाही की त्याला इतर कुणा तज्ञाकडे फारसे जावे लागेल. फारच आणीबाणीच्या वेळेस कृषी विद्यापीठ, केव्हीकेतील तज्ञ तर आहेतच. पण घराजवळच्या माणसाला, मित्र म्हणून यापुढच्या काळात मार्गदर्शन देत राहिल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गावातच सुटतील. अन त्यातून शेतकरी दुकानदार हे नाते दृढ होऊन शेती विकासात मोलाची भर पडेल. 

रमेश चिल्ले : ९४२२६१०७७५ (लेखक शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com