काळी आई आणि तिच्या लेकरांवर प्रेम करा

पिकावर माया केली, आवश्यक तेवढे खतपाणी दिले, त्याचे संरक्षण केले, योग्य काळजी घेतली तर ते पीक शेतकऱ्याचे ऋण (अधिक उत्पादन देऊन) फेडून टाकते, असे माझे आजोबा म्हणत.
संपादकीय
संपादकीय

४ ऑगस्टच्या ‘अॅग्रोवन’मध्ये तीस वर्षे सतत फ्लॉवर शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा वाचली आणि मला आमच्या आजोबांच्या शेतीची आठवण झाली. साधारणपणे १९६२ चा काळ. शेताच्या चार तुकड्यांपैकी एकावर मोठी आंब्याची बाग, एक तुकडा फक्त भुईमूग आणि ज्वारीसाठी राखलेला, एक पडीक ठेवलेला आणि चौथा जवस, काऱ्हळे, तीळ, अंबाडी, उडीद, मूग, पिवळी, खपली गहू, मका यासारख्या घरी नियमित लागणाऱ्या धान्यासाठी होता. आजोबांचा जीव भुईमूग आणि रब्बी ज्वारी देणाऱ्या तुकड्यांवर जास्त होता. घरात दोन प्रचंड मोठ्या कणगी होत्या. एकात शेंगा आणि दुसऱ्यात ज्वारी. उन्हाळ्याच्या सुटीत आजोळी आल्यावर बांबूच्या शिडीने आम्ही या भरलेल्या कणगीत उतरत असू. धनधान्याची ती खरी सेंद्रिय श्रीमंती होती.  

मनुष्य, प्राणी आणि वनस्पती यांचे काही नाते आहे काय? शेतातील पिके शेतकऱ्यांचा प्रेमळ हात ओळखतात का? जगप्रसिद्ध भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. जगदिशचंद्र बोस यांनी याचे उत्तर ‘हो’ असे दिले आहे. पदार्थशास्त्राचे संशोधक असतानाही वनस्पतीवर प्रदीर्घ संशोधन करून त्यांनी हे सिद्ध केले की वनस्पतींनासुद्धा आनंदाची, प्रेमाची, सुख दु:खाची संवेदना समजते. त्याप्रमाणे त्या प्रतिसादसुद्धा देतात. पिकावर माया केली, आवश्यक तेवढे खतपाणी दिले, त्याचे संरक्षण केले, काळजी घेतली तर ते पीक शेतकऱ्याचे ऋण (अधिक उत्पादन देऊन) फेडून टाकते, असे माझे आजोबा म्हणत. शेतात गेले की ते प्रत्येक भुईमुगाच्या वेलीला, ज्वारीच्या ताटाला प्रेमाने हात लावत. शेताच्या त्या तुकड्यातील त्यांचे उत्पादन प्रतिवर्षी काकणभर जास्तच असे. 

गेली ३० वर्षे आपल्या शेतात फ्लॉवरचे वर्षातून दोन वेळा उत्पन्न घेणारे पंडितराव काळे यांच्याशी मी दूरध्वनीवरून मुद्दाम संवाद साधला आणि त्यांच्या यशाचे रहस्य विचारले. उत्तर होते! या पिकाला मी लावलेली माया आणि प्रेमळ स्पर्श. ते म्हणतात, ‘‘बाजारात भाव कमी झाले पण माझ्या फ्लॉवरचे उत्पादन दर्जेदारच राहिले.’’ फ्लॉवरच्या पिकास याच जमिनीत प्रतिवर्षी आपला हक्काचा जन्म होणारच, या आनंदी भावनेने काळे यांचे उत्पादन वाढतच गेले. वैज्ञानिक भाषेत बोलायचे तर कोबीच्या पिकासाठी आवश्यक असणारी उपयुक्त जिवांणूची श्रीमंती त्यांच्या जमिनीमधून कधीच कमी झाली नाही. वाढत्या उत्पादनाचे हेच खरे रहस्य आहे. पंडितराव म्हणतात, ‘‘फ्लॉवरची शेती हा माझ्यासाठी प्रतिवर्षी आनंदाचा मेळावा असतो.’’ पिकाला आनंदी सुदृढ ठेवायचे असेल तर त्यांचेच अवशेष त्यांना परत द्यावयास हवेत. अशा पिकामध्ये मुलद्रव्यांची आणि मातीमध्ये जिवाणुंची कधीही कमतरता निर्माण होत नाही. पिकाची वाढ निरोगी सुदृढ होते. पंडितराव गेली ३० वर्षे हेच करत आहेत. फ्लॉवरची पाने जागेवरच कुजविण्याचे तंत्र त्यांची प्रत्यक्ष अमलात आणले. त्यामुळेच प्रतिवर्षी त्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. शाश्वत सेंद्रिय शेतीचा हा खरा मूलमंत्र आहे. 

विष्णू म्हात्रे यांच्या दहा एकरावरील सोनचाफा वृक्षशेतीला मी भेट दिली. म्हात्रे प्रत्येक झाडाशी बोलतात. त्यांची खत, पाणी, संरक्षण याची काळजी घेतल्यामुळे गेली चार वर्षे त्यांना सोनचाफ्याने मालामाल केले. नवीन घराचे बांधकाम होईपर्यंत आमच्या परसामधील ‘आळू’ हा तीन पिढ्यांचा साक्षीदार होता. माझी आजी आठवड्यामध्ये एकदा मोजून चार पाने तोडत असे आणि वर पुन्हा म्हणत असे, ‘‘आळुबाई! पाहुण्यांना तू आवडतेस म्हणून चारच पाने तोडते हं!’’ दुसऱ्या दिवशी तोडलेल्या पानाच्या राहिलेल्या देठाच्या खालच्या कोंबामधून पुन्हा चार पाने वर आलेली दिसत. आज्जी काय बोलते हे आळूला समजत असेल का, हा प्रश्न मला नेहमीच पडत असे. विकतच्या पालेभाजीपेक्षा गच्चीवर पिकवलेली स्वकष्टाची भाजी चवीला एवढी छान का? कुंडीमधील सकाळी खुडलेली पालेभाजी दुसऱ्या दिवशी पुन्हा कुंडीभर पसरते, हे सर्व प्रेमळ हाताच्या स्पर्शामुळेच शक्य होते. तुळशीला स्पर्श केला की विशिष्ट सुवास जाणवतो. हा गंध म्हणजे त्या वनस्पतीची प्रतिकार शक्ती असते. शत्रू अथवा संकटाची जाणीव झाली की असा गंध सुटतो, पण याच तुळशीला तुम्ही ‘माय’ म्हणून प्रेम दिले, तर तिला जाणीव होते की या व्यक्तीपासून आपणास धोका नाही उलट संरक्षणच मिळणार आहे. वृक्ष, वेली, शेतातले पीक हे प्रेमाचे भुकेले असते. तुम्ही त्यांना जेवढे प्रेम आणि संरक्षण द्याल, काळजी घ्याल तेवढे ते तुम्हास जास्त संरक्षित करतात, मात्र क्रुरपणे वृक्ष, फांद्या तोडताना त्यांचे निशब्द मरण यातना समजण्याएवढे संवेदनशील मन आपणाकडे हवे. आफ्रिकेतील जिराफ बाभळीची पाने भक्षण करतात. बाभूळ स्वसंरक्षणार्थ कितीही उंच वाढली तरी जिराफाच्या उंचीची ती बरोबरी कशी करणार? तिकडच्या बाभळीने यावर एक वेगळीच युक्ती केली आहे. जिराफ चरायला लागले की ते ‘इथिलिन’ वायू उत्सर्जित करतात. हवेमधुन हा संदेश मिळतात परिसरामधील बाभळीच्या पानामध्ये ‘टॅनीनचे’ प्रमाण वाढुन चव बदलते आणि अशी पाने जिराफ खात नाही, खाल्लीच तर त्याच्या पचन क्षमतेवर विपरित परिणाम होतो. वनस्पतींना शत्रुची जाणिव होते याचे हे सुरेख उदाहरण आहे.

आपण शेती करतो पण काळ्या मातीवर, पिकावर प्रेम करतो का? तसे असते तर अनियंत्रित रासायनिक खताचे विष जमिनीस दिले असते का? पिके रोगराईस का बळी पडतात? प्रतिकार शक्ती कमी झाली म्हणूनच तर ना?  त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आम्ही काहीच करत नाही उलट किटकनाशके फवारुन त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करतो. अशी शेती शाश्वत असू शकत नाही. सावता माळी पांडुरंगाचे नाव घेऊन मळ्यात फिरताना, नाचताना भाज्यासुद्धा माना डोलवत असत, असे एका प्रवचनकाराने म्हटले होते. थोडा अंधश्रद्धेचा भाग सोडला तर संत सावता त्यांच्या मळ्यावर मनापासून प्रेम करत होते ना! लोकांना भाज्या वाटूनसुद्धा त्यांचा मळा फुललेला असे. यामध्ये विज्ञान शोधण्याचा प्रयत्न करावयास हवा. शेतकऱ्यांनी तणावविरहित शाश्वत शेती करावयास हवी. जिवंत काळी माती आणि तिच्या पीकरूपी लेकरावर मनापासून प्रेम करावयास हवे. सेंद्रिय शेती हे नेहमीच जिंवत असते आणि म्हणूनच तो आनंदाचा शाश्वत झरा असतो.

डॉ. नागेश टेकाळे  ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com