उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती

मेळघाटात मुख्यत्वे एकत्र कुटुंब पद्धतीच आहे. काही घरांत आम्ही गेलो तेव्हा पणजोबा, आजोबा, वडील आणि मुलगा अशा चार पिढ्या गुण्यागोविंदाने नांदताना आम्ही बघितल्या आहेत.
संपादकीय
संपादकीय
मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर आदिवासी बांधवांच्या कलानेच काम करावे लागेल. जेणेकरून त्यांच्या भावना न दुखवता त्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त करता येईल. आजही मेळघाटात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला जात नाही. गावातील प्रमुख व्यक्ती गावातील तंटे स्थानिक पातळीवरच मिटवितो. समाजात चांगला एकोपा आहे. या एकोप्याच्या माध्यमातून येथील आदिवासी शेतकरी मित्रांना एकत्र करून शासनाच्या गटशेतीचे एक आदर्श मॉडेल उभे करणे सोपे आहे. जेणेकरून शासनाच्या विविध योजना आदिवासी शेतकरी बांधवांपर्यंत पोचविणे सोपे जाईल. मेळघाटातील आदिवासी समाजात पक्षीय राजकारणाचा फारसा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे गावात गटतट नाहीत. प्रशासनाचे अनेक विभाग या आदिवासी बांधवांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळे शासनाच्या अनेक आदिवासी योजनांपासूनही हे बांधव वंचित आहेत. आजही चिलाटी आणि परिसरातील २० ते २५ गावातील काही जेष्ठ नागरिकांनी आपला तालुका पाहिलेला नाही. मेळघाटात मुख्यत्वे होळी, पोळा, दिवाळी, आखाडी हे सण साजरे केले जातात. या भागातील आदिवासी बांधव आपल्या रोजच्या आहारात प्रामुख्याने भात, मासे, मक्याची भाकरी, गव्हाची पोळी, तसेच तूरडाळ, मसूरडाळ, चनाडाळ याचा वापर करतात. हंगामाप्रमाणे उपलब्ध रानभाज्यांचाही वापर केला जातो. शेतात पिकविलेल्या पावटा, मिरची, लाल भोपळा, गवारी, पालक, मेथी या भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. संमिश्र कडधान्य, तृणधान्य आणि भाज्यांचा वापर आहारात होत असल्याने येथील युवक बलदंड आहेत. आज शहारातील नागरिकांच्या आहारात असा संमिश्र वापर नगण्य होत चालला आहे. जंक फूडकडे शहरी लोकांचा कल वाढल्यामुळे त्याचे परिणाम युवकांवर दिसत आहेत. मेळघाटात मुख्यत्वे एकत्र कुटुंब पद्धतीच आहे. काही काही घरात आम्ही गेलो तेव्हा पणजोबा, आजोबा, वडील आणि मुलगा अशा चार पिढ्या गुण्यागोविंदाने नांदताना आम्ही बघितल्या आहेत. जसजसा शहरी लोकांचा वावर मेळघाटात वाढत चालला आहे तसे तेथे विभक्त कुटुंब होण्यास सुरुवात झाली आहे. या भागातील कुटुंबांत आजही घरातील निर्णय घेताना महिलांचा विचार घेतला जातो. कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान असली तरी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सन्मान दिला जातो. या भागातील कोरकू जमातीत विवाहाच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत वरपिता वधूपित्याकडे जाऊन विचार विनिमयाने आपल्या मुलामुलींचा विचार घेऊन लग्न ठरविले जाते. दुसरी पद्धत अशी आहे की, काही गावांतून यात्रा भरविल्या जातात. त्या यात्रेत फक्त युवक आणि युवतीच सहभागी होतात. ज्या युवकाला जी युवती पसंत पडली त्या युवकाने त्या युवतीला विड्याचे पान द्यावयाचे असते. त्या युवतीने विड्याचे पान स्वीकारले तर तो युवक त्या युवतीला आपली पत्नी म्हणून घरी घेऊन जाऊ शकतो. युवकाकडील घरचे त्या युवतीचा स्वीकार करतात. ती यात्रा संपल्यानंतर मुलीकडचे वरपित्याकडे जाऊन त्या मुलीला दंड लावतात. त्यानंतर त्या मुलीचा स्वीकार केला जातो. आज आधुनिक समाजाला मुलीचा जन्म मान्य नाही. परंतु आदिवासी बांधवांमध्ये आजही मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव केला जात नाही. मुलाइतकाच मुलीलाही सन्मान दिला जातो. यातून आधुनिक समाजाने बोध घेण्याची वेळ आलेली आहे. या परिसरातील आदिवासी बांधवांना वरदक्षिणा (हुंडा) अजिबात मान्य नाही. याउलट वरपिता वधूपित्याला त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात मदत करतात. मेळघाटात शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रमाणे हुंडाबळीचे प्रमाणही शून्य आहे. कुटुंबातील काही वाद असतील तर जेष्ठ नागरिक सामोपचाराने सोडवतात. सद्य परीस्थितीत राज्यात स्त्री भ्रूणहत्या किती मोठ्या प्रमाणात होते हे आपल्या निदर्शनास येत आहे. परंतु मेळघाटात मुलगी झाली तरी मुलाप्रमाणेच आनंद व्यक्त केला जातो. आम्ही त्या परिसरातील अनेक घरात जाऊन या गोष्टीचा प्रत्यय घेतला. मी प्रत्यक्ष काही महिलांशी या विषयी चर्चा केली. एकदा लग्न झाल्यानंतर मला मुलगी पसंत नाही म्हणून घटस्फोट घेणारे नसल्यात जमा आहे. मेळघाटातील महिलांना आभूषणाची खूप आवड आहे. मागील दहा वर्षापर्यंत तेथील महिला भगिनी सर्व आभूषणे चांदीची वापरीत. परंतु मागील दहा वर्षापासून या भागातील आदिवासी माता भगिनी सोन्याचे मंगळसूत्र वापरीत आहे. युवतींच्या कानात, नाकात, गळ्यात आता सोन्याची आभूषणे आली आहेत. दहा वर्षापूर्वी अदिवासी पुरुषांचा पोशाख गुडघ्यापर्यंत सुती धोतर आणि वर खमीस आणि डोक्याला आर्थिक परिस्थितीप्रमाणे मुंडासे किंवा उपरणे बांधलेले असे. महिला माता भगिनी सुती गोल लुगडे नेसत असत. परंतु मागील आता शहरीकरणाचा परिणाम हळूहळू या भागातही निदर्शनात येत आहे. नवीन युवक आणि युवती अनुक्रमे पॅंट-शर्ट आणि पंजाबी ड्रेस वापरीत आहेत. आजही मेळघाटात आम्हाला नाव्ह्याचे दुकान दिसले नाही. आम्ही त्या परिसरात युवकांशी चर्चा केली असता ते स्वतच एकमेकांची दाढी कटिंग करतात. मेळघाटात प्रत्येक सणाला गव्हाच्या गोड पुऱ्या, तांदुळाचा भात, मासे किंवा कोंबड्याचे मटन, घरात सदस्य संख्या जास्त असेल तर बोकडाच्या मटनाचाही वापर केला जातो. या भागात मुख्यत्वे मोहाच्या झाडांचे प्रमाण अधिक असल्यामुळे येथे मोहाचीच दारू पाडली जाते. परंतु आज आपल्या सुधारित समाजात दारू या व्यसनापायी वाया जाणाऱ्याचे प्रमाण ५० टक्केच्या पुढे गेले आहे, तसे मेळघाटात निदर्शनास येत नाही. पुरुषप्रधान संस्कृती असली तरी आठवडी बाजाराला पुरुष आणि स्त्रिया बरोबरीने सहभागी होतात. या अतिदुर्गम भागात स्त्रियांवर अत्याचाराचे प्रमाण अजिबात नाही. आम्ही त्या परिसरात फिरत असताना तेथील युवकांशी चर्चा केली असता युवती किंवा महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण अजिबात दिसत नाही. त्यामुळे आमच्या चार दिवसांच्या मेळघाटातील भटकंतीनंतर एक यक्षप्रश्न उभा राहिला आहे. की, आम्हाला आम्ही सुधारलो आहोत का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज शहरातील किंवा ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीने मेळघाटातील या दुर्गम भागात आयुष्यात एकदातरी भेट द्यावी म्हणजे प्रत्येकाला आपल्या जगण्याचा अर्थ कळेल. दीपक जोशी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com